Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

श्रमपरिहारानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा निकालाची
प्रतिनिधी / नाशिक

सलग महिनाभरापासून निवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला असला तरी आता सारेचजण मतदान यंत्रात दडलेल्या कौलाविषयी अंदाज बांधण्यात मग्न झाले आहेत. दुसरीकडे अगदी काल-परवापर्यंत कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे ओतप्रोत गजबजलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यालयांमध्ये शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट पसरला होता. ‘श्रमपरिहार’ झाल्यानंतर सायंकाळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते जमले खरे, पण त्यांच्यातही निकालाशिवाय दुसरी चर्चा रंगली नाही.

उत्तर महाराष्ट्रात मतदानाची अंतिम सरासरी ४८ पर्यंत
नंदुरबारमध्ये सर्वाधिक; तर धुळ्यात सर्वात कमी मतदान
प्रतिनिधी / नाशिक
गुरुवारच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून उत्तर महाराष्ट्रातील सहा मतदारसंघात सरासरी ४८ टक्के मतदान झाले. या सहा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये ५३ टक्के तर सर्वात कमी धुळे जिल्ह्य़ात ४० टक्के एवढे झाले. नाशिकमध्ये ४५.५३, दिंडोरी ४७.६४, जळगाव ४३, रावेर ५३ टक्के असे मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण मतदारांपैकी नाशिकमध्ये सहा लाख ५८ हजार ३८७ तर दिंडोरीमध्ये सहा लाख ८१ हजार ६२९ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.

महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी उद्या मतदान
प्रतिनिधी / नाशिक

राज्यातील एम.बी.बी.एस. आणि त्याहून उच्च शिक्षित वैद्यकांची नोंदणी करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेसाठी संपूर्ण राज्यातून ३९ उमेदवार रिंगणात असून रविवारी मतदान होत आहे. मात्र, केवळ जिल्हा मुख्यालयीच मतदान होणार असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी काम करणारी मंडली तसेच खासगी वैद्यक व्यवसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केल्यास त्या त्या भागातील रूग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे दहा वर्षांनंतर निवडणूक होत आहे.

‘आयपीएल’मध्ये अभिषेक राऊतची चमकदार कामगिरी!
प्रतिनिधी / नाशिक

कोलकाता नाइट रायडर्सच्या अचूक गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडावे लागत असतानाच मस्कारेन्हसही तंबूत परतल्याने संघाची अवस्था सहा बाद १२५. संघ दीडशेपर्यंतही मजल मारतो की नाही, या चिंतेने कर्णधार शेन वॉर्न ग्रासलेला. अशा कठीण समयी नाशिकचा अभिषेक राऊत मैदानात. सुरूवात काहीशी अडखळती. डावाच्या शेवटच्या षटकासाठी अनुरितसिंगच्या हातात चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडू ठेवणाऱ्या सिंगचे पहिले तीनही चेंडू तडकाविण्यात अभिषेकला अपयश. नॉन स्ट्राइकर एंडकडून वॉर्नची अभिषेककडे धाव. वॉर्नकडून काही सूचना.

क्रांतिकारक समाजसुधारक : महात्मा बसवेश्वर
वीरशैव लिंगायत समाजाचे प्रसारक महात्मा बसवेश्वर यांची अक्षय्यतृतीयेला जयंती आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना वीर शैव लिंगायत समाजात प्रवेश दिला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, वारांगणांचे पुनर्वसन असे कार्य केले. सध्याच्या जातीधर्माच्या राजकारणात त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत.

रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

येथे रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुटमधील निवृत्त प्राध्यापक राजा पोखरापूरकर यांच्या उपस्थितीत झाले. पोखरापूरकर हे कॅमेरा व पटकथा संवाद हा विषय इन्स्टिटय़ुटमध्ये गेली ३० वर्षे शिकवत होते. आंतरराष्ट्रीय विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या हस्ते रेवा फिल्म क्लबचे उद्घाटन झाले.

नाशिक जिल्हा टेनिस संघटनेतर्फे आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक जिमखाना जिल्हा टेनिस संघटना, निवेक या संस्थेतर्फे टेनिस खेळांचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून त्याचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लॉन टेनिस जगामध्ये २२५ देशांमध्ये खेळला जाणारा आणि ऑलिम्पिक मान्यता असलेला खेळ आहे. परंतु त्याचबरोबर मैदानी खेळामध्ये वैयक्तिक खेळला जाणारा खेळ आहे. या खेळामध्ये अनेक वर्षांमध्ये खेळूनही कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी होण्याची शक्यता कमी असते, अशी माहिती टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांनी दिली. टेनिस खेळाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता करिअर म्हणून बघावे. खेळात सातत्य राखल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तसेच व्यावसायिक खेळाडू अथवा पंच किंवा व्यावसायिक प्रशिक्षक म्हणूनही खेळाडू भविष्य घडवू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

आयएमए नाशिकरोड शाखाध्यक्षपदी डॉ. विलास गोऱ्हे
नाशिक / प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिकरोड शाखा अध्यक्षपदी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विकास गोऱ्हे तर सचिवपदी डॉ. अमीत गांगुर्डे यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. सूत्रसंचालन ऋषीकेश आयचित व डॉ. नम्रता मित्तल यांनी केले. मावळते अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव व सचिव डॉ. विनीत वानखेडे यांच्यासह डॉ. अप्पासाहेब पवार व सकाळचे संपादक विश्वास देवकर व्यासपीठावर उपस्थित होते. गोऱ्हे यांनी अध्यक्षीय भाषणात डॉक्टरांच्या विविध समस्यांवर प्रभावी उपाय योजना व कार्यक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. आगामी वर्षांत त्यांच्या कार्यकारिणीच्या सहाय्याने करावयाच्या कामाचा आराखडा मांडला. पवार व देवकर या दोघांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टरांचे महत्व पीडीत रुग्णांसाठी देवासारखे असते, हे उपस्थित वैद्यकीय व्यावसायिकांना उदाहरणांसह खुमासदार शैलीत पटवून दिले. कार्यकारिणीत खजिनदारपदी डॉ. धर्मेंद्र चांदवनी तर उपाध्यक्षपदी डॉ. विजय मंडाले हे आहेत.

दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त चित्रकला, रांगोळी स्पर्धा
नाशिक / प्रतिनिधी
‘नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २००९’ अंतर्गत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त बॉलीवूड चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वर्षांपासून पुढील वयोगटातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेसाठी माझे आवडते कार्टुन, चित्रपट सृष्टीतील आवडते व्यक्तीमत्व, आवडता चित्रपट प्रसंग, सिनेसृष्टीतील भूमिका, स्मरणातील चित्रिकरण, चित्रपट सृष्टीद्वारे सामाजिक संदेश, चित्रपटसृष्टीद्वारे तरूणांना संदेश, आजचा सिनेमा, सिनेमा सृष्टीचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, सिनेमांचा इतिहास हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. बॉलीवूड चित्रकला स्पर्धा २६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनला होणार आहे. या स्पर्धेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्राचार्य बाळ नगरकर ९४२१४-०३५९७ यांच्याशी संपर्क साधावा. बॉलीवूड रांगोळी स्पर्धा ३० एप्रिल रोजी दुपारी एकला होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रतिभा गाडे ९२२६७-४८२०६ यांच्याशी संपर्क साधावा. या दोन्ही स्पर्धा गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात होणार आहेत.