Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

घसरला टक्का!
उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघातील मतदान एकदाचे पार पडल्यानंतर आता आपण सर्व बाबतीत घेतलेले ‘परिश्रम’ कारणी लागले किंवा नाही हे पाहण्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना १६ मे पर्यंत वाट पहावी लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचारात वेगवेगळ्या मुद्यांचा राजकीय पक्षांकडून प्रभावीपणे वापर करण्यात आला, आणि हे करताना नीतीमत्ता, साधनसुचिता या गोष्टी गुंडाळून ठेवण्यात आल्या.

शहादे, तळोद्यात मतदार प्रतिनिधींविरुद्ध कारवाई
शहादा / वार्ताहर

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना मतदारांना उमेदवारांचे चिन्ह असलेली चिठ्ठी दिल्याने चार जणांविरुद्ध तर तळोद्यातही मतदान प्रतिनिधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोलगी, अक्कलकुवा परिसरातही याच कारणास्तव सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शहादे तालुक्यात लांबोळा व मनरद येथे शंभर मीटरच्या आत मतदारांना अनुक्रमांक असलेली चिठ्ठी देताना त्यावर उमेदवाराच्या पक्षाचे निशाण आढळल्याने लांबोळ्याचे श्रावण ठाकरे, छगन माळी तसेच मनरद येथील रमण पाटील व छोटू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रलंबित मागण्यांमुळे साहूर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
धुळे / वार्ताहर

पुनर्वसनासाठी शासनाने दिलेली जमीन मागणी करूनही बदलून देण्यात येत नसल्याने आणि अन्य प्रलंबित मागण्यांवरही निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर शिंदखेडा तालुक्यातील साहूर ग्रामस्थांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार टाकला. ४७४ पैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास त्यावेळीही असाच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

भगूर पालिकेची कर वसुलीसाठी मोहीम
स्पॉट दारणा
प्रकाश उबाळे / भगूर
नगरपालिकेने मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी पालिकेची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ मालमत्ताकर पालिका कार्यालयात जमा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी केले.
पालिकेने मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीचे ठरविलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वसुलीकामी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

मतदानाची टक्केवारी घसरल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
जळगाव / वार्ताहर

वाढलेले तापमान तसेच मतदारांमधील निरूत्साहामुळे जळगाव जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीसाठी केवळ ४५.६३ टक्के मतदानाची नोंद झाली, त्यात जळगाव मतदारसंघात ४२.४३ तर रावेरमध्ये ५०.५७ टक्के मतदान झाले. मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे विजयाची गणिते मांडणाऱ्या राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कमी मतदानामुळे विजयाचे समीकरण कोणत्याही बाजूला झुकू शकेल, असे चित्र आहे.

मेंढपाळ वस्तीवर दरोडा, दीड लाखाची लूट
वार्ताहर / जळगाव

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलीस यंत्रणा निवडणूक कामात गुंतलेली असतानाच २२ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर ते २३ च्या पहाटेपर्यंत यावल तालुक्यातील वढोदा परिसरातील एका मेंढपाळ वस्तीवर सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस झाला. यात एका बालिकेसह आठ जणांना जखमी करून वस्तीवरील कोंबडय़ा रिचवित दरोडेखोरांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लुटून नेला.

धुळ्यात उद्या इलियास सिद्दीकी यांचे व्याख्यान
वार्ताहर / धुळे

सर्वधर्म संघातर्फे रविवारी, २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राजवाडे संशोधन मंडळासमोरील सेंट अ‍ॅन्स कॅथॉलिक चर्च पॅरिश सभागृहात ‘भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. इलियास सिद्दीकी यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांची औरंगाबादला भेट
जळगाव / वार्ताहर

महाराष्ट्रीयन उद्योजक व व्यावसायिकांनी व्यावसायिक आदान-प्रदान व नवीन उत्पादने तसेच तंत्रज्ञानाचा अनुभव व्हावा या उद्देशातून स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लब या जागतिक स्तरावरील संघटनेच्या जळगाव शाखेच्या सदस्यांनी नुकतीच औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रास भेट दिली. ‘एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत’ या घोषवाक्यानुसार जळगाव आणि औरंगाबाद येथील सॅटर्डे क्लबच्या सदस्यांनी उद्देशपूर्तीसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. यात ड्रेस मास्टर, डायमंड कटींग टुल्स तसेच उमा सन्स स्टील फॅब प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश होता.

भास्करराव पाटील यांचे निधन
धुळे / वार्ताहर
कुसुंबा विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहिदास पाटील यांचे थोरले बंधू निवृत्त जिल्हाधिकारी भास्करराव चुडामण पाटील (७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भास्करराव पाटील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर जवाहर मेडिकल फाऊंडेशन रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असतानाच बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. पाटील यांनी शासनाच्या विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. जळगाव जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले. मंत्रालयात सहसचिव या पदावरून ते निवृत्त झाले. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुमारे दहा वर्ष त्यांनी कामकाज पाहिले होते. पाटील यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.