Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

पुणे जिल्हय़ातील चारही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ठरविणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे शुक्रवारी शिवाजीनगरमधील शासकीय गोदामात उभारण्यात आलेल्या ‘स्ट्राँगरूम’मध्ये बंद करण्यात आली. या यंत्रांच्या बंदोबस्तासाठी गोदामाच्या परिसरात कडेकोट पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.

‘विजय माझाच’
पुणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभेच्या पुणे मतदारसंघात नीचांकी मतदान व जिल्ह्य़ातील अन्य तीन मतदारसंघातही तुलनेने कमी मतदान झाले असताना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्वच उमेदवारांनी विजयाचा जोरदार दावा केला आहे. या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अरुण भाटिया यांनी मात्र अंदाज चुकल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विकासाच्या नावाखाली जनतेच्या हातातील संसाधनांची लूट
पुणे जिल्ह्य़ातील ‘लवासा हिल सिटी’, तसेच टाटा पॉवर कंपनीची सहा आणि पवनासह महाराष्ट्र शासनाची, कृष्णा खोऱ्यातील सहा मिळून बारा धरणांचा शक्य तितका अभ्यास करून मान्यवरांच्या जनआयोगाने नुकताच पुण्यात आपला अहवाल सादर केला. श्री. अरविंद केजरीवाल (भ्रष्टाचार विरोधी, मॅगसेसे पुरस्कार विजेते), अ‍ॅड. वाय. पी. सिंग (भूतपूर्व सीबीआय अधिकारी), अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, धुळे (शेतकरी, आदिवासींच्या समस्यांचे गाढे अभ्यासक व प्रवक्ते) आणि भूतपूर्व पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचा हा अहवाल प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते आणि पत्रकारांसमोर २० एप्रिल रोजी पुण्यात मुश्रीफ यांनी सादर केला.

जैव वैद्यकीय कचरा पाच मेपासून उचलणार; पालिकेचा निर्णय
पुणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील क्लिनिक, रुग्णालयांमधील ‘जैव वैद्यकीय कचरा’ (बायो मेडिकल वेस्ट) आता पाच मेपासून उचलण्यात येणार असून, विल्हेवाटीसाठी पास्को एनव्हायरमेंटल सोल्यूशन संस्थेकडे जबाबदारी सोपविण्यात आली. आयएमए, महापालिको आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना धडे
पिंपरी, २४ एप्रिल / प्रतिनिधी

गावाला जाण्यापूर्वी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेसाठी चिंचवड पोलिसांनी चांगलेच धडे दिले. चिंचवडमधील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस व नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश जोशी, गुन्हे विभागाचे निरीक्षक राजेंद्र सावंत, फौजदार महादेव तोंदले, बांधकाम व्यावसायिक सुरेश शिरोडे, चिंचवड प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार, पद्मिनी परदेशी, प्रतिष्ठान अध्यक्ष निर्मला जगताप, कल्पना कुलकर्णी, मनीषा रानवडे, लीला वाडेकर, अपर्णा हडसूळ आदी उपस्थित होते.

विज्ञान शिबिराचे आयोजन
पुणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना विज्ञान सहज समजावे व त्यांना गोडी लागावी, तसेच विशेष यश संपादन करताना कल्पकता आणि कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार व रविवारी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. शिबिरामध्ये विज्ञानातील गमतीजमती विद्यार्थ्यांना आयुकाने विकसित केलेल्या खेळण्याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत, तसेच या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी ९९७००४३२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अक्षरधारा पुस्तक संपर्क केंद्र सुरू
पुणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी

वाचकांना अधिकाधिक उत्तम सेवा देता यावी यासाठी अक्षरधारा पुस्तक संपर्क केंद्राची सुरुवात टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे करण्यात आली आहे. पुस्तक संपर्क केंद्राचे उद्घाटन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. या वेळी दत्ता टोळ, डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. नितीन अंबिके, लक्ष्मण राठिवडेकर उपस्थित होते.पुस्तक संपर्क केंद्र पुण्यात असले तरी महाराष्ट्रातील वाचकांना या पुस्तक संपर्क केंद्राशी संपर्क साधता येईल.

कर्णबधिरांच्या पालकांसाठीच्या अभ्यासक्रमाचा उद्या समारोप
पुणे, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

कर्णबधिर बालकांच्या पालकांसाठी कॉक्लिआ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या काळे सभागृहात होणार आहे. मुंबईच्या अलिआवर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर द हिअरिंग हँडीकॅप्ड संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रंगासाई हे समारोप समारंभप्रसंगी उपस्थित कर्णबधिर मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक अ‍ॅलन परेरा व टाटा मोटर्सचे ज्येष्ठ व्यवस्थापक भास्कर उपस्थित राहणार आहेत. कर्णबधिर मुलांच्या पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दिनकर कदम यांचे निधन
पुणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी

पीएमटीतील सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक दिनकर गणपत कदम (वय ६२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. पीएमटीतील तीस वर्षांच्या सेवेत कदम यांनी विविध पदांवर काम केले होते, तसेच विविध समाजातील उपक्रमांत त्यांचा सहभाग होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.