Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कोण म्हणतो तमाशा परवडत नाही?
मंचर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

उत्तर पुणे जिल्ह्य़ात तमाशा मंडळांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असताना महागाईच्या काळात अनेक फड अनेक कारणांनी बंद पडत आहेत. अशातच निमगाव दावडी येथील आदिवासी तरुणांनी नव्याने उभारलेल्या तमाशा मंडळाने लाखो रुपयांची कमाई केलेली आहे. मास्टर सर्जेराव जाधवसह मनोजकुमार ढवळपुरीकर तमाशा मंडळ, निमगाव दावडीचे (ता. खेड) फडमालक म्हणतात, ‘कोण म्हणतो तमाशा फड परवडत नाही?’
खेड तालुक्यात एसईझेडसाठी जमिनी संपादित झाल्या. जमिनीच्या भरपाईपोटी मिळालेल्या रकमेची शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केली. निमगाव दावडी (ता. खेड) येथील आदिवासी ठाकर समाजातील दोन तरुणांनी जमिनीपोटी मिळालेल्या सुमारे ४५ लाख रुपयांतून तमाशाचा फड उभारला आणि सुमारे १५० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. बाळासाहेब जाधव व सर्जेराव जाधव हे ध्येयवेडे तरुण म्हणतात, ‘आम्ही प्रथम रस्त्यावर खडी पसरविण्याचे काम करीत होतो. एसईझेडचे पैसे मिळाल्यानंतर काय करायचे? सर्जेरावला चंद्रकांत ढवळपुरीकराचा तमाशा आवडायचा. आम्ही तमाशा मंडळ सुरू केले. कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही. शासनाची मदत नाही. पाच महिन्यांपासून तमाशा मंडळ सुरू आहे. ५ मेपर्यंत खेळाचे बुकिंग आहे. आतापर्यंत ५५ खेळ झाले आहेत.’
‘प्रत्येक खेळासाठी ३५ ते ४० हजार रुपये भाव आहे. पहिल्याच वर्षांत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नावाजलेले तमाशे डबघाईला आले असताना आम्हाला मात्र लाखो रुपये कमाई झाली आहे. तमाशा परवडत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. आम्हा दोघांना कोणतेही व्यसन नाही. तमाशात सोंगाडय़ापासून ते ट्रकचालकापर्यंतची कामे आम्ही करतो.’
सध्या तीन ट्रक, दोन जीप, दोन जनरेटर, तंबू, वाद्य आदी भरपूर साहित्य आहे. तमाशात सोंगाडय़ा, गायक, गायिका, वगनाटय़ कलाकार, मजूर आदींना त्यांच्या कामानुसार मोबदला दिला जातो. मनोजकुमार, तान्हाजी कोयेकर, साहेबराव शिंदे, उमाजी पंचरास, शिवाजी शेलार, बाळासाहेब खंडागळे आदी कलावंत आहेत.
यापूर्वी हे कलावंत मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे यांच्या तमाशा फडात होते. अंबिका (थिएटर) नाटय़ मंडळातील नृत्यांगना असल्याने सुपारी चांगली मिळते. सामाजिक वगनाटय़ ‘राजकारण गेले गुंडांच्या हाती, अर्थात गावाची माती झाली,’ ‘दख्खनचा मराठा, अर्थात संताजी घोरपडे’ असे प्रयोग लोकांना आवडतात. मोठय़ा प्रमाणात लोकनाटय़प्रेमी उपस्थित असतात. महाराष्ट्रात कोठेही आम्ही कला सादर करीत असून, शासनाने आदिवासी तरुणांच्या या उपक्रमाला पारितोषिक द्यावे, अशी आमची मागणी आहे.