Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नव्या शैक्षणिक वर्षांच्या श्रीगणेशाचा घोळ सुरू!
पुणे, २१ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, या लाखमोलाच्या प्रश्नाबाबतचा घोळ यंदा पुन्हा सुरू झाला आहे! विदर्भ वगळता १५ जूनपासून नवीन वर्ष सुरू करावे, असा आदेश गेल्याच आठवडय़ामध्ये जारी करण्यात आला असताना आज हे वर्ष आठ जूनपासून सुरू करावे, असे परिपत्रक हाती पडल्यामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या पुढाकाराने राज्यभर सर्वत्र एकाच दिवशी शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे जून २००६ साली ठरविण्यात आले. त्यासाठी विदर्भ वगळता इतरत्र जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून शाळा सुरू कराव्यात आणि विदर्भामध्ये तिसऱ्या सोमवारपासून सुरू कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु, त्यामध्ये व्यावहारिक समस्या निर्माण होत असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी निश्चित तारीख करण्यात येईल, असे ठरले. त्यानुसार २००९-१० या शैक्षणिक वर्षांचे कामकाज १५ जूनपासून सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यासाठी विदर्भासाठी ही तारीख २९ जून ठरविण्यात आली. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांनी या माहितीला दुजोरा दिला. या संदर्भातील आदेश गेल्याच आठवडय़ात जारी करण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहर व परिसरातील काही शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष आठ जूनपासून सुरू करावे, असे परिपत्रक धडकले. यापूर्वीचे परिपत्रक ताजे असतानाच माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून आलेले हे परिपत्रक पाहून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण संचालक यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनीही आपल्या खात्याकडून अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही, असे स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण विभागामध्येही अशा प्रकारच्या परिपत्रकाबाबत खात्रीलायक माहिती नव्हती. त्यामुळेच या संदर्भात येत्या दोन-तीन दिवसांमध्ये शाळांकडून प्राथमिक शिक्षण संचालकांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. ‘सर्वसाधारणपणे एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ामध्ये निकाल जाहीर केले जातात. त्या वेळी नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, याबाबत नि:संदिग्ध माहिती शिक्षक-पालकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,’ असे मत शाळांमधून व्यक्त करण्यात आले.