Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

प्रचारसमाप्तीनंतर वृत्तपत्रांमधील जाहिरातींबद्दल उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा?
कोल्हापूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

 

निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. पण दिनांक २२ आणि दिनांक २३ एप्रिल रोजी उमेदवारांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिराती या आचारसंहितेचा भंग या व्याख्येत येऊ शकतात का ? हा प्रश्न आचारसंहिता अंमलबजावणी पथकाला पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात निरीक्षक म्हणून आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीबद्दल आक्षेप घेतला आहे.
निवडणूक आयोगाने घालून दिलेली प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी कोणत्याही माध्यमातून प्रचार करायचा नाही, असे आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये म्हटले आहे. या तत्त्वांचा आधार घेऊन कोल्हापुरात निरीक्षक म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या वृत्तपत्रीय जाहिराती प्रसिध्द करता येत नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. सलग दोन दिवस वृत्तपत्रांतून आलेल्या उमेदवारांच्या जाहिराती पाहून हे निरीक्षक अचंबित झाले. त्यांनी स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असल्याचे समजते.
जाहीर प्रचार संपल्यानंतर वृत्तपत्रांतून जाहिराती सर्रास प्रसिध्द केल्या जातात. कठोर आयुक्त म्हणून देशभर ओळखले गेलेले टी.एन.शेषन यांच्या काळातसुध्दा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये उमेदवारांच्या जाहिराती प्रसिध्द झाल्या होत्या. या जाहिरातींना त्यांनीसुध्दा आक्षेप घेतलेला नव्हता. मग आत्ताच कसा काय आक्षेप घेतला जातो ? हा प्रश्न प्रशासनालाही पडला आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन प्रचाराची मुदत संपल्यानंतरही वृत्तपत्रीय जाहिरातीद्वारे प्रचार करणाऱ्या उमेदवारांच्या विरूध्द कारवाई करण्यात यावी, असे मत निरीक्षकांनी व्यक्त केले असल्याचे समजते. निरीक्षकांच्या मतानुसार स्थानिक प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.