Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शिवसेना महानगरप्रमुखाविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा
नाशिक, २४ एप्रिल / प्रतिनिधी

 

बोगस मतदानाच्या कारणावरून येथील बी. डी. भालेकर शाळेच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादंगाप्रकरणी आतापर्यंत वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका गुन्ह्य़ात भारिपच्या कार्यकर्त्यांने दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मतदानाचा कालावधी संपण्याच्या मार्गावर असताना या केंद्रात मोठा जमाव शिरल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादविवाद होवून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर सायंकाळी पाचपर्यंत झालेले मतदान ग्राह्य़ धरण्याचा निर्णय झाल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला असला तरी त्याचे पडसाद वेगवेगळ्या स्वरूपात उमटले. त्यातूनच मतदानकेंद्राच्या बाहेर दगडफेक व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर, भारिप कार्यकर्ते आनंद तेजाळे यांनी भालेकर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शिवसेनेचे महानगरप्रमुख चव्हाण यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरून चव्हाण यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काल मतदानकेंद्रवर झालेल्या वादाप्रसंगी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ व आनंद सोनवणे यांनी आपणास मारहाण केल्याची तक्रार निलेश चव्हाण यांनी पोलिसात दिली आहे. शासकीय कामकाजात अडथळा आणून गोंधळ घातल्याच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड व समर्थक तसेच राष्ट्रवादीचे समीर भुजबळ आणि समर्थक यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.