Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आकडेवारीचा घोळ
जयंत धुळप
अलिबाग, २४ एप्रिल

 

रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक होऊन २४ तास झाले तरीही, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीची अधिकृत घोषणा आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रायगड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या जाहीर केली नाही़ ही अंतिम मतदान आकडेवारी मिळविण्यासाठी गुरुवारी रात्री नऊ वाजल्यापासनू आज दुपारी १२ वाजेपर्यंत येथील वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी अथक पाठपुरावा केला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.निपुण विनायक यांनी आदेश दिल्यामुळे तब्बल २४ तासांच्या विलंबानंतर उपनिवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पुरी यांनी पत्रकार परिषद बोलावून आज संध्याकाळी ६.४० वाजता जाहीर केली. यांच्याकडून प्राप्त आकडेवारीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण मूळ मतदार संख्येत तब्बल २ हजार ९५८ मतदारांची बेहिशेबी घट झाली असल्याचे तसेच मतदानाच्या काळात रेवदंडा व रोहा येथे दोन गुन्हे दाखल झालेले असतानाही निवडणूक आयोगास ‘निल रिपोर्ट ’आज सकाळी सात वाजताच पाठविण्यात आला असल्याचीही माहिती उघड झाली आह़े
अंतिम मतदान आकडेवारी जाहीर करण्यास २४ तासांपेक्षा अधिक काळाचा विलंब लागण्या मागचे कारण पत्रकारांनी विचारले असता, डॉ.विनायक यांनी आपल्याला आता पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ती जाहीर करीत असल्याचे सांगून प्रवीण पुरी यांनी समर्पक कारण गुलदस्त्यात ठेवले.
रायगड लोकसभा मतदारोंघातील २२ जानेवारी २००९ अखेर एकूण पात्र मतदारांची संख्या १३ लाख ६० हजार ३६९ असून त्यामध्ये ६ लाख ४४ हजार ८४९ पुरुष तर ७ लाख १५ हजार ५२० स्त्री मतदार असल्याची माहिती डॉ़ निपुण विनायक यांनीच ९ मार्च रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती़ अंतिम मतदारांच्या याद्या राजकीय पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांनाही देण्यात आल्या होत्या़ पुरी यांनी दिलेल्या अंतिम मतदान माहितीनुसार रायगड मतदारसंघातील एकूण पात्र मतदारांची संख्या १३ लाख ५७ हजार ४११ नमूद करण्यात आली असून ती मूळ एकूण मतदार संख्येपेक्षा २ हजार ९५८ ने कमी आह़े यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ हजार ७०६ ने तर स्त्री मतदारांची संख्या २५२ ने कमी असल्याचेही निष्पन्न झाले आह़े अचानक कमी झालेल्या २ हजार ९५८ मतदारांबाबत स्पष्टीकरण पत्रकारानी विचारले असता, आज जी अंतिम मतदार आकडेवारी दिली आहे तीच बरोबर आहे, आधी काय आकडेवारी दिली आणि हे मतदार कसे कमी झाले याचे मला कारण सांगता येणार नाही, असे पुरी यांनी सांगितले.
रायगडच्या या एकूण मतदारांमध्ये अशी अचानक घट होण्याचे नेमके कारण काय, याची कारणमीमांसा डॉ़ विनायक यांच्याकडून मिळविण्यासाठी पत्रकारांनी आज दिवसभर त्यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु डॉ़ विनायक पत्रकारांना उपलब्ध झाले नाहीत़ त्यांच्याच कार्यालयातील मिडिया सेंटरचे प्रमुख व जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांच्याशीही पत्रकारांनी संपर्क साधला असता, तेही कमी झालेल्या मतदारांच्या संख्येबाबत माहिती देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरल़े अनेकदा माहिती मागूनही निवडणूक निर्णय अधिकारी मिडिया सेंटरला अधिकृतरित्या माहिती देत नाहीत, अशी तक्रार पवार यांनी सर्व पत्रकारांसमोर मांडली़ ‘मी डॉ़ विनायक यांच्याबरोबर पत्रकारांची आज भेट घडवून आणतो. त्यावेळी सर्व माहिती थेट त्यांच्याकडूनच तुम्ही घ्या, असा पर्याय पवार यांनी मांडला़ त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला़ परंतु डॉ़ विनायक यांनी आपणास ‘होय’ किंवा ‘नाही’ असा कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने पवार यांनी सांगितल़े परिणामी डॉ़ विनायक एकूण मतदारांच्या आकडेवारीतील तफावतीबाबत माहिती देण्यास तयारच नसल्याचे सर्व पत्रकारांना संध्याकाळी स्पष्ट झाले आणि आकडेवारीतील घोळावर शंकांचे ढग जमू लागले असल्याचे लक्षात येताच अखेर डॉ़ विनायक यांनी पुरी यांना ही पत्रकार परिषद घेण्यास सांगितल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच पत्रकारांना ऐकायला मिळाले.
रोहा तालुक्यात झोळांबे गावी टेम्पोमधून ३३ आदिवासी मतदारांची अवैध वाहतुक करून त्यांना मतदानास आणणाऱ्या संदीप म्हात्रे (२७,रा.झोळांबे-रोहा) याच्याविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात आणि ‘विशिष्ट उमेदवारासच मतदान कर अन्यथा ठार मारीन’, अशी धमकी देणाऱ्या भारत भोईर (४७,रा.बोर्लीपाडा-मुरूड)याच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही, ‘मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही’, असा ‘निल रिपोर्ट’ निवडणूक आयोगास कसा पाठविण्यात आला, असे पत्रकारांनी विचारले असता, डॉ़ विनायक यांनी आयोगास पाठविलेला ‘निल रिपोर्ट’ माझ्याकडे आहे. त्यात या दोन गुन्ह्यांची नोंद का नाही हे मी सांगू शकणार नाही, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
पुरी यांनी जाहिर केलेल्या माहितीनुसार रायगड मतदारसंघात येणाऱ्या पेण विधानसभा मतदारसंघात १२४ पुरुष तर ७३ महिला, अलिबाग विधानसभा मतदारसंघात ३०४ पुरुष तर २२३ महिला, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात १ हजार ४४३ पुरूष तर ८४ महिला आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात १३६ पुरूष तर १९९ स्त्री मतदारांची घट झाली आह़े महाड विधानसभा मतदार ४४६ पुरूष मतदारांची घट तर २७८ स्त्री मतदारांची वाढ झाली आह़े गुहागर विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून येथे २५३ पुरूष मतदारांची घट तर ४९ स्त्री मतदारांची वाढ झाली आह़े रायगड लोकसभा मतदारसंघाचे अंतिम मतदान ५६.४५ टक्के झाले असून,़विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी पेण-५६.५२ टक्के, अलिबाग- ५८.१४ टक्के, श्रीवर्धन- ५२.८२ टक्के, महाड- ५५.५७ टक्के, दापोली- ५७.०७ टक्के आणि गुहागर-५८.४३ टक्के झाल्याचे पुरी यांनी जाहीर केले. २ हजार ९५८ मतदार कमी होण्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून,उमेदवारांच्या दृष्टीने हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आह़े