Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंतिम मतदान ५७.४३ टक्के
रत्नागिरी, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अंतिम अधिकृत आकडेवारीनुसार एकूण ५७.४३ टक्के मतदान झाल्याचे आज निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले.
कोकणातील या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेला हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्टय़ा विस्तीर्ण असून, त्यामध्ये १३ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत या जिल्ह्यांच्या दुर्गम भागातून मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नव्हती. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर गायकवाड यांच्याकडे काल संध्याकाळी उपलब्ध आकडेवारीनुसार ५४.५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही जिल्ह्यांतील मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर यामध्ये सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मतदारसंघातील एकूण मतदार संख्या १२ लाख ४९ हजार ५२४ असून, त्यापैकी सात लाख १७ हजार ५४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये तीन लाख ४८ हजार पुरुष मतदार, तर महिला मतदारांची संख्या तीन लाख ६८ हजार ८२२ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे : चिपळूण- ५५.६२ टक्के, रत्नागिरी- ५७.४४ टक्के, राजापूर- ६०.७८ टक्के, कणकवली- ५५.७९ टक्के, कुडाळ- ५८.३३ टक्के आणि सावंतवाडी- ५६.८४ टक्के.
या सहा मतदारसंघांपैकी रत्नागिरी मतदारसंघात सर्वात जास्त एक लाख ३२ हजार २९३ मतदारांनी, तर कुडाळ मतदारसंघामध्ये सर्वात कमी एक लाख दोन हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. राजापूर- एक लाख २५ हजार ९४६, चिपळूण- एक लाख २२ हजार ७६८, कणकवली- एक लाख २२ हजार ५०६ आणि सावंतवाडी- एक लाख १० हजार ४५६ मतदारांनी मतदान केल्याचे चित्र पुढे आले आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा ४६ हजार ४६५ जास्त मतदारांनी मतदान केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अर्थात या मतदानाचा लाभ नेमका कोणाला होणार, याबाबत दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत. या मतदारसंघामध्ये एकूण नऊ मतदार रिंगणात असले, तरी मुख्य लढत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि भाजप-सेना युतीचे मावळते खासदार सुरेश प्रभू यांच्यात आहे. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ. जयेंद्र परुळेकर किती मते घेतात आणि त्याचा फटका कोणाला बसतो, याबाबतही उत्सुकता आहे.