Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘मनाची स्पंदने शब्दरूप घेतात आणि साहित्य निर्माण होते’
कर्जत, २४ एप्रिल/वार्ताहर

 

कोणतेही साहित्य हे काही आकाशातून पडत नाही. आपल्या मनाची स्पंदने शब्दरूप घेतात आणि त्यातूनच साहित्य निर्माण होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांनी येथे केले.
‘श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालया’च्या वतीने दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या ‘वाचक कट्टय़ा’च्या अभिनव उपक्रमाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विजया पेठे, कार्याध्यक्षा सुचेता जोगळेकर, खजिनदार पद्माकर गांगल आणि कार्यवाह दीपक बेहेरे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी गिरिजा कीर यांनी त्यांच्या ‘जन्मठेप’ या आगामी पुस्तकाच्या जन्माची कहाणी सांगितली. काहीवेळा शब्द हे मुळातच एवढे प्रभावी आणि घणाघाती असतात की, ते आपले अस्तित्व नाहीसे करून टाकतात. स्वातंत्र्य हे कधीही मागून मिळत नसते, ते मिळवावे लागते, असेही त्या पुढे म्हणाल्या. त्यांच्या या कथाकथनपर भाषणास उपस्थित श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी साहित्यिक वसंत जोशी, शंकर डोंगरे, मनोहर रणदिवे, जयश्री गांगल, मोहन ठोसर, प्रशांत कारुळकर, दिनू पुराणिक, उत्तरा वैद्य, जनार्दन परांजपे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कीर यांच्या हस्ते सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन करून या समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. सुचेता जोगळेकर यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेच्या सदस्यांव्यतिरिक्त वाचक कट्टय़ाच्या उपक्रमातील अन्य वक्ते मीरा वैद्य, मृदुला गडनीस, प्रज्ञा अत्रे, रश्मी बेहेरे, भारती भालेराव, कल्याण ठाकूरदेसाई, वृंदा ठाकूरदेसाई, डॉ. माधवी ठाकूरदेसाई, नितीन आरेकर आणि सुधीर भावे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बेहेरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कीर यांनी काही स्वलिखित पुस्तके यावेळी वाचनालयास भेट दिली. संस्थेचे सहचिटणीस सारंग जोशी यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. पद्माकर गांगल यांनी सर्वांचे आभार मानले.