Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

माखजन धरण प्रकल्पाला चालना मिळण्याची गरज
संगमेश्वर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

वातावरणातील वाढत्या तापमानामुळे वेगाने कमी होणारे जलस्रोत, पाणीयोजनांमध्ये असणारा नियोजनाचा अभाव यामुळे कोकणच्या विविध भागात जाणवणारी पाणीटंचाई दरवर्षी उग्ररूप धारण करत असून, माखजन-सरंद येथील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. शासनाने सरंद येथे धरण उभारणीसाठी निधीसह मंजुरी दिली असून, विविध कारणांनी गेल्या दोन वर्षांंत हे काम प्रत्यक्ष सुरू न झाल्याने परिसरातील पाणीटंचाईला आळा घालणे अशक्य होऊ लागले आहे. या धरण उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याची गरज असून, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथून आठ कि.मी. अंतरावर असणाऱ्या माखजन या गावात फेब्रुवारी महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. येथे असणाऱ्या नळपाणी योजनांचे नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्यानंतर या योजनाही कुचकामी ठरतात. त्यातच माखजन येथे नव्याने कोटय़वधी रुपये खर्च करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवी योजना हाती घेतली जात असून, या योजनेत आरवली येथून पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याचे नियोजन आहे. सध्याच्या काळात पाणीयोजनांची केली जाणारी कामे दर्जेदार नसतात, असा आरोप वारंवार केला जातो. पाणी योजनेतील पाइपचा दर्जा, पाइप जमिनीत पुरण्याऐवजी वरच्या वर ठेवणे, अंदाजपत्रक कमालीचे वाढवून योजनेचा खर्च वाढविणे अशा विविध कारणांमुळे कोटय़वधी रुपये खर्चाच्या पाणीयोजनांची देखभाल दुरुस्ती करणे ग्रामपंचायतीच्या ताकदीपलिकडचे ठरते आणि कालांतराने अशा मोठय़ा योजना बंद पडतात व शासनाचे कोटय़वधी रुपये शेवटी ‘पाण्यात’च जातात, असे आजवरचे अनेक अनुभव आहेत.
माखजन गावासाठी दूर अंतरावरून पाणी आणण्याची योजना आखण्यापेक्षा सरंद येथे आठ कोटी रुपये खर्चाचे निधीसह मंजुरी मिळालेल्या धरण प्रकल्पाचे काम हाती घेतले गेले तर परिसरातील सरंद-माखजनसह आणखी अनेक गावांची पाणीटंचाई संपुष्टात येऊ शकेल. गत दोन वर्षांंपासून येथील धरण प्रकल्पाचा निधी पडून आहे. या धरण प्रकल्पामुळे कोणत्याही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नसून, केवळ सरकारी दराने जमिनीचा मिळणारा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नसल्याने या प्रकल्पाला काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कष्टकरी मंडळीचे व शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्यांनी या भागातील अन्य लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भविष्यातील भीषण पाणीटंचाईची तीव्रता शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणे आवश्यक असून, फेब्रुवारीपासून हंडाभर पाण्यासाठी या भागातील महिलांची उन्हातान्हातून होणारी वणवण थांबविण्यासाठी माखजन-सरंद येथे निधीसह मंजूर असणाऱ्या छोटय़ा मातीच्या धरण प्रकल्पाला चालना मिळण्याची आज खरी गरज आहे.