Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शाळांमधील उन्हाळी सुट्टीचा निकष बदलण्याची प्रक्रिया
दापोली, २४ एप्रिल/वार्ताहर

 

रत्नागिरी जिल्हा परिषदेने शाळांतील ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीचा निकष बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांचे कामकाज १६ मेपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजन सुविधाही कायम ठेवण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील सुट्टीचा कालावधी एकच म्हणजे ४ मेनंतर ४५ दिवसांपर्यंत निश्चित करण्यात यावा, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. साहजिकच, तत्पूर्वी ४ मे ते ५ जूनपर्यंत असलेली शालेय उन्हाळी सुट्टी वाढविण्याचा निर्णय शिक्षण खात्याला जारी करावा लागला. यामुळे शाळा सुरू होण्याचा कालावधी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात येऊन पोहोचला. रत्नागिरी जिल्हा परिषदेने मात्र सर्वशिक्षा अभियानांतर्गत होणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणाच्या पाश्र्वभूमीवर ही सुट्टी ४ मेऐवजी १६ मेपासून सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
या प्रस्तावामुळे शाळांमध्ये १६ मेपर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांंनाही माध्यान्ह भोजनाची सुविधा मिळणार असून, गुणवत्ता विकास कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार हा ४५ दिवसांचा सार्वत्रिक सुट्टीचा निकष रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी शिथिल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळात परीक्षा संपल्यानंतर जवळपास २ मे रोजी निकाल जाहीर करून सुट्टी लागते. मात्र अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतरच अनुपस्थित राहतात. अशा वेळी माध्यान्ह भोजनाची सुविधा देऊन विद्यार्थ्यांना शाळांकडे आकर्षित केले जाते, मात्र अजूनही अनुपस्थितीचे प्रमाण लक्षणीयच राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर १६ मेपर्यंत भोजन सुविधा दिल्यास यात काही फरक पडेल, असा जिल्हा परिषदेचा अंदाज आहे.