Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पाण्यासाठी सुरू झाली सर्वांचीच वणवण!
संगमेश्वर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्यातील ओढे व नद्या कोरडय़ा पडल्याने प्राणी, पशुपक्ष्यांसह माणसांचीही पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. रानावनातील जलाशयही रिते झाल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात फिरू लागले आहेत.
या वर्षी वातावरणातील उष्मा वाढला आहे. शेतकरी वर्गाच्या भाजावळी सुरू असल्याने वणव्यांचे प्रमाण वाढत असल्याने तापमानात अधिकच वाढ होत आहे. या वाढत्या उष्म्याला तोंड देणे अश्यक्य झाले असतानाच जलस्रोत वेगाने कमी होऊ लागले आहेत. नद्या-नाले, ओढे व विहिरी कोरडय़ा पडत असल्याने पाण्यासाठी जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळच्या वेळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेणे अशक्य बनल्याने शेतकरी वर्गापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपूर्वी ऐन मे महिन्यात गोठय़ातील जनावरांना वाहत्या ओढय़ावर आंघोळ घालणे, पाणी पाजणे दिवसातून दोन वेळा शक्य होत असे. आता हेच ओढे कोरडे पडल्याने माणसांप्रमाणे जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
ज्याप्रमाणे मानवी वस्तीजवळील जलस्रोत आटले अथवा संपुष्टात आले आहेत, त्याचप्रमाणे ते रानावनातही आटले असल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीच्या आसपास यावे लागते. येथे वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसून येत असल्याने हे प्राणी पाणी व भूक यासाठीच वनातून बाहेर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सखलभागापासून उंचावर वास्तव्यास असणाऱ्या मंडळींना पाण्याची भरलेली भांडी घेऊन घाटी चढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी अशी वणवण महिलांनाच करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.