Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शिक्षक पतपेढी कारभाराच्या समर्थनार्थ होणार प्रतिआंदोलन
देवरुख, २४ एप्रिल/वार्ताहर

 

शिक्षक पतपेढीच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये धुमसत असणाऱ्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी पतपेढीचे माजी अध्यक्ष विनायक हातखंबकर यांनी २ मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र शिक्षक पतपेढीच्या कारभाराला नाहक बदनाम करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी, तसेच सभासदांत कोणताही असंतोष नाही, हे दाखवून देण्यासाठी त्याच दिवशी प्रतिआंदोलन उभारण्याचा इशारा प्राथमिक शिक्षण समितीचे चिटणीस रूपेश जाधव यांनी दिला आहे.
आंदोलनाला त्याच दिवशी प्रतिआंदोलन करण्याच्या आव्हानामुळे शिक्षक पतपेढीतील शह-काटशहाच्या परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. आंदोलनाला प्रतिआंदोलनाचे आव्हान देण्याचा प्रकारही शिक्षक पतपेढीच्या इतिहासात प्रथमच घडणार आहे. सभासदांना वेळेवर कर्ज मिळत नसल्याची ओरड अत्यंत चुकीची असून, संगमेश्वर तालुक्यात आजपर्यंत वेळेत कर्ज न मिळाल्याचे एक जरी उदाहरण विरोधकांनी दाखविल्यास तात्काळ राजीनामा देण्याची तयारी दिलीप महाडिक यांनी दर्शविली आहे. प्रतिआंदोलनात कर्ज किती वेळेवर मिळत आहे याची तारीख व वेळेनुसार तपशील सभासदच देतील आणि वस्तुस्थिती नजरेत आणतील, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. पतपेढीच्या कारभाराच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षक पतपेढीची दरमहा वसुली सव्वातीन कोटींची असून, अडीच कोटींचे कर्जवितरण होत आहे. दरमहा सेवानिवृत्त शिक्षकांकडून २५ लाखांच्या ठेवी जमा केल्या जात आहेत. कर्ज वेळेत नसल्याची विरोधकांची ओरड असताना पतपेढीच्या सूचना वहीत तशी एकाही सभासदाची तक्रार दाखल नसल्याचा दावाही जाधव यांनी केला आहे.
मार्च महिन्याचा पगार दरवर्षी उशिराने जमा होत असतो, या तांत्रिक अडचणीचा फायदा उठवून विरोधकांनी या काळात जास्तीत जास्त ओरड केल्याचेही सभासदांच्या निदर्शनास आणले जाणार आहे. विनायक हातखंबकर, रेडीज यांच्या सत्ता कारकीर्दीत मुदत ठेवी रोखीने स्वीकारल्याबद्दल पतपेढीला ७० लाखांचा दंड आयकर खात्याने ठोठावला आहे, याचा पर्दाफाशही प्रतिआंदोलनात करणार असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
पतपेढीच्या चांगल्या कारभाराला नाहक गालबोट लावण्याचा प्रकार हाणून पाडण्याचा चंग सभासदांनीच बांधला असून, त्याचे प्रत्यंतर २ मे रोजीच प्रतिआंदोलनातून दिले जाईल, असेही ते म्हणाले.