Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला मतदारांचा उत्साह
सावंतवाडी, २४ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ टक्के मतदान झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजाविला आहे. सर्वाधिक मतदान कणकवली विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्याचा फटका कोणाला बसतो, हे येत्या १६ मे रोजी मतमोजणीप्रसंगी समजणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत पाच लाख ८६ हजार ४८१ मतदार आहेत. त्यातील तीन लाख ३५ हजार ५४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यातही महिला मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर आल्या.
कणकवली विधानसभा मतदारसंघात देवगड, वैभववाडी व कणकवली तालुक्यांचा समावेश आहे. तेथे सर्वाधिक ६०.६१ टक्के मतदान झाले. कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ व मालवण तालुक्यांचा समावेश असून, ५५.७९ टक्के मतदान झाले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी-दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांचा समावेश आहे. तेथे ५४.३३ टक्के मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ७२ हजार ९२० पुरुष व एक लाख ६२ हजार ६२२ महिलांनी हक्क बजावला.