Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
राज्य

कोण म्हणतो तमाशा परवडत नाही?
मंचर, २४ एप्रिल/वार्ताहर

उत्तर पुणे जिल्ह्य़ात तमाशा मंडळांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असताना महागाईच्या काळात अनेक फड अनेक कारणांनी बंद पडत आहेत. अशातच निमगाव दावडी येथील आदिवासी तरुणांनी नव्याने उभारलेल्या तमाशा मंडळाने लाखो रुपयांची कमाई केलेली आहे. मास्टर सर्जेराव जाधवसह मनोजकुमार ढवळपुरीकर तमाशा मंडळ, निमगाव दावडीचे (ता. खेड) फडमालक म्हणतात, ‘कोण म्हणतो तमाशा फड परवडत नाही?’

नव्या शैक्षणिक वर्षांच्या श्रीगणेशाचा घोळ सुरू!
पुणे, २१ एप्रिल/खास प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, या लाखमोलाच्या प्रश्नाबाबतचा घोळ यंदा पुन्हा सुरू झाला आहे! विदर्भ वगळता १५ जूनपासून नवीन वर्ष सुरू करावे, असा आदेश गेल्याच आठवडय़ामध्ये जारी करण्यात आला असताना आज हे वर्ष आठ जूनपासून सुरू करावे, असे परिपत्रक हाती पडल्यामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

प्रचारसमाप्तीनंतर वृत्तपत्रांमधील जाहिरातींबद्दल उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा?
कोल्हापूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. पण दिनांक २२ आणि दिनांक २३ एप्रिल रोजी उमेदवारांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिराती या आचारसंहितेचा भंग या व्याख्येत येऊ शकतात का ? हा प्रश्न आचारसंहिता अंमलबजावणी पथकाला पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात निरीक्षक म्हणून आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीबद्दल आक्षेप घेतला आहे.

शिवसेना महानगरप्रमुखाविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा
नाशिक, २४ एप्रिल / प्रतिनिधी

बोगस मतदानाच्या कारणावरून येथील बी. डी. भालेकर शाळेच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादंगाप्रकरणी आतापर्यंत वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका गुन्ह्य़ात भारिपच्या कार्यकर्त्यांने दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संगमेश्वरजवळ अपघातात बोरिवलीचे दाम्पत्य ठार
संगमेश्वर, २४ एप्रिल/वार्ताहर

मुंबईहून रत्नागिरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात संगमेश्वरनजीक वांद्री येथे आज दुपारी साडेतीन वाजता घडला. जयंत नागवेकर (६८) व मीना जयंत नागवेकर (६५) रा. शांतीनगर, रत्नागिरी या वृद्ध दाम्पत्याचा मृतांमध्ये समावेश आहे. इनोव्हा चालक उदय मयेकर, ऊर्वी मयेकर (७), चिराग नागवेकर (१०) हे जखमी झाले. नागवेकर दाम्पत्य मूळचे बोरिवलीचे राहणारे होते.

नशेत वडिलांचा खून करणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी
मिरज, २४ एप्रिल / वार्ताहर

दारूच्या नशेत जन्मदात्याचा खून केल्याप्रकरणी मिरज तालुक्यातील सोनी येथील डॉ. नामदेव निवृत्ती वाघ (वय ४५) याला येथील न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी दिली. तिसऱ्या लग्नास विरोध केल्याच्या कारणावरूनच डॉ. वाघ याने आपल्या वडिलांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. डॉ. नामदेव वाघ (४५) हा सोनी ग्रामपंचायतीनजीक नामदेव पाटील यांच्या घरी भाडय़ाने राहण्यास आहे. या ठिकाणीच त्याने दवाखाना थाटला असून तेथे तो वैद्यकीय व्यवसाय करतो. गुरुवारी सकाळी त्याचे वडील निवृत्ती बाबूराव वाघ (८०) हे करोली (एम)हून त्याला भेटण्यासाठी आले होते. त्या वेळी तिसऱ्या लग्नास विरोध केल्याचा राग आल्याने चिडून जाऊन डॉ. वाघ याने टेबल फॅन वडिलांच्या डोक्यात घालून त्यांना जबर जखमी केले होते. त्यात ते जागीच ठार झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमर देसाई यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन या आरोपीला अटक केली होती. त्या वेळी तो दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक दीपक देवराज यांनी त्याची चौकशी केली असता संशयिताने असंबंध उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आज त्याला येथील न्यायालयापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

गुंजाळ प्रतिष्ठानचे राजमाता पुरस्कार जाहीर
नाशिक, २४ एप्रिल / प्रतिनिधी

मालेगाव येथील आर. एस. गुंजाळ प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ महिलांना २७ एप्रिल रोजी राज्यस्तरीय राजमाता गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.हिराबाई गायकवाड, शांताबाई छाजेड, इंद्रामणी मोरे, प्रा. अन्सारी फैमीदा, रजनी सोनवणे, वैदेही परमार, अश्विनी रक्ताटे, मंजु ढंढारिया, विजया सूर्यवंशी, व्दारका खैरनार, सोनाली छाजेड यांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला असून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथे अशोका इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सायंकाळी चारला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. दादा भुसे, पंचायत समिती सभापती बंडु बच्छाव उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जिभाऊ गुंजाळ हे राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन विजय सूर्यवंशी, अमोल गुंजाळ यांनी केले आहे.

नाशिकमध्ये आज डीएनए दिनानिमित्त प्रदर्शन
नाशिक, २४ एप्रिल / प्रतिनिधी
येथील जेनेटीक हेल्थ अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर संस्थेतर्फे शनिवारी जागतिक डीएनए दिनानिमित्त एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. डी. के. चोपडे यांनी दिली. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सायंकाळी सहाला हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाद्वारे डीएनएबद्दल सर्वसामान्य जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आणि जनुकीय आराखडय़ाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डीएनए, जीन्स, क्रोमोझोम यांचे जिवंत नमुने पहायला मिळणार आहेत. याशिवाय यानिमित्ताने प्रात्यक्षिके व चर्चासत्र घेण्यात येणार आहे. डीएनए बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

योगम् शरणमतर्फे योग विषयावर व्याख्यान
नाशिक, २४ एप्रिल / प्रतिनिधी
योगम् शरणम् या संस्थेतर्फे येथे २७ एप्रिल रोजी सायंकाळी सहाला परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ‘निरामय व यशस्वी जीवनाची योगसूत्रे’ या विषयावर ठाण्यातील घंटाळी मित्रमंडळाचे अण्णासाहेब व्यवहारे यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. सायंकाळी सहा ते आठ दरम्यान हे व्याख्यान होणार आहे. आयकर खात्याच्या पुणे विभागाचे मुख्य आयुक्त एम. नरसिंहप्पा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून क्रीडासमुपदेशक भिष्मराज बाम हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याा समारंभात संस्थेतर्फे ‘स्वामी निरंजन योग शिष्यवृत्ती’ या अनोख्या उपक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. याशिवाय नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मेधा संस्कार शिबीर नऊ व १० मे तसेच ३१ मे व एक जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सत्यानंद योग केंद्राच्या सुजाता भिडे हे ३१ मे रोजी सायंकाळी पाच ते सात, एक जून रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत संस्कार वर्ग घेण्यात येणार आहे. ही दोन्ही शिबिरे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून जास्तीजास्त युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.