Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
क्रीडा

..सचिन देव आहे!
सचिन तेंडुलकरवरील पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, २४ एप्रिल / क्री.प्र.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत असला तरी ‘तेंडुलकर्स’ हे सचिनचे दक्षिण मुंबईतील रेस्टॉरन्ट मात्र आज त्याच्या वाढदिवसानिमित्त गजबजलेले होते. कारण होते, सचिनवरच लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सचिनच्या झळाळत्या कारकीर्दीवर आतापर्यंत असंख्य पुस्तके लिहिली गेली.

कर्णधाराने दाखविलेला विश्वास हीच मोठी ताकद - कामरान खान
नवी दिल्ली, २४ एप्रिल / पीटीआय

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कामरान खानला कर्णधार शेन वॉर्न याने दाखवलेला विश्वास सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो. कर्णधाराचा विश्वास माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे कामरानने म्हटले आहे.अगदी वीस षटके संपल्यानंतरही सामना टाय झाल्याने एक अतिरिक्त षटक खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. एका षटकात १६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी रॉयल्सच्या सलामीच्या फलंदाजांना फारसे परिश्रम घ्यावे लागले नाही.

स्ट्रॅटेजी ब्रेकचा निर्णय आयपीएलनंतर
दरबान, २४ एप्रिल/ वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत सामन्यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या साडेसात मिनिटांच्या विश्रांतीवर (स्ट्रॅटेजिक ब्रेक) खेळाडू व प्रशिक्षकांकडून टीका होत असली, तरी याबाबत स्पर्धा संपल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे ‘आयपीएल’ चे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी स्पष्ट केले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत सामन्यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या साडेसात मिनिटांच्या विश्रांतीवर सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग याच्यासह अनेक खेळाडूंनी टीका केली आहे.

मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आज परस्परांना भिडणार
दरबान, २४ एप्रिल / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत एकही लढत न गमावणारे मुंबई इंडियन्स व डेक्कन चार्जर्स हे संघ उद्या एकमेकांना आव्हान देणार आहेत. दोन्ही संघांनी केलेली आतापर्यंतची कामगिरी पाहता ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. डेक्कन चार्जर्सने झालेल्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत तर मुंबई इंडियन्सने एक लढत जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या लढतीदरम्यान पावसामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.

नाइट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्जची आज परीक्षा
केप टाऊन, २४ एप्रिल / पीटीआय

एकीकडे मुंबई इंडियन्स व डेक्कन चार्जर्स हे आघाडीवर असलेले संघ उद्या परस्परांशी झुंजणार आहेत आणि त्यानंतर त्याच मैदानावर गाठ पडणार आहे, चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स या संघांची. कोलकाता नाइट रायडर्स संघाला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच नशिबाने साथ दिलेली नाही. डेक्कन चार्जर्सने त्यांना पहिल्याच सामन्यात पराभूत केले होते. पण पंजाबच्या संघाविरुद्ध विजय मिळवून त्यांनी स्वत:ला सावरले. मात्र काल राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात पुन्हा एकदा विजयाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे उद्या त्यांच्यादृष्टीने लढत महत्त्वाची असेल. चेन्नई सुपर किंग्जने या स्पर्धेतील सर्वोच्च धावंसख्या गाठण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांचे प्रयत्न कमी पडले. दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांना मात दिली होती. राजस्थान रॉयल्सला नमवून त्यांनी आपले खाते उघडण्यात यश मिळविले.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी फ्लिन्टॉफ मायदेशी रवाना
दरबान, २४ एप्रिल/वृत्तसंस्था

उजव्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्रय़ू फ्लिन्टॉफ याला आय.पी.एल.मधून माघार घेत मायदेशी रवाना व्हावे लागले आहे. त्यामुळे फ्लिन्टॉफला किमान तीन ते पाच आठवडे सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. शस्त्रक्रियेमुळे फ्लिन्टॉफला ६ मेपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. मात्र जून महिन्यात होणारी आय.सी.सी. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेसाठी तो फिट ठरेल अशी इंग्लंडला आशा आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळत असताना त्याचा उजवा गुडघा दुखू लागला होता. चेन्नईच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी निकपियर्स यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी स्कॅनिंगचे अहवाल पाहून त्याला तडक मायदेशी परतण्याचा सल्ला दिला.

शेन वॉर्नकडून कामरान, युसूफ पठाणचे कौतुक
केप टाऊन, २४ एप्रिल / पीटीआय
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध रोमहर्षक विजय मिळविणाऱ्या राजस्थान रॉयलचा कर्णधार शेन वॉर्न याने आपल्या संघातील तरुण गोलंदाज कामरान खान तसेच स्फोटक फलंदाज युसूफ पठाण यांच्यावर कौतुकाची बरसात केली आहे. काल सुपर ओव्हरमध्ये या दोन खेळाडूंनी समयसूचकता दाखविल्यामुळे राजस्थान संघाचा एक अविस्मरणीय विजय साकारला होता. वॉर्न म्हणाला की, पठाणने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहणे औत्सुक्याचे होते. कामरानचे कौतुक करताना वॉर्न म्हणाला की, कामरानने आधीही चांगली गोलंदाजी केली होती. सुपर ओव्हरमध्ये मी स्वत:चा आणि पठाणचा गोलंदाजीसाठी विचार करीत होतो, पण नंतर मी कामरानवर विश्वास टाकला आणि त्याने आम्हाला निराश केले नाही.पठाणने सुपर ओव्हरमधील खेळी आपल्या कारकीर्दीला एक वेगळे वळण देईल, असा विश्वास प्रकट केला.

पाकिस्तानने सर्वच मालिका त्रयस्थ ठिकाणी ठेवाव्या - आयसीसी
कराची, २४ एप्रिल / वृत्तसंस्था
पाकिस्तानात येण्यास कोणताच संघ तयार नसल्याने पाकिस्तान मंडळाने आपल्या संघाच्या मालिका त्रयस्थ ठिकाणी ठेवाव्यात, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान मंडळाला कळविले आहे. पाकिस्तानने आपल्या पूर्वनियोजित मालिका दुबई, आर्यलड, इंग्लंड या सारख्या त्रयस्थ ठिकाणी ठेवल्यास ते सर्वाच्याच दृष्टीने चांगले होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉरगॅट यांनी सांगितल्याचे द न्यूज या वृत्तपत्रातील बातमीत म्हटले आहे.

मावळी मंडळ कबड्डी : बजरंग, बंडय़ा मारुती, अमर हिंदची आगेकूच
मुंबई, २४ एप्रिल/क्री.प्र.

श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित ५८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटातील चुरशीच्या सामन्यात कल्याणच्या जय बजरंग मंडळाने कांजूरमार्गच्या छत्रपती क्रीडा मंडळाचा ३४-२९ असा पाच गुणांनी पराभव केला. छत्रपती क्रीडा मंडळाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत भराभर गुण मिळवून १६-११ अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती. परंतु मध्यंतरानंतर जय बजरंग मंडळच्या स्वप्नील भालेराव व संकेत कलगोंडा यांनी अतिशय शिस्तबद्ध खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या हळूहळू वाढवून संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून मंगेश घाग व मोहन चव्हाण यांनी सुंदर खेळ केला. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या बंडय़ा मारुती संघाने उपनगरच्या टागोर संघाचा २८-२० असा ८ गुणांनी पराभव केला. बंडय़ा मारुती संघाच्या निलेश लाड व जितेश सापते यांनी सुंदर पकडी केल्या. त्यांना दयानंद सुतार अष्टपैलू खेळाने साथ दिली. पराभूत संघाकडून मनोज साळेकर चांगला खेळला. महिला गटात मुंबई शहराच्या अमर हिंद क्रीडा मंडळाने ठाण्याच्या न्यू वर्तकनगर स्पो. क्लबचा ४४-१४ असा धुव्वा उडवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अमर हिंद क्रीडा मंडळाच्या अक्षया गोसावी व भक्ती इंदूलकर यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ करीत मध्यंतराला २६-८ अशी निर्णायक आघाडी घेत सामना एकतर्फी जिंकला. पराभूत संघाकडून माधवी मोहिते छान खेळली.

एटीपी टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली, २४ एप्रिल / पीटीआय

प्रकाश अमृतराज व हर्ष मंकडच्या पराभवानंतर आज एटीपी यूएसडी टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. उपान्त्य सामन्यात अमेरिकेच्या सातव्या मानांकित जॉन इस्नरने प्रकाश अमृतराजला ७-६ (७-५), ३-६, ४-६ असा पराभव केला. त्यानंतर दुहेरी गटातही भारताच्या हर्ष मंकड व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मार्टीन फिश्चर यांनी निराशा केली.