Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

उद्यापासून येऊर येथे परशुराम महायज्ञ
ठाणे/प्रतिनिधी : येऊर येथील सदानंदबाबांच्या आश्रमात २६ ते २८ एप्रिल दरम्यान ‘भगवान परशुराम महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. परशुराम सेनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी ही माहिती दिली. २७ एप्रिल रोजी अक्षय्यतृतीया असून त्याच दिवशी परशुराम जयंती आहे. तीन दिवस साजऱ्या होणाऱ्या महायज्ञात आहुती देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंद सहभागी होणार आहे. आजवर झालेल्या परशुराम महायज्ञात भारतातील सर्व पीठांचे जगद्गुरू शंकराचार्य सहभागी झाले होते. समाज एकत्र यावा, त्याने आपली संस्कृती व परंपरेचे रक्ष.

कळवा येथील कम्युनिटी सेंटरचे नूतनीकरण
ठाणे/प्रतिनिधी : डाऊ केमिकलने कळवा येथील एमआयडीसीतील कम्युनिटी सेंटर पुन्हा सुरू केले. याप्रसंगी नवी मुंबई पालिका आयुक्त विजय नाहटा, डाऊ इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. रमेश रामचंद्रन, संचालक चंद्रकांत नाईक हे उपस्थित होते. कळवा येथील रहिवाशांप्रती आपल्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून डाऊ इंडिया या कम्युनिटी सेंटरचे नूतनीकरण हाती घेतले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या नवीन उद्घाटन केलेल्या केंद्राचा ताबा घेतला.

‘दोन भावांच्या कुरबुरीत रस न घेता बहिणी भावालाच विजयी करतील’
डोंबिवली/प्रतिनिधी - ‘घडय़ाळ आणि हात’ या दोन भावांमध्ये थोडी कुरबूर असली तरी, बहिणी माहेरी आल्या की त्या भावांची समजूत काढून भावांनाच मदत करतात. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्यां आज महिला मेळाव्याच्या निमित्ताने माहेरी आल्या आहेत. त्या दोन्ही भावांमध्ये काय चाललंय याचा विचार न करता, आपला भाऊ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार वसंत डावखरे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या महिला अध्यक्षा पुष्पाताई बोंडे यांनी मंगळवारी येथे केले.

पालघरसाठी भाजपचा स्वतंत्र जाहीरनामा
ठाणे/प्रतिनिधी - पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा प्रतिसाद पाहता शिवसेना-भाजपचे उमेदवार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचा विजय निश्चित असून, काँग्रेस, कम्युनिस्ट व बहुजन विकास आघाडीपैकी दोन क्रमांकावर कोण राहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज वसई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठाण्यात आज पाणी नाही
ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने या काळात कोलशेत, बाळकूम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंब्रा- कौसा, वृंदावन व श्रीरंग सोसायटी या भागांत पाणीपुरवठा होणार नाही. तसेच पुढील एक-दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने कळविले आहे.

अनंत कुलकर्णी यांचे निधन
कल्याण/वार्ताहर - येथील ज्येष्ठ नागरिक व सुभेदार वाडा शाळेतील माजी शिक्षक अनंत नारायण कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अ. ना. कुलकर्णी १९४८ ते १९८१ या कालखंडात सुभेदारवाडा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. या कालखंडातील त्यांच्या अनुभवांवर आधारित त्यांचे चिरंजीव डॉ. विजय कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेले ‘मागोवा- एक मनोगत’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच गुढीपाडव्याला सुभेदारवाडा शाळेत झाला होता. त्यांच्या निधनाने कल्याणमधील शिक्षण क्षेत्रातील एका पर्वाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांनी व्यक्त केली आहे.

अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार
ठाणे/प्रतिनिधी - कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अश्पाक अली अश्रफ अली सिद्दीकी मुस्लिम हे आपल्या मुलासह जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना काल मुंब््रयात घडली. यापूर्वी मुस्लिम यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.