Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तालिबानी दहशतवाद्यांची बुनेरमधून माघार
इस्लामाबाद, २४ एप्रिल/पीटीआय

 

तालिबानी दहशतवादी इस्लामाबादच्या निकट आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढल्यानंतर आता एका करारान्वये तालिबानने बुनेर या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणाहून माघार घेण्यास प्रारंभ केला आहे. हे तालिबानी दहशतवादी आता स्वात खोऱ्यातील त्यांच्या बालेकिल्ल्याकडे परत निघाले आहेत. कट्टर धर्मगुरू सूफी महंमद यांनी तालिबानच्या माघारीसाठीच्या या करारात पुढाकार घेतल्याचे समजते.
तालिबानचा प्रवक्ता मुस्लिम खान याच्या वक्तव्याचा हवाला देऊन डॉन टीव्हीने सांगितले, की स्वात खोऱ्यातील तालिबानचे प्रमुख कमांडर मुल्ला फजलुल्ला यांनी तालिबानी योद्धय़ांना बुनेरमधून माघारी येण्यास सांगितले आहे. तालिबानी नेते कारी मुहंमद खान व मुस्लिम खान तसेच मलकंदचे विभागीय आयुक्त सय्यद मुहंमद जावेद यांनी मध्यस्थ मौलवी सूफी महंमद यांच्या उपस्थितीत हा करार केला.
या समझोता करारानंतर लगेचच तालिबानी दहशतवाद्यांनी बुनेरमधून माघारी जाण्यास प्रारंभ केला. हे ठिकाण राजधानीपासून केवळ १०० कि.मी अंतरावर आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी अमेरिकेला असे आश्वासन दिले होते, की पाकिस्तानात दहशतवाद्यांना समांतर प्रशासन चालवण्याची संधी दिली जाणार नाही. दरम्यान, पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात असतानाच पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी संसदेत सांगितले, की पाकिस्तानचे संरक्षण हे सुरक्षित हातांमध्ये आहे व अण्वस्त्रसाठाही सुरक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून तालिबानी दहशतवाद्यांनी बुनेर व शांगला या दोन जिल्हय़ांचा ताबा घेतला होता. तेहरिक-ए-निफाज-ए-शरिया-मुहंमदी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे प्रमुख सूफी यांनी स्वात करारासाठी वाटाघाटी केल्या होत्या. आता त्यांनीच या दहशतवाद्यांना माघारी पिटाळण्यासाठी मन वळवले. बुनेरच्या मुख्य रस्त्यावर तालिबानी दहशतवाद्यांची गस्त सुरूही झाली होती. शांगला जिल्हय़ातही तालिबान्यांचा वावर वाढला होता, हे ठिकाण तर इस्लामाबादपासून ६० कि.मी अंतरावर आहे.