Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

चंद्रपुरातील विहिरीत सापडली ४५ जिवंत काडतुसे
चंद्रपूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

येथील रामाळा तलावाला लागून असलेल्या विहिरीच्या साफसफाईचे काम सुरू असताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ४५ जिवंत काडतुसे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वी रामाळा तलावात हजारो जिवंत काडतुसे मिळाली होती. दरम्यान, ही काडतुसे कोठून आली? याचा शोध पोलीस घेत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामाळा तलावातील जलपर्णी वनस्पती साफसफाईचे काम गुरुकृपा असोसिएट्स व सिंचन विभागाच्या वतीने सुरू आहे. तलाव साफ करतानाच लागून असलेल्या पुरातन विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आज सकाळपासून कामगार गाळ काढत असताना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास विहिरीत प्लॅस्टिकची पिशवी मिळाली. कामगारांनी ही पिशवी बाहेर काढून उघडून बघितली असता त्यात जिवंत काडतुसे मिळाली.

वर्धा जिल्ह्य़ातील ३६ गावांचे जलस्वराज्य प्रकल्प बंद
वर्धा, २४ एप्रिल / प्रतिनिधी

दुष्काळग्रस्त वर्धा जिल्ह्य़ातील ३६ गावांत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेले प्रकल्प तडकाफ डकी बंद करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. किरकोळ त्रुटीवर दाखवून हे प्रकल्प बंद झाल्याने हजारो गावकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. लोकवर्गणी पूर्णपणे न भरल्याचा ठपका या ३६ ग्रामपंचायतींवर ठेवून प्रकल्प रद्द झाले.
जागतिक बँकेने जलस्वराज्य प्रकल्पासाठी अर्थसहाय्य दिले आहे. हे प्रकल्प मागणीनुसार संबंधित गावांना देण्यात आले. निकषांची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्य़ातील ३५ गावांना पहिल्या टप्प्यात व ११० गावांना दुसऱ्या टप्प्यात अशा एकूण १४५ ग्रामपंचायतींची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती.

रुईच्या गाठींचा ट्रक जळून खाक
शेंदूरजनाघाट, २४ एप्रिल / वार्ताहर

कापसाच्या रुईच्या गाठी असलेला ट्रक (यूपी ७८ एन ९८०४) भोपाळ वरून हैदराबादकडे जात असताना रवाळा येथे ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रक क्षणातच आगीच्या भक्षस्थानी गेला. ट्रक व गाठी भस्मसात होऊन १२ लाखांचे नुकसान झाले.
ठाणेदार जयेश भांडारकर यांना दूरध्वनीवर माहिती मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेतली. पेटलेला ट्रक विझवण्यासाठी वरूड, मोर्शी येथून अग्निशामक दलाच्या गाडय़ा आल्या. मात्र तोवर ट्रक जळून खाक झाला होता. आगीच्या लोळाने रस्त्याच्या कडाच्या शेताच्या धुऱ्यांनी पेट घेतला. यात जैस्वाल यांच्या शेतातील संत्र्याची ४० झाडे सुद्धा पेटली. गाठींच्या लोखंडी पट्टय़ांच्या घर्षणातून निर्माण झालेल्या ठिणगीने ट्रक पेटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

शेंदूरजनाघाट परिसरात पाण्याअभावी संत्रा झाडे वाळण्याच्या मार्गावर
शेंदूरजनाघाट, २४ एप्रिल / वार्ताहर

या वर्षीच्या अत्यल्प पावसाने खरीप हंगामासह ओलिती पिकांनाही फटका बसला. कमी पाणी, पिकांवर किडींच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात घट झाली. पाण्याअभावी परिसरात संत्रा झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने संत्रा झाडांचे सिंचन करणे कठीण झाले आहे. भीषण टंचाईची चाहुल लागताच संत्रा उत्पादकांनी ठिंबक सिंचनावर भर देऊन ठिंबक सिंचन संच बसविले. मात्र, आता विहिरीत पाणीच उपलब्ध राहलेले नाही. पाण्याचे स्रोतच आटले. परिसरात विहिरी व कुपनलिका नागठाणा परिसरातील विहिरी सिंचन प्रकल्पात अधिग्रहीत झाल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली. गेल्या आठ दिवसांपासून सूर्य आग ओकू लागला. ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी संत्रा झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत. मे व जून महिन्यात संत्रा झाडे किती वाळणार याचा अंदाज घेता येणे शक्य नाही. संत्रा उत्पादक या भयावह स्थितीमुळे आताच हतबल झालेला आहे.

पाण्याअभावी रोपवाटिकाधारक अडचणीत
संत्रा कलमांची बाजारपेठ असलेल्या शेंदूरजनाघाट येथे दरवर्षी कोटय़वधींची उलाढाल या व्यवसायात होते. यंदा पाण्याअभावी रोपवाटिकाधारक अडचणीत आले आहेत. संत्रा कलमाची लागवण ही जून व जुलैत होत असल्याने सुरुवातीला कमी पाऊस असला तरी उर्वरित दोन महिन्यांत चांगला पाऊस होईल ही आशा शेतकरी व संत्रा कलम व्यावसायिक बाळगून असतात. चांगल्या पावसाच्या आशेवरच या वर्षी २ ते अडीच कोटी संत्रा कलमांची लागवण झाली पण, दिवाळीपूर्वीच पावसाचा अंदाज फोल ठरला.

मतदारांचा निरुत्साह कुणाच्या पथ्यावर?
मतदार केवळ उन्हांमुळे घराच्या बाहेर पडले नाहीत, की मतदारांमध्ये निरूत्साह होता, याचा काथ्याकूट एकीकडे सुरू आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातील १४ लाख २२ हजार मतदारांपैकी ७ लाख ३७ हजार मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. निवडून येणारा उमेदवार केवळ या ५२ टक्के लोकांच्या मतांवर विजयाचा आनंद साजरा करेल. शिक्षितांची टक्केवारी वाढली. मतदानासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रे आली. संपर्काची नवी साधने आली. तरीही लोक मतदानासाठी का बाहेर पडत नाहीत, यावर मंथन करण्याची वेळ समाज धुरिणांवर आली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ४ मेपासून प्राणीगणना
चंद्रपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी
‘लाईन ट्रान्झीट मेथड’ने व्याघ्रगणना करण्यासंदर्भात प्रोजेक्ट टायगर व वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूटकडून अद्याप कुठल्याही सूचना न मिळाल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ४ ते १० मे या कालावधीत जुन्याच पद्धतीने प्राणीगणना केली जाणार आहे. यंदा हा कार्यक्रम राबवताना वन्यजीव संस्थांना यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

जंगलातील पाणवठे कोरडे
तहानलेल्या वन्यप्राण्यांची गावांच्या दिशेने धाव

अकोला, २४ एप्रिल / प्रतिनिधी
जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यप्राणी गावांच्या दिशेने धाव घेत आहेत. कृत्रिम पाणवठय़ांच्या निर्मितीसाठी वन्यजीव विभागाकडून होत असलेली दिरंगाईदेखील याला कारणीभूत असून पाण्यासाठी गावांकडे धाव घेऊन जीव गमावणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संख्येत दरवर्षी भरच पडत असल्याचे चित्र आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाचे ७८ गुन्हे
भंडारा, २४ एप्रिल / वार्ताहर

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ७८ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अदखलपात्र आहेत.
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्यात खासदार शिशुपाल पटले आणि १५७ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २५ मार्चला चांदपूर येथे त्यांनी परवानगी न घेता ध्वनिक्षेपक लावून सभा घेतली.

ब्युटी सेमिनारला चांगला प्रतिसाद
खामगाव, २४ एप्रिल / वार्ताहर
जायंटस् सहेली ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या मोफत ब्युटी सेमिनारला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. स्थानिक केमिस्ट भवनात घेण्यात आलेल्या शिबिराला सौंदर्य तज्ज्ञ रेणू शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सौंदर्य निसर्गाची देणगी असून प्रत्येकाने त्यास जपले पाहिजे, असा सल्ला देत शर्मा यांनी सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय सांगितले. या कार्यक्रमाकरिता जायंटस् सहेलीच्या अध्यक्ष भारती सिसोदिया व सदस्यांनी सहकार्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ग्रंथ प्रदर्शन
भंडारा, २४ एप्रिल/ वार्ताहर

आठवले समाज कार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन तसेच वाचन अभ्यास उपक्रम राबवण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावरील अनेक पुस्तके व ग्रंथ या प्रदर्शनात ठेवण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य चंदनसिंह रोटेले, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, प्रा. निकम, प्रा. उईके, प्रा. चौखुंडे, प्रा. ज्योती नाकतोडे, प्रा. सरला शनवारे, राजू ठवरे, सहाय्यक ग्रंथपाल अविनाश आमटे सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय ‘टेनिक्वॉईट’ स्पर्धेसाठी भंडाऱ्याच्या खेळाडूची निवड
भंडारा, २४ एप्रिल/ वार्ताहर

चेन्नई येथे २५ एप्रिल ०९ ला आयोजित भारतीय टेनिक्वाईट संघ निवड चाचणी शिबिरात येथील वैनगंगा स्पोर्टिग्स आरती दुधकुवर, रेणुका व्यवहारे आणि संकेत डुंभरे यांना पाचारण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून पाचारण करण्यात आलेल्या पाच खेळाडूंपैकी चार एकटय़ा भंडारा येथील आहेत, असे प्रशिक्षक अ‍ॅड. मधुकांत बांडेबुचे यांनी सांगितले.

सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

मातानगर वॉर्डातील विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री, वने व पर्यावरण राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये आदिवासी क्रांतीसेनेचे अध्यक्ष रवी मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विनोद केळझरकर, सह्य़ाद्री संस्थेचे अध्यक्ष व दलित मित्र प्रफुल्ल बेले व कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल निबड्र, मॉडर्न कल्चरल आर्ट क्लबचे संचालक सभासद विजय मसराम, मोंटू पेंदोर, सुभाष मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, छोटूभाई शेख, माजी आमदार देवराव भांडेकर, सुधाकर कुन्नोजवार, रवी शिंदे, प्रमोद बोरीकर आदी उपस्थित होते.