Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
ग्रंथविश्व

हिंदी सिनेमा
एक फ्लॅशबॅक

हिंदी सिनेमा : अ‍ॅन इनसायडर्स व्ह्यू’ हा सिनेपत्रकार-समीक्षक स्व.अनिल सारी यांनी वेळोवेळी विविध वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून तसेच काही वेळा काही परिसंवादांसाठी लिहिलेल्या हिंदी चित्रपटविषयक लेखांचा संग्रह. अनिल सारी यांनी १९७०-८०-९०च्या दशकांत दिल्लीतून पत्रकारिता केली. स्वातंत्र्योत्तर काळातील सिनेमावर ते वाढले व त्यांच्या लिखाणाचा व अभ्यासाचा मुख्य विषय हा स्वातंत्र्योत्तर सिनेमा होता. (अनिल सारी यांचे वडील अर्जुन अरोरा हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांपैकी एक व उत्तर प्रदेशातले त्या काळचे ट्रेड युनियन लीडर. )

 


हिंदी सिनेमाचा या काळातला सर्वात मोठा आश्रयदाता म्हणजे सामान्य आर्थिक परिस्थितीला, ओढगस्तीच्या आयुष्याला सामोरा जाणारा आणि म्हणून दोन घटका वास्तवापासून पलायन करून सिनेमागृहाच्या अंधारात, रुपेरी पडद्यावरच्या झगमगाटी श्रीमंती सौंदर्याच्या स्वप्नांत, नायकाच्या ‘रॅग्ज टू रिचेस’ या एरवी वास्तवात अशक्य वाटणाऱ्या प्रवासाला साक्ष राहणारा गरीब, सामान्य माणूस. अनिल सारी यांनी ज्या काळात हे लेखन केले आहे तो मुख्यत: हिंदी सिनेमाच्या लोकप्रियतेमागच्या या आर्थिक-सामाजिक कारणाचा काळ होता. त्यांच्या अनेक लेखांतून या वास्तवाचा आणि कारणांचा ऊहापोह आणि त्या वास्तवाचे अस्तर जाणवते. त्याचबरोबर या माध्यमाच्या सामर्थ्यांविषयीची जाणही त्यात आढळते.
अनिल सारी यांचे १९९५ मध्ये निधन झाले. त्यांचा अभ्यास, निरीक्षणे, विश्लेषण हे सर्व स्वातंत्र्योत्तर काळातल्या आणि ९०च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या हिंदी सिनेमाविषयीचे आहे. त्याबरोबरच या काळात बंगालमध्ये सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, त्यांच्यापाठोपाठ दक्षिणेत जी. अरविंदन, अदूर गोपालकृष्णन, जॉर्ज अब्राहम अशा दिग्दर्शकांचा उदय झाला आणि त्यांच्या जाणिवांचा भारतीय सिनेमावर अमिट ठसा निर्माण झाला. चॅपलिन, हिचकॉकसारख्या हॉलीवूडच्या मास्टर्सच्या अप्रत्यक्ष आणि चिरकालीन प्रभावालाही विसरून चालत नाही. सारींनी या प्रभावांची दखल घेतलेली जाणवते.
‘द अ‍ॅस्थेटिक फाउंडेशन्स ऑफ द हिंदी फॉम्र्युला फिल्म’, ‘थीम्स अ‍ॅण्ड व्हेरिएशन्स ऑफ इंडियन सिनेमा’, ‘पस्र्पेक्टिव्ह्ज ऑफ इंडियन सिनेमा’ आणि ‘द मेकर्स ऑफ पॉप्युलर सिनेमा’ अशा चार भागांत हा लेखसंग्रह संकलित केलेला आहे. हिंदी सिनेमाने फॉम्र्युल्यासाठी जसा तत्कालीन युरो-अमेरिकन प्रभाव ग्रहण केला तसाच भारतीय पारंपरिक लोककलेचाही आधार घेतला. आणि अशाप्रकारे एका नो-मॅन्स लँडमध्ये हिंदी सिनेमा बागडत राहिला. युरो-अमेरिकन सिनेमातली दृश्ये, पात्रे घेऊन त्याने त्यांना आपल्या लोकसंस्कृतीतला पेहराव दिला. हिंदी सिनेमाच्या या स्वरूपाचा ऊहापोह करणारा ‘द डायनॅमिक्स ऑफ ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी इन हिंदी सिनेमा’ हा लेख लिहिलेला आहे १९८५ साली. आज २००९ साली तो वाचताना त्याच्या कालसापेक्षतेची जाणीव झाल्याशिवायही रहात नाही. उदा., ८५ साली दूरचित्रवाणीच्या खासगी मनोरंजन वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे लेखात ‘रेडिओ आणि टीव्ही ही माध्यमे सरकारद्वारा नियंत्रित असल्यामुळे व प्रचारात्मक असल्यामुळे सांस्कृतिक स्तरावर त्यांचा असा श्रोतृ-प्रेक्षकवर्ग नाही; ही माध्यमे राजकीय माहिती आणि विकासकार्यासंबंधी सूचनांपुरतीच मर्यादित राहतात’ अशा आशयाचा जो उल्लेख येतो तो आता पूर्णत: कालबाह्य झालेला आहे. ‘द कम्पेलिंग वर्ल्ड ऑफ हिंदी फिल्म्स’ या लेखात दिलेली भारतातल्या सिनेमागृहांची आकडेवारी अशीच कालबाह्य ठरते. अनिल सारी यांच्या या लेखसंग्रहात ६०-७०-८०-९५ पर्यंतच्या हिंदी सिनेमाचा अभ्यास आलेला असला आणि तो या काळाच्या अभ्यासकासाठी उपयुक्त असला तरी कालसापेक्ष संदर्भ दुर्लक्षिता येणार नाहीत. म्हणूनच लेखांच्या लेखनकालाचे भान ठेवणे आवश्यक ठरते.
चित्रपटगीते हे हिंदी सिनेमाचे एक ठळक वैशिष्टय़. अनेकदा कथेची सूत्रे एकत्र गुंफणारा, कथेला जीवनविषयक तत्त्वज्ञानाची डूब देत प्रेक्षकाच्या मर्मबंधातली ठेव ठरणारा आणि अनेकदा तर कथेला चक्क साइडलाइनला ठेवून दर्जेदार काव्याच्या आणि कर्णमधुर संगीताच्या जोरावर चित्रपटाला अजरामर करणारा हा घटक. ‘पोएट्री इन हिंदी सिनेमा’ या लेखात या घटकाची उद्बोधक चर्चा आहे. चित्रपटाची लोकेशन्स आणि सेट्स हेही त्याची स्वभावप्रकृती निश्चित करणारे वैशष्टय़पूर्ण घटक. त्यांच्यावरील ‘द सदर्न लोकेल फॉर हिंदी फिल्म्स’ आणि ‘द आर्किटेक्चर ऑफ इल्युजन’ हे लेख वाचनीय, मननीय झाले आहेत.
समांतर सिनेमाची चळवळ ही १९६५-१९८५ हा काळ व्यापणारी आणि भारतीय सिनेमाचा नव्याने विचार करणारी चळवळ. सारींचे या विषयावरचे ७०च्या दशकाच्या पूर्वार्धात लिहिलेले लेख इथे संकलित केलेले आहेत. समांतर सिनेमा आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवू शकेल का, समांतर सिनेमा मेला का, असे प्रश्न पुढच्या काही वर्षांत अनेकवेळा विचारले जात राहिले होते. आजच्या मुख्य धारेतल्या सिनेमाने आणि ताज्या दमाच्या दिग्दर्शकांनी आज या प्रश्नांची बिनतोड उत्तरे देऊन संशयात्म्यांना निरुत्तर केलेच आहे. सारी यांचे ‘लेख या तत्कालीन प्रश्नांची चर्चा करतात.
‘पस्र्पेक्टिव्ह्ज ऑन इंडियन सिनेमा’ या विभागात ‘हाऊ सोशली काँशस इज हिंदी सिनेमा’, ‘व्हायलन्स इन हिंदी सिनेमा’, ‘ब्लॅक मनी अ‍ॅज द मेन स्टे ऑफ हिंदी सिनेमा’, ‘बॉलीवूड गोज ऑन स्ट्राइक’, ‘द ग्लोरिफिकेशन ऑफ भगतसिंग’ ‘थ्री फिल्म्स ऑन गांधी’, ‘व्हॉट वेण्ट राँग विथ भनसालीज द्वदास’ असे अगदी त्या त्या वेळी चर्चेत असलेल्या विषयांवरचे आणि ज्यांची वृत्तपत्राला तात्काळ दखल घ्यायची असते असे लेख आहेत. स्वातंत्र्योत्तर विसाव्या शतकातल्या हिंदी सिनेमाचा आढावा घेण्यासाठी या अशा लेखांचा उपयोग जिगसॉ पझलमधल्या तुकडय़ांसारखा नक्कीच होऊ शकतो.
‘इंडियन गूफ-अप्स अ‍ॅट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स’ या लेखात देशातल्या आणि देशोदेशीच्या चित्रपट-दिग्दर्शकांना, कलावंत-तंत्रज्ञांना एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करण्याचे व्यासपीठ ठरायला हवे, पण त्या प्रमाणात तसे व्हायला उपयुक्त वातावरण आपले फिल्म फेस्टिव्हल निर्माण करू शकत नसल्याची आणि हे महोत्सव बहुतांशी आशिया आणि आफ्रिकेतील वसाहतवादातून मुक्त झालेल्या देशांच्या सिनेमाची उपेक्षा करीत असल्याची तक्रार सारी मांडतात. ती त्या काळी खरीच होती. आता पहिली तक्रार पूर्णाशाने जरी दूर झाली नसली तरी दुसरी तक्रार दूर झालेली आहे असे म्हणता येईल. आशियाई सिनेमाने एव्हाना महोत्सवांतून आपले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केलेली आहे.
‘द मेकर्स ऑफ पॉप्युलर सिनेमा’ या भागात दिलीप-राज-देव त्रिमूर्तीवरचा लेख (२००३ साली लिहिलेला पण अप्रकाशित), गोल्डन गर्ल्स ऑफ गोल्डन इरा हा ५०च्या दशकातल्या अभिनेत्रींवरील लेख हे सर्वसाधारण निरीक्षणे नोंदणारे आहेत. त्यात नवीन असे काही मिळत नाही. या भागाला विषयाची काही एक सुसूत्रता नाही.
अनिल सारी यांचे सुहृद पार्थ चॅटर्जी हे दिल्लीस्थित मुक्त पत्रकार-समीक्षक-दिग्दर्शक. त्यांनी हे संकलन केले असून पुस्तकाला प्रस्तावनाही लिहिली आहे.
रेखा देशपांडे
हिंदी सिनेमा : अ‍ॅन इनसायडर्स व्ह्यू:- लेखक - अनिल सारी; प्रकाशक - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस; पृष्ठे - २२२; मूल्य - ४९५ रुपये.