Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
विविध

वॉर्सा उठावातील क्रौर्यकथा ऐकून राष्ट्रपती हेलावल्या!
सुनील चावके
वॉर्सा, २४ एप्रिल

‘येथे जे पाहिले त्याने मी हेलावून गेले. आपल्या देशासाठी प्राणाची पर्वा न करणाऱ्या पोलिश पुरुष व महिलांच्या बलिदानाचे उदाहरण सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे,’ अशा शब्दात दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन आक्रमणाविरुद्ध झालेल्या वॉर्साच्या उठावात बळी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पोलंडच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात केली. स्पेनचा तीन दिवसांचा दौरा आटोपून राष्ट्रपती पाटील गुरुवारी पोलंडची राजधानी वार्सामध्ये दाखल झाल्या.

भारतापेक्षा पाकिस्तानने तालिबानींवर लक्ष केंद्रित करावे- हिलरी क्लिंटन
वॉशिंग्टन, २४ एप्रिल/पीटीआय

पाकिस्तानने आपली पारंपरिक भारतविरोधी भूमिका सोडून देऊन ‘अस्तित्वात’ असलेल्या संकटाकडे म्हणून इस्लामाबादपासून १०० कि.मी.वर येऊन ठेपलेल्या तालिबान्यांना तोंड कसे द्यायचे यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असा स्पष्ट इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्रविषयक समितीपुढे बोलताना परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनीच ही माहिती दिली.

कंदाहार प्रकरणी भाजपचा दावा काँग्रेसने फेटाळला
नवी दिल्ली, २४ एप्रिल/पीटीआय

कंदाहार विमान अपहरणाच्या प्रकरणात प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडण्याच्या निर्णयाला तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी विरोध केला होता, हा ज्येष्ठ भाजप नेते जसवंत सिंग (तेव्हाचे परराष्ट्रमंत्री) यांनी केलेला दावा काँग्रेसने आज फेटाळून लावला. जसवंत सिंग यांनी हे विधान करण्यासाठी जी वेळ निवडली आहे त्यावरून संधीसाधूपणाची वृत्तीही डोकावते. अडवाणींच्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी व त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी आज केली.

जागतिक दबावानंतर बुनेरमधील तालिबानी स्वात खोऱ्याकडे
इस्लामाबाद, २४ एप्रिल/पी.टी.आय.

तालिबानी दहशतवादी इस्लामाबादच्या निकट आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढल्यानंतर आता एका करारान्वये तालिबानने बुनेर या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणाहून माघार घेण्यास प्रारंभ केला आहे. हे तालिबानी दहशतवादी आता स्वात खोऱ्यातील त्यांच्या बालेकिल्ल्याकडे परत निघाले आहेत. कट्टर धर्मगुरू सूफी महंमद यांनी तालिबानच्या माघारीसाठीच्या या करारात पुढाकार घेतल्याचे समजते.