Leading International Marathi News Daily
रविवार, २६ एप्रिल २००९

ज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांच्या ‘जीबनेर जलसाघरे’ या आत्मचरित्राचा त्याच नावाने प्रसिद्ध झालेला मराठी अनुवाद ही केवळ आठवणींच्या प्रदेशातील रम्य सफर नसून, एक बुजुर्ग गायकाच्या ‘घडण्या’मागची चित्तवेधक कहाणी आहे. वयाच्या नव्वदीच्या उंबरठय़ावर असलेले मन्ना डे गेली सत्तर वर्षे या ना त्या माध्यमातून गायनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हिंदीबरोबरच बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी भावोत्कटपणे गाणारा गायक म्हणून त्यांची ख्याती आहे. मन्ना डे यांच्या बंगालीत प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद डॉ. अपर्णा झा-मेहेंदळे यांनी केला आहे. (याच आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘पेंग्विन’ने दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता.) हिंदी चित्रपटसंगीतात
 

स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या गायकाच्या जीवनातील चढउतारांचे प्रभावी दर्शन हे पुस्तक घडवून जाते.
शास्त्रीय संगीतावर, रागदारीवर आधारित गाणी प्रभावीपणे गाणारा गायक ही मन्ना डे यांची ओळख (खरे तर ‘शिक्का’) कशी काय रूढ झाली कोण जाणे! खरे तर कुठल्याही प्रकारची गाणी तेवढय़ाच लीलया गाणाऱ्या या गायकाला एका विशिष्ट साच्यात बसवणं किती अन्यायकारक आहे, याची साक्ष त्यांनी गायलेली गाणी नित्यनेमाने देत असतातच. प्रस्तुत आत्मचरित्रानं त्यांच्या जीवनाचे असेच काही पैलू समोर आणले आहेत.
ढोबळमानाने या आत्मचरित्राचे तीन भाग पाडता येतील. पहिल्या भागात मन्ना डे (खरे उच्चारण ‘मान्ना दे’) यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, त्यांचं बालपण, किशोरावस्थेपासूनच आपले काका कृष्णचंद्र अर्थात के. सी. डे यांच्याकडून मिळालेली शास्त्रीय संगीताची दीक्षा आणि तरुणपणापर्यंतचा त्यांचा प्रवास याची माहिती मिळते. दुसऱ्या भागात मुंबईच्या चित्रपटसृष्टीत नवोदित गायक म्हणून झालेलं आगमन, पाश्र्वगायनाची पहिली संधी आणि पुढे एक प्रथितयश पाश्र्वगायक म्हणून निर्माण केलेलं स्वत:चं स्थान यांचा आलेख अनुभवायला मिळतो. तिसऱ्या व शेवटच्या भागात बंगाली चित्रपट आणि भावसंगीताच्या प्रांतात मन्ना डे यांनी केलेला प्रवास आणि तिथले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
कोलकात्यामधील एका सर्वसामान्य कुटुंबात प्रबोधचंद्र अर्थात ‘मन्ना’ यांचा जन्म झाला. वडील पूर्णचंद्र आणि दोन चुलते यांचं ते एकत्र कुटुंब होतं. धाकटे काका कृष्णचंद्र अर्थात बाबूकाका यांना लहानपणीच अंधत्व आलं, त्याची आठवणही इथं वाचायला मिळते. किंबहुना, कृष्णचंद्र यांच्याविषयी मन्ना दांनी एवढय़ा विस्तारानं सांगितलंय की ते एक स्वतंत्र प्रकरणच वाटावं. वयाच्या तेराव्या वर्षी एका संध्याकाळी कृष्णचंद्र हे गच्चीवर पतंग उडवत असतानाच अचानक त्यांच्या डोळय़ांपुढे अंधारी आली. हळूहळू दृष्टी धूसर होत गेली आणि कुठल्याही औषधोपचारांचा उपयोग न होता कृष्णचंद्र यांना ठार आंधळेपण आलं. पुढल्या आयुष्यात काळाकभिन्न अंधार वाढून ठेवलेला असताना कृष्णचंद्र यांनी स्वत:च्या इच्छाशक्तीच्या बळावर गायनविद्या संपादन केली. शास्त्रीय संगीतातले ख्याल व ध्रुपद गायकीचे प्रकार, लोकसंगीतातले कीर्तन, बाऊल, भटियाली संगीत तसेच ‘नात’ हा मुस्लीम गानप्रकार या सर्वात ते पारंगत झाले. पुढे चित्रपट आणि गायनक्षेत्रात ‘के.सी.डे.’ या नावाला एक आदरयुक्त वलय प्राप्त झालं. केवळ गायकच नव्हे, माणूस म्हणूनही के.सी.डे. अतिशय थोर होते. अशा या गायक काकांकडून मन्ना डे यांना गायनाची संथा मिळाली. प्रारंभीच्या टप्प्यावरच तयार झालेला मन्नाचा गळा पुढे चित्रपटसंगीतात त्याच्यासाठी वरदान ठरला. के.सी. अर्थात बाबूकाका यांच्याविषयी मन्ना डे यांनी खूपच विस्तारानं लिहिलं असून या आठवणींना कृतज्ञतेचा, जिव्हाळय़ाचा स्पर्श लाभल्यानं हा भाग मोठा हृद्य झालाय!
मुंबईत नशीब अजमाविण्यास आलेल्या तरुण मन्नाला १९४२ साली ‘तमन्ना’ या हिंदी चित्रपटात पाश्र्वगायनाची पहिली संधी मिळाली. मात्र पहिलं ‘सोलो’ गाणं त्यांना मिळालं ते ‘रामराज्य’ (१९४३) या चित्रपटात! महर्षी वाल्मीकींवर चित्रित होणाऱ्या या गाण्यासाठी निमार्त्यांना खरं तर के. सी. डे हवे होते, पण ते पाश्र्वगायन करीत नसल्यानं हे गाणं अखेर मन्ना डेच्या वाटय़ाला आलं. तेथून पुढे १९५० पर्यंत हळूहळू होत गेलेला प्रवास आणि त्यानंतरच्या दशकात पाश्र्वगायक म्हणून मिळालेलं नाव या प्रवासाची कहाणी अतिशय वेधकपणे वाचायला मिळते. सचिनदेव बर्मन यांच्याकडे सहायक म्हणून केलेली उमेदवारी, त्यांच्याच ‘मशाल’ या चित्रपटात गायला मिळालेलं ‘उपर गगन विशाल’ हे गाजलेलं गाणं, पुढे शंकर-जयकिशन, सलील चौधरी, नौशाद, रोशन आदी संगीतकारांकडून मिळालेली गाणी व त्या अनुषंगानं त्यांच्या आठवणी यांची मनोहारी उजळणी मन्ना डे करून जातात. हिंदी चित्रपटसंगीतात रुची असणाऱ्यांसाठी हा भाग विशेष रंजक ठरावा. हा सर्व प्रवास त्यासाठीच मुळातून वाचण्याजोगा!
बंगाली ही मातृभाषा असल्यानं मन्ना डे यांचा तिथला गानप्रवासही प्रदीर्घ आहे. त्याचा तेवढय़ाच विस्तारानं धांडोळा घेत त्यांनी अनेक भल्याबुऱ्या आठवणींना या ठिकाणी स्थान दिलंय.
बंगालीच नव्हे तर मराठी चित्रपटातही मन्ना डे यांनी (थोडीथोडकी नव्हे, सत्तर!) गाणी गायलीत. त्या सर्व मराठी गाण्यांची सूची ग्रंथाच्या शेवटी दिली आहे. मराठी वाचकांना ती उपयुक्त ठरावी.
सुलोचना या केरळी मुलीशी मन्ना डे यांनी केलेला प्रेमविवाह, पत्नीकडून आयुष्यभर मिळालेली साथ, सुरमा व सुमिता या दोन कन्यांकडून मिळालेलं प्रेम, मायानगरी सोडून बंगलोरमध्ये केलेलं कायमचं वास्तव्य या खासगी आयुष्यातल्या तपशिलाबरोबरच समकालीन संगीतकार व गायकांकडून मिळालेल्या प्रेमाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख मन्ना डे करून जातात. या सर्वच निवेदनाला प्रांजळपणाची आणि विनयशीलतेची डूब मिळाल्यानं हे आत्मचरित्र अधिक भिडतं. एका गायकाच्या आत दडलेल्या सच्चा माणसाचं दर्शन वाचकाला सुखावून जातं.
अपर्णा झा (मेहेंदळे) यांनी बंगालीतून केलेला अनुवाद ओघवता आहे. मात्र, बंगाली शब्दांना थेट प्रतिशब्द योजण्याच्या आग्रहापायी काही ठिकाणी त्यांची भाषा बोजड व अनाकलनीय होते. ‘श्रोत्यांची आनंदघन अभिव्यक्ती न होता कसा राहू?’, ‘सचिनदेव बर्मन सुरांशी खेळत एका संगीतशिशूला (?) जन्म देत होते’ यांसारख्या वाक्यांबरोबरच ‘कालोतीर्ण संगीत’, ‘म्युझिक व्यवस्थापक’ (म्युझिक अॅरेंजरचं भाषांतर!), पंचमचा ‘गर्वित’ पिता (सचिनदांचा उल्लेख) यांसारखे काही शब्द रसहानी करतात. अनुवादिकेची मातृभाषा मराठी असताना हे अपेक्षित नाही. असो. एका ज्येष्ठ गायकाचा जीवनपट मराठी वाचकांपुढे आणल्याचं श्रेय अनुवादिकेला द्यावंच लागेल.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी या ग्रंथास दिलेली छोटीशीच, पण हृद्य प्रस्तावना दाद देण्याजोगी! निवडक छायाचित्रे, मुखपृष्ठ आणि इतर सजावटही देखणी. चित्रपटसंगीतावर प्रेम करणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे.
जीबनेर जलसाघरे
(मन्ना डे यांचे आत्मचरित्र)
बंगाली शब्दांकन : डॉ. गौतम राय
मराठी अनुवाद :
डॉ. अपर्णा झा (मेहेंदळे)
साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
पृष्ठे : ३३२, किंमत : ३०० रुपये.
सुनील देशपांडे

मुंज्ञानाशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये विज्ञानाची घोडदौड चालू आहे. सर्वसामान्य माणसांचा संबंध विज्ञानाशी येतो तो त्यांच्या नित्य वापरातील वस्तू/उपकरणांमुळे, पण या विज्ञानाच्या मुळाशी जाण्याचा, त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न फारसे कोणी करत नाही. हजारो वर्षांपूर्वी या विज्ञानाचा वापर नकळत का होईना आपल्या जगभरातील पूर्वजांनी केला. विज्ञानाचा हा इतिहास विज्ञानविषयक लेखनात माहीर असणाऱ्या निरंजन घाटे यांनी ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ या पुस्तकात अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे.
मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, सौंदर्यसाधना, शिवणकाम/फॅशन, उद्यानशास्त्र, प्राणिसंग्रहालये, खेळ यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. विज्ञानाचा हा जो इतिहास उलगडत गेला तो आर्किऑलॉजी (पुरातत्त्व) आणि पॉलिएंटॉलॉजीच्या (पुराजीवशास्त्र) अभ्यासकांनी केलेल्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्यांतून! सर्व जगभरात झालेल्या उत्खननातून हेच लक्षात येतं की एखाद्या कृतीमागचे वैज्ञानिक तत्त्व माहीत नसतानादेखील मानवाच्या पूर्वजांनी केलेली प्रगती आपल्याला थक्क करणारी आहे.
पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणे वैद्यक आणि मानवी आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये रुग्णांचे औषधोपचार, रुग्णालये, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेची उपकरणे, प्राचीन औषधे, औषधांचे बाजार, कुटुंबनियोजन व कुटुंबनियोजनाची साधने यांसारख्या विषयांचा समावेश आहे. हजारो वर्षांपूर्वीदेखील वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव आपल्याला ही प्रकरणे वाचत असताना होत जाते. प्लॅस्टिक सर्जरीतील ‘पेडिकल फ्लॅप’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तंत्राच्या सूचना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक सुश्रुत याने आपल्या ग्रंथात त्यातील बारकाव्यांसह सांगितलेल्या आढळतात. प्राचीन भारतीय वैद्यकात ‘ऱ्हिनोप्लॅस्टी’ या आधुनिक तंत्राचा वापरही आढळतो. अगदी उत्तर अश्मयुगीन काळातही कवटी उघडून मेंदूवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर एक व्यक्ती जगल्याचा पुरावाही आहे. आजच्या शल्यशास्त्रज्ञांना हेवा वाटेल इतकी उत्कृष्ट वैद्यकीय हत्यारे त्या काळी वापरली जात. प्राचीन काळात अद्ययावत रुग्णालये तर होतीच, त्याचबरोबर कृत्रिम दात, कृत्रिम अवयव, कुटुंबनियोजन यांसारख्या विषयातील तज्ज्ञदेखील इ.स. पूर्व काळात कार्यरत होते.
सौंदर्यसाधनेत, प्रसाधन करण्यात, विविध प्रकारचे केसांचे टोप वापरण्यात प्राचीन काळातील स्त्रिया-पुरुष वाकबगार होते. मेसापोटेमियात चार हजार वर्षांपूर्वी साबण वापरला जात होता असे पुरावे आहेत. त्याच सुमारास धातूच्या आरशांच्या जोडीलाच काचेचे आरसे करण्याची कला खूपच विकसित झाली होती. नखे वाढविणे, रंगविणे, चेहरा गोरा दिसण्यासाठी शिशाची संयुगे वापरणे स्त्रियांमध्ये प्रचलित होते. वैयक्तिक स्वच्छता आणि देखणेपणा याविषयी रोमन साम्राज्यातील सर्वसामान्य नागरिकसुद्धा खूप काळजी घेत. दागिने करणे व ते वापरणे याबाबतीत प्राचीन काळातील लोक चांगलेच पुढारलेले होते. मौल्यवान दागिन्यांची नक्कल करून नकली दागिने, नकली रत्ने सर्रास वापरली जात. एवढेच नाही तर त्या काळातील जवाहिऱ्यांना वेगवेगळ्या हलक्या धातूंवर सोन्याचा मुलामा कसा द्यावा, याचंही तंत्र ठाऊक होतं.
याच काळात वस्त्र विणण्याची कलाही विकसित झाली होती. त्या त्या हवामानात योग्य असे वस्त्रांचे प्रकार मानवाने निर्माण केले. सुमारे बावीस हजार वर्षांपूर्वी माणूस नेढं असलेल्या सुया वापरत असे. तागापासून, कापसापासून कापड विणले जात असे. इ.स. पू. ३०००च्या आसपास रेशीम उत्पादनासाठी रेशीमकिडे पाळले जात असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. वस्त्रांच्या बरोबरच फॅशनचीही सुरुवात झाली. बिकिनीची फॅशन दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती यावर आपला आज विश्वास बसणार नाही. वनस्पतीशास्त्राचादेखील तेव्हा पद्धतशीर अभ्यास झाला होता. प्राचीन काळात उद्यानशास्त्र अतिशय प्रगत असल्याचे दाखले मिळतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमचं वैभव तिथल्या विविध प्रकारच्या बगीच्यांमध्ये मोजलं जात होतं. या बागा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केल्या जात. ‘झाडे लावा, देश वाचवा’ ही घोषणाही प्राचीन काळातलीच! प्राणिसंग्रहालयेही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. प्राणी पाळले जात होते, तशीच प्राण्यांसाठी राखीव अरण्येही होती. विविध प्रकारचे खेळ, त्यांच्या स्पर्धा यांचा उगमही इ.स. पूर्व काळातीलच! चष्मे, छत्र्या, तंबाखू याही आपल्याला मिळालेल्या पुरातनकालीन देणग्याच आहेत.
तर असा हा उत्खननशास्त्र आणि पुरातनशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध झालेला अतिशय रंजक आणि ज्ञानात भर घालणारा असा विज्ञानाचा इतिहास! इतिहास हा फक्त राजे, युद्ध, सनावळ्यांचा नसतो तर प्रत्येक विषयाच्या मागे पूर्वजांचे जे संशोधन व कर्तृत्व असते त्याचाही असतो. हा विज्ञानाचा इतिहास आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे सहज उलगडत जातो. एरवी बऱ्याच जणांना कंटाळवाणा वाटणारा ‘इतिहास’ हा विषय अगदी वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक लेखाला दिलेली उत्तम चित्रांची आणि सुस्पष्ट रेखाटनांची जोड. उदा. सुश्रुताने वर्णन केलेल्या नाकाच्या प्लॅस्टिक सर्जरीची रेखाचित्रे, आरशात बघून ओठ रंगविणाऱ्या इजिप्शियन युवतीचे रेखाचित्र. या चित्रांमुळे/रेखाटनांमुळे लेखकाला जे सांगावयाचे आहे त्या माहितीचे आकलन वाचकाला अगदी सहजपणे होते. विविध विषयांच्या विभागवार मांडणीमुळे वाचनाची लयही चांगली सांभाळली गेली आहे. उत्कृष्ट छपाई, चंद्रमोहन कुलकर्णीचे विषयाला अनुरूप असे आकर्षक मुखपृष्ठ ही पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या मेहता प्रकाशनाने साप्ताहिक मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही वाचकप्रिय लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद! मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही लेखमाला न वाचलेल्या वाचकांना या पुस्तकामुळे वेगळ्याच वाचनानंदाचा लाभ होईल!
स्वाती दामले
आपल्या पूर्वजांचे विज्ञान
निरंजन घाटे
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : २११. किंमत : १८० रुपये

पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..

माझ्या या संस्कार यात्रेदरम्यान मला जगाच्या नजरेत अतिशय लहान,
पण प्रत्यक्षात महान व्यक्तिमत्त्वाजवळ जाण्याची संधी मिळाली.
त्यांचे प्रेम, त्यांचे सान्निध्य माझ्या संस्कार यात्रेसाठी प्रेरणास्रोत ठरले.
या नावांची यादी फार मोठी आहे; पण वेळ मर्यादा असल्याने
काहींचेच पुन:स्मरण करीत आहे.
कोणतीही, कशाचीही अपेक्षा न करता जीवन समर्पित करणाऱ्या
या उज्ज्वल परंपरेची फारच कमी लोकांना माहिती आहे.
जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण
मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणाऱ्या अशा समाज- शिल्पकारांचे
क्वचितच स्मरण केले जाते पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध
आजही दरवळत आहे.
कधी कधी अशा प्रेरणास्रोतांचे स्मरण ऊर्जास्रोत ठरतो.
आणि म्हणून अंतर्मनाच्या आनंदासाठी, सर्वाच्या सुखासाठी
या समाज- शिल्पकारांच्या जीवनातील सुगंधाला
शब्दांच्या ओंजळीत साठवून पुस्तक रूपात अभिव्यक्त करण्याचा
एक विनम्र प्रयत्न केला आहे.
ज्योतिपुंज
नरेंद्र मोदी
अमेय प्रकाशन
पृष्ठे- २७२,
मूल्य- २९५ रुपये