Leading International Marathi News Daily
रविवार , २६ एप्रिल २००९

डेक्कनची विजयाची हॅटट्रिक
दरबान, २५ एप्रिल/ वृत्तसंस्था

प्रग्यान ओझा याने घेतलेल्या तीन बळींमुळे डेक्कन चार्जर्सने आज येथे झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाचा १२ धावांनी पराभव केला. डेक्कन चार्जर्स संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या डेक्कन चार्जर्सने २० षटकांत ९ बाद १६८ अशी धावसंख्या उभारून मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी १६९ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. कर्णधार सचिन तेंडुलकर व डय़ुमिनी यांच्या ८२ धावांच्या भागीदारीमुळे मुंबई इंडियन्स विजय मिळविणार अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र प्रग्यान ओझा याने सचिन, डय़ुमिनी आणि शिखर धवन यांना पाठोपाठ बाद करीत मुंबई इंडियन्सची अवस्था १ बाद ८६ वरुन ४ बाद १०५ अशी केली. हे तिघे बाद झाल्यावर ड्वेन ब्राव्हो आणि अभिषेक नायर यांनी काही काळ मुंबई इंडियन्सचा किल्ला लढविला. मात्र एडवर्ड्सने या दोघांना पाठोपाठ बाद करीत मुंबईच्या विजयाच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. सचिन तेंडुलकरने ३६ तर डय़ुमिनीने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तीन बळी घेणाऱ्या ओझा याला फिल एडवर्डस व रुद्र प्रताप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेत चांगली साथ दिली.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द.

ऑस्ट्रेलियाची डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतून माघार
म्हणे, भारतात खेळाडूंच्या जीवाला धोका
मेलबर्न, २५ एप्रिल / पीटीआय

चेन्नईतील प्रस्तावित डेव्हिस चषक लढतीतून सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय टेनिस ऑस्ट्रेलियाने घेतल्यामुळे टेनिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे टेनिस ऑस्ट्रेलियावर एक वर्षांची निलंबनाची व आर्थिक दंडाची कारवाई केली जाऊ शकते. ही लढत चेन्नईत खेळविण्याचा निर्णय झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्याविरोधात अपील केले होते, पण आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) तसे करण्यास नकार दर्शविल्यानंतर टेनिस ऑस्ट्रेलियाने माघार घेण्याचे ठरविले. भारतातील सुरक्षेची स्थिती उत्तम नसल्याचे कारण टेनिस ऑस्ट्रेलियाने पुढे केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई येथील डेव्हिस चषक लढतीसाठी भारत हे पूर्णपणे सुरक्षित ठिकाण आहे.
-केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम
आयटीएफच्या सुरक्षा सल्लागारांनी सकारात्मक अहवाल दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतला. यावरून टेनिस ऑस्ट्रेलियाने बेजबाबदारपणातून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
-अखिल भारतीय टेनिस महासंघ

‘इतक्यात पी.एम. नाही’
कोलकाता, २५ एप्रिल/पी.टी.आय.

पंतप्रधानपद स्वीकारण्याची आपली सध्या तयारी नाही. त्या पदासाठी लागणारा पुरेसा अनुभव अद्याप माझ्याकडे नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक आणि सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे दिले. प्रणव मुखर्जी यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. जवळजवळ तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीची पश्चिम बंगालमधील कामगिरी इथपासून ते श्रीलंकेतील तामिळ समस्येपर्यंत अशा सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

डावखरेंनी शिवसेनेशी मैत्री तोडली
ठाणे, २५ एप्रिल / प्रतिनिधी
सर्वपक्षीय नेते असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना आज शिवसेना ही आडीतील नासक्या आंब्यासारखी असल्याचे उमगले आणि त्यांनी शिवसेनेशी मैत्री तोडली.
कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत डावखरे व संजीव नाईक यांच्या विजयासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र मजबुतीची आण दिली. त्या वेळी शिवसेनेशी सख्य असलेल्या डावखरे यांनी शिवसेनचे उमेदवार आनंद परांजपे यांचे नाव न घेता नासक्या आंब्याची उपमा दिली. आतापर्यंत समन्वयाचे राजकारण करीत आलो असताना शिवसेनेने कोणतीच नीतीमत्ता, संस्कृती, इतिहास ठेवला नाही. त्या अप्रतिष्ठांचे नाव घेऊन व्यासपीठ अप्रतिष्ठित करायचे नाही. खोटय़ाचा आधार घेऊन बदनाम करण्याचा सीडीद्वारे षडयंत्र करण्यात आले, अशांना फार काळ माफ करता येत नाही. त्यांच्याशी मैत्री योग्य नसल्याचे मला कळाने शिकविण्याचे त्यांनी म्हटलं. शहर अध्यक्ष आव्हाड यांनी सीडीबाबत उल्लेख करून त्यांच्या भावनांना वाट करून दिली.

उत्तर कोरियाच्या आस्थापनांवर संयुक्त राष्ट्रांचे र्निबध जारी
संयुक्त राष्ट्रे २५ एप्रिल/पीटीआय

उत्तर कोरियाने पाच एप्रिलला अग्निबाणाची चाचणी केल्यानंतरच्या पहिल्याच कडक कारवाईत संयुक्त राष्ट्रांनी क्षेपणास्त्र विकासात मदत करणाऱ्या तीन आस्थापनांवर र्निबध जारी केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेल्या अग्निबाण चाचणीचा निषेध केला होता. त्यानंतर एका समितीने आज र्निबध जारी करण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांना आता संबंधित कंपन्यांशी व्यवहार करता येणार नाहीत. र्निबध घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये कोरिया मायनिंग डेव्हलपमेंट ट्रेडिंग कार्पोरेशन व कोरिया रोनबोंग जनरल कार्पोरेशन या दोन कंपन्या तसेच तानचन कमर्शियल बँकेचा समावेश आहे.

बीडमध्ये पाच मतदानकेंद्रांवर उद्या फेरमतदान
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हे निवडणूक लढवित असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर येत्या सोमवारी फेरमतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाने नेमलेल्या निरीक्षकांच्या अहवालावरून पाच मतदान केंद्रांवर फेरमतदान घेतले जाणार आहे. केज विधानसभा मतदारसंघातील डोईफोडवाडी गावातील एक तर नांदूरघाटमधील चार मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार फेरमतदान घेण्यात येत असल्याचे राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्नो यांनी सांगितले.

निवडणुकीचे काम टाळू इच्छिणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील ४१ हजार कर्मचाऱ्यांपैकी ६०० जणांनी हे काम टाळण्यासाठी बेफिकीरी दाखवली असून येत्या सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत हे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रावर हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अन्वये खटला दाखल करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी