Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

बी.ए. प्रथम वर्षांची उत्तरपत्रिका सापडली रस्त्यावर!
वैधता तपासण्याचे कुलगुरुंचे आदेश

औरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उत्तरपत्रिकेला पाय फुटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर राष्ट्र क्रांती संघाचे कार्यकर्ते पप्पू गीते यांना ही उत्तरपत्रिका सापडली. त्यांनी ही उत्तरपत्रिका कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे सुपुर्द केली. ही उत्तरपत्रिका परीक्षा विभागाकडे देऊन सोमवारपर्यंत याची वैधता तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांना दिले आहेत.

बिकट वाट
एम. के. पिल्लई (पिल्लै) ऊर्फ माधवनकुट्टी पिल्लई. कोण आहे हा माणूस? तशी काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. वय, शिक्षण, रंग, रूप, उंच की बुटका, लठ्ठ की हडकुळा, राहतो कुठे..काहीच माहिती नाही. तरीही माधवनकुट्टीबद्दल लिहिलंच पाहिजे. कारण त्याचा एक लेख. तो व्यवसायबंधू आहे आमचा. ‘ओपन’ नावाच्या साप्ताहिकामध्ये गेल्या आठवडय़ात त्याचा लेख प्रसिद्ध झाला. ‘लिव्हिंग क्लीन.’ या साप्ताहिकाचा तो मुंबईतील सहायक संपादक आहे.

‘मिशन ट्रॅफिक थंडर’ मोहिमेचा पहिल्याच दिवशी बोजवारा
नांदेड, २५ एप्रिल/वार्ताहर

नांदेड शहरातील विस्कळीतझालेली वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने आजपासून सुरू झालेल्या ‘मिशन ट्रॅफिक थंडर’ मोहिमेचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. एकीकडे वाहनचालकांकडून कारवाई करताना दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांनीच ‘नो पार्किंग’ मध्ये वाहने उभी करून दिव्याखाली अंधाराचा प्रत्यय दिला आहे. नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत वाढलेली अतिक्रमणे, अरुंद रस्ते, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, वाहनांची झपाटय़ाने वाढत जाणारी संख्या, पोलिसांचे औदासिन्य या पाश्र्वभूमीवर वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत चालल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बीडमध्ये पाच केंद्रांवर सोमवारी फेरमतदान
बीड, २५ एप्रिल/वार्ताहर

निवडणूक निरीक्षकांच्या अहवालावरून पाच मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून सोमवार (दि. २७) मतदान सकाळी ७ ते सायं. ५ या वेळेत घेतले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी पंकजकुमार यांनी दिली. पण फेरमतदान घेण्यामागचे कारण मात्र ते सांगू शकले नाहीत. बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान २३ एप्रिलला झाले. २५ एप्रिलला सायं. ८ वा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेऊन विधानसभेच्या केज मतदारसंघातील नांदूरघाट येथील चार तर बीड तालुक्यातील डोईफोडवाडी या एकूण पाच मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याचे सांगितले.

शेतकरी संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षाला मारहाण
औरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी

मतमोजणी होण्याच्या आधीच मतदानापूर्वीचे राजकीय वैर आता पुढे येऊ लागले आहे. गावातील पाणीटंचाई संदर्भात काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे विचारणा का केली, या कारणावरून शेतकरी संघटनेच्या पैठण तालुकाध्यक्षा जनाबाई सोरमारे (वय ६०) यांना मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी मतदानाच्या दिवशी दावरवाडी येथे घडली. पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी डॉ. काळे यांनी दावरवाडी मतदान केंद्राला भेट दिली. त्या वेळी हा प्रकार घडला. गावातील पाणीटंचाईचा मुद्दा जनाबाई सोरमारे यांनी उपस्थित केला. डॉ. काळे यांनी सोरमारे यांना जेवण केले का, असा प्रश्न केला. आम्ही तुकडे मोडले, तुम्हीपण चला असे उत्तर सौ. सोरमारे यांनी डॉ. काळे यांना दिले. यावेळी उपस्थित बाबासाहेब रामकिशन मनचरे यांनी महिला तालुकाध्यक्षाला शिविगाळ केली. उमेदवार डॉ. काळे यांनी हस्तक्षेप करून ते पुढे रवाना झाले. श्रीमती सोरमारे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. मनचरे याच्यावर मारहाणीचा आणि शिविगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका प्रभाग सभापतीची निवडणूक २८ एप्रिलला
औरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग सभापतीपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (२८ एप्रिल) होत आहे. प्रभाग क्र. अ, क, ड, इ यासाठी १५ नगरसेवकांनी नामांकने केली आहेत. त्यापैकी दोन नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहे. माजी महापौर रशीद मामू आणि तरविंदरसिंग धिल्लन यांनी प्रभाग अच्या सभापतिपदी नामांकन पत्रे सादर केली आहेत.

नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही गढूळ पाणी !
नांदेड, २५ एप्रिल/वार्ताहर

महापालिकेकडून पुरवठा करण्यात येणारे पिण्याचे पाणी गढूळ व पिवळसर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवस दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद होता. कालपासून हा पुरवठा सुरळीत झाला असला तरी नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत गढूळ व पिवळसर येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मोठय़ा आशेने पाणी भरण्यासाठी नळावर रांगा लावणाऱ्या महिला व नागरिकांची दुसऱ्या दिवशीही निराशा झाली.

अभिनव पवार ‘नासा’ च्या प्रशिक्षणासाठी रवाना
गंगाखेड, २५ एप्रिल/वार्ताहर

पालम तालुक्यातील पोखर्णी (देवी) येथील सोपानराव पवार गुरुजी यांचा नातू अभिनव ओमप्रकाश पवार याची अमेरिकेतील अवकाश संशोधन व प्रशिक्षण केंद्र (नासा) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ६ मेपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी तो रवाना झाला आहे. अभिनव पवार अवकाश संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष अवकाशयानात बसण्याच्या अनुभवाबरोबरच नासातील अवकाश वीरांशी संवाद साधणार आहे. अमेरिकेतील हंटस् वील अलामाबा येथील स्पेस अ‍ॅण्ड रॉकेट सेंटरमधील सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात अभिनव सहभाग नोंदविणार आहे. तसेच सी. एन. मुख्यालय, कोकाकोला, एम्पायर स्टेट, टाईमकेअर, केनडी स्पेस सेंटर आदी स्थळांनाही तो भेट देणार आहे. अभिनवच्या या विशेष निवडीबद्दल गंगाखेड तालुक्यातील पिंपरीझोला येथील श्रीसंस्थान देवी अनुसया मठाचे महंत नरेंद्रगिरी गुरुयादव गिरी महाराज आदींनी अभिनंदन केले.

राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांत हाणामारी, १३ जण जखमी
उस्मानाबाद, २५ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत आज ईट (ता. भूम) येथे हाणामारी झाली. यात १३ जण जखमी झाले. सकाळी ८ च्या सुमारासमतदानावरून एस. टी. थांब्याजवळ झालेल्या या हाणामारीमुळे ईट गावात तणाव निर्माण झाला. लाठय़ा-काठय़ांनी झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत भीतीचे वातावरण आहे. भूम तालुक्यातील लांजेश्वर येथे बोगस मतदान होताना शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. त्या घटनेचा राग मनात धरून आज ईटमध्ये जाब विचारण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वसमत तालुक्यात दहा गावांत टॅंकरने पाणीपुरवठा
वसमत, २५ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. याबाबत प्रशासन योग्यरीत्या नियोजन करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विजयकुमार फड यांनी दिली.
वसमत तालुक्यात १० गावांत सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर विहीर अधिग्रहण झालेल्या गावांत तीस गावांचा समावेश आहे. याबाबत पंचायत समितीने दिलेल्या अहवालात तालुक्यात ९३५ हातपंप असून त्यातील ३० पंप नादुरुस्त आहेत. तर ४० विद्युत पंपांपैकी दोन पंप नादुरुस्त आहेत. ते म्हणाले, उन्हाचा पारा चढत असताना फेब्रुवारीत ५७ हातपंप घेण्यात आले. त्यातील सहा हातपंप कोरडे निघाले. तालुक्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आपसात समन्वय राखून ग्रामीण भागात पाणीटंचाई होणार नाही, यासाठी लक्ष देण्याची सूचना श्री.फड यांनी केली.

मालमोटारचालकास लुटले
हिंगोली, २५ एप्रिल/वार्ताहर

हिंगोली-वाशीम रस्त्यावर कलगाव पाटीजवळ आज पहाटे चोरटय़ांनी मालमोटारचालकास बेदम मारहाण करून १४ हजार रुपयांची रक्कम लुटली. ट्रकचालकास रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे मालमोटार( क्र. एमपी-०९-केसी-६२८५) इंदूर-चेन्नई कुरिअर पार्सल घेऊन जात असताना कलगाव ढाब्याजवळ बंद पडली. त्यावेळी चार अज्ञात चोरटय़ांनी मालमोटारचालक रागेश मीना व संजीव परमार यांना मारहाण करून १४ हजार रुपये लुटले.

कृत्रिम खतटंचाई थांबवण्याची मागणी
नांदेड, २५ एप्रिल/वार्ताहर

गतवर्षीसारखी या वर्षी कोणत्याही खताची टंचाई होणार नाही असा खुलासा कृषी विभागाने करूनही नायगावमध्ये व इतर बऱ्याच ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने खत विक्री करत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात खताचा तुटवडा भासला. परिणामी पिकांच्या नुकसानीचा फटका सोसावा लागला. त्या वेळी संभाजी ब्रिगेडने मोठय़ा प्रमाणात आंदोलन केले. तेव्हा चढय़ा भावाने होत असलेली खतांची विक्री थांबवून कृषी विभागाने खताची विक्री स्वत:च केली. पण या वर्षी शेतकऱ्यांनी खताची, बी-बियाणांची खरेदी करण्यास लवकरच सुरुवात केली आहे. मुबलक प्रमाणात डी.ए.पी., युरिया, १८:१८:१० ही खते उपलब्ध असूनही व्यापारी तीन पोत्यांमागे इतर खते किंवा औषधी अनिवार्य करत आहेत.

आगारप्रमुख कुरेशी यांचा निरोप समारंभ
अंबाजोगाई, २५ एप्रिल/वार्ताहर

अंबाजोगाई एस.टी.आगाराचे प्रमुख एम. झेड. कुरेशी यांचे परभणी येथे त्याच पदावर बदली झाल्यामुळे त्यांचा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.
अध्यक्षस्थानी कुरेशी यांच्या जागी बदलून आलेले नवे आगारप्रमुख ए. एस. सोट होते. प्रमुख पाहुणे शिवछत्रपती क्रीडापुरस्कार विजेते अब्दुल रौफ, डॉ. धर्माधिकारी व सुदर्शन रापतवार आदी होते. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक लेखा विभागप्रमुख पी. डी. करपे यांनी केले. आभार एस. एम. मोरे यांनी मानले.

वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा मेळावा
औरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज येथील झाली. यानिमित्त जिल्हा संघटनेचा मेळावाही झाला. यात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.
या मेळाव्याचे उद्घाटन मुरलीधर शिंगोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर डॉ. भागवत कराड हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोपीनाथ चव्हाण हे होते. या मेळाव्यात सुटय़ा आणि कमिशन व पुरवणी टाकणावळी यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्य संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटणकर, कोषाध्यक्ष बालाजी पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी (इचलकरंजी), रंगनाथ गायकवाड (मुंबई), शिवाजी दवंडे (सांगली), संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला जिल्हा आणि शहरातील वृत्तपत्र विक्रेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टेम्पोची रिक्षाला धडक; एक ठार,चार जखमी
बीड, २५ एप्रिल/वार्ताहर

मालगाडीच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. बीड शहरापासून जवळच परळी रस्त्यावर आज शनिवारी सकाळी बीडहून तेलगावकडे मजूर घेऊन जाणारा टेम्पो (क्र. एमसीबी-८८३६) हा पांगरबावडी येथे एका मालगाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येत असलेल्या अ‍ॅपे रिक्षा (क्र.एमएच२३-सी७७१२) ला त्याची जोराची धडक बसली. या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला जावून धडकला. त्यात सलीम फतरू पठाण (वय ३२, रा. मौज) हा जागीच ठार झाला, तर शेख मेहबूब , शेख अकिल सुलेमान, भाऊसाहेब पवार, कैलास पांडुरंग गुंजाळ, शेख मुसा (सर्व रा. गेवराई) हे जखमी झाले. त्यांच्या बरोबर असलेले शेख रईस (रा. नेकनूर), रत्नमाला घोडके, राजेंद्र तात्याराव बडगुजर, रामेश्वर श्रीमंत कुटे (रा. कुटेवाडी) हे जखमी झाले आहेत.

औरंगाबादचा क्रिकेट संघ घोषित
राहुल शर्माकडे नेतृत्व
औरंगाबाद, २५ एप्रिल/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १६ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्य़ाचा संघ घोषित करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व राहुल शर्माकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत औरंगाबादचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे शनिवारपासून सामने सुरू होणार आहेत. शुक्रवारी सकाळी हा संघ कोल्हापूरला रवाना झाला. औरंगाबाद संघाची घोषणा औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव जे. यू. मिटकर यांनी केली. निवड समितीचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सदस्य प्रमोद माने, इक्बाल सिद्दीकी, महेंद्रसिंग कानसा, समन्वयक महेश वकील यांनी हा संघ निवडला आहे. या संघाच्या व्यवस्थापकपदी देवेंद्रसिंग कानसाची निवड करण्यात आली आहे. या संघाला क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुभाष लोळगे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संघ असा- राहुल शर्मा (कर्णधार), विश्वजीत उढाण, रुपेश सातदिवे, अजय काळे, स्वप्नील चव्हाण, रोहन बोरा, सौरभ अडलग, सारंग सराफ, मुजतबा खान, सचिन लव्हेरा, गौरव वकील, इशांत फळे, सुमीत स्वामी आणि वाजिद सिद्दीकी. व्यवस्थापक- देवेंद्रसिंग कानसा.

बनावट डीडीच्या आधारे साडेसात लाख रुपयांना गंडा
औरंगाबाद, २५ एप्रिल/प्रतिनिधी

परराज्यातील शाखेचा बनावट डिमांड ड्राफ्ट देऊन शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेला सात लाख ४३ हजारांचा चुना लावणाऱ्या भामटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या महेश बाबुराव मेश्राम असे त्या भामटय़ाचे नाव आहे. त्याने हरियाणातील बाबईन येथील कॅनरा बँकेचा बनावट डीडी (क्र. २६५२९३) हा सारस्वत बँके च्या आपल्या खात्यात जमा केला. त्या डीडी आधारे त्याने साडेसात लाख रुपये आपल्या खात्यात वळते करून ते काढूनही घेतले. कॅनरा बँकेच्या शहागंज शाखेची ही फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर तात्काळ सिटी चौक पोलिसात धांव घेतली.

वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र
तुळजापूर, २५ एप्रिल/वार्ताहर

सातत्याने वाढत्या तापमानामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक खेडय़ांतील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचलेअसतानाच गेल्या पंधरवडय़ात अनेक तलावांतील पाणीसाठय़ात कमालीची घट झाली आहे. तसेच अनेक कूपनलिकांद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ओढे-नाले गेल्या दीड महिन्यापूर्वीच कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोरी धरणातील पाणीसाठय़ातही घट होत आहे. तथापि पिकासाठी होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर अजूनही नियंत्रण केले जात नाही. बडय़ा नेत्यांच्या व धनिकांच्या जमिनीतील पिकांना सध्याही मुबलक पाणी पुरविले जात असल्याची व्यथा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तुळजापूर, नळदुर्ग नगरपालिका तसेच अणदूर ग्रामस्थांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध व नियंत्रण ठेवून पिकांना पाणी देण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. तामलवाडी, सावरगाव-सोलापूर जिल्ह्य़ालगतच्या तालुक्यांच्या दक्षिण-पश्चिम परिसरातील खेडय़ांत पाण्याची टंचाईमुळे या भागातील ग्रामस्थ आता कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठय़ाच्या योजनेच्या गतीबाबत अधिक चौकशी करीत आहेत.

माहेराहून पैसे आणण्याच्या पतीच्या तगाद्यास कंटाळून पत्नीची आत्महत्या
गेवराई, २५ एप्रिल/वार्ताहर

माहेराहून २० हजार रुपये न आणल्यामुळे पती करीत असलेल्या छळास कंटाळून २४ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री सिंदफणा चिंचोली येथे ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेवराई तालुक्यातील सिंदफणा चिंचोली येथे गणेश ढवळे हा शेतकरी शेतातील कुडाच्या घरात राहतो. गणेशने आपली पत्नी संगीताला जागा घेण्यासाठी माहेराहून २० हजार रुपये घेऊन ये असे सांगितलेहोते. सहा महिने तगादा लावूनही गरिबीमुळे संगीताचे आईवडील जावयाची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे गणेशने संगीताचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळास कंटाळून संगीताने राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेऊन घरातील झोळीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाचा जीव वाचवला. संगीताचा मात्र जागीच मृत्यू झाला. संगीताचे वडील बन्सी सातपुते यांच्या फिर्यादीवरून गणेश ढवळेविरुद्ध पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मिरवणुकीवर दगडफेक; महिलेसह तिघे जखमी
परळी वैजनाथ, २५ एप्रिल/वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर रात्री आठच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री नागापूर येथे घडली. यात एका महिलेसह तिघेजण जखमी झाले आहेत. या दगडफेकीत शांताबाई उजगरे (वय ५०) यांच्या डोक्यास जबर मार लागला, तर फुलचंद सुरवसे (वय ४५), देवानंद बनसोडे (वय ३५) यांनाही मार लागला. सौ. उजगरे यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालमोटारीने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार
परळी वैजनाथ, २५ एप्रिल/वार्ताहर

भरधाव वेगाने जाणाऱ्या मालमोटारीने मोटरसायकलस्वारास धडक दिल्याने एकजण ठार झाल्याची घटना घडली. शहराच्या गणेशपार भागात राहणारे वैजनाथ पारेकर (वय १४) हे आपल्या मोटरसायकलने शेतातून घरी परतत असताना परळीहून गंगाखेडकेड जाणाऱ्या भरधाव मालमोटारीने समोरून जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. मालमोटारीचा चालक फरार झाल्याचे समजले.