Leading International Marathi News Daily
रविवार , २६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘इतक्यात पी.एम. नाही’
कोलकाता, २५ एप्रिल/पी.टी.आय.

पंतप्रधानपद स्वीकारण्याची आपली सध्या तयारी नाही. त्या पदासाठी लागणारा पुरेसा

 

अनुभव अद्याप माझ्याकडे नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक आणि सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे दिले. प्रणव मुखर्जी यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. जवळजवळ तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीची पश्चिम बंगालमधील कामगिरी इथपासून ते श्रीलंकेतील तामिळ समस्येपर्यंत अशा सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव घेतले जाते, त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना ते म्हणाले की, दोन कारणांसाठी मी हे पद स्वीकारणार नाही. पहिले कारण म्हणजे मी सध्या काँग्रेसच्या संघटनाबांधणीचे काम करत आहे. या देशात पुरोगामी, खंबीर आणि गरिबांसाठी काम करणारी संघटना उभारली जाणे अत्यंत आवश्यक आहे. या देशाची ती मूलभूत गरज आहे, असे मला वाटते. सध्या असे काम करण्याला मी सर्वोच्च प्राधान्य देत आहे. दुसरे कारण म्हणजे पंतप्रधानपदासाठी लागणारा अनुभव सध्या तरी माझ्याजवळ नाही. यूपीएला पुन्हा सत्ता मिळाल्यावर मनमोहनसिंग हेच पंतप्रधान असतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
माझे नाव गांधी आहे, ते जरी वेगळे असते तरी माझी तत्त्वे, माझे काम, माझ्या ज्या भावना आहेत त्या तशाच असतील. तुम्ही मला गांधी म्हणूनच पाहता त्याला मी काय करू? मी माझे कुटुंब तर बदलू शकत नाही. या संदर्भात मी काहीही करू शकत नाही, असे गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले.
गांधी कुटुंबीय अद्याप बोफोर्स गैरव्यवहार व शीखविरोधी दंगलीच्या छायेत आहे का व त्या संदर्भात तुम्ही माफी मागाल काय, असे विचारले असता गांधी म्हणाले, बोफोर्सचे प्रकरण हे संपूर्णपणे खोटे असून, या संदर्भात माफी मागावे असे काहीच नाही. गेली २० वर्षे विरोधी पक्षाकडून या मुद्दय़ावर अकारण आरोप होत आहेत. एलटीटीई ही दहशतवादी संघटनाच आहे. त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या हत्येला हीच संघटना जबाबदार आहे. त्यामुळे मी एलटीटीईचे समर्थन करणार नाही. मात्र श्रीलंकेमधील तामिळ नागरिकांच्या हक्काचा मुद्दा मला मान्य आहे. तेथील तामिळ नागरिकांच्या हक्काचे रक्षण झालेच पाहिजे, असेही राहूल गांधी यांनी सांगितले.