Leading International Marathi News Daily
रविवार , २६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर कोरियाच्या आस्थापनांवर संयुक्त राष्ट्रांचे र्निबध जारी
संयुक्त राष्ट्रे २५ एप्रिल/पीटीआय

उत्तर कोरियाने पाच एप्रिलला अग्निबाणाची चाचणी केल्यानंतरच्या पहिल्याच कडक

 

कारवाईत संयुक्त राष्ट्रांनी क्षेपणास्त्र विकासात मदत करणाऱ्या तीन आस्थापनांवर र्निबध जारी केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेल्या अग्निबाण चाचणीचा निषेध केला होता. त्यानंतर एका समितीने आज र्निबध जारी करण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांना आता संबंधित कंपन्यांशी व्यवहार करता येणार नाहीत. र्निबध घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये कोरिया मायनिंग डेव्हलपमेंट ट्रेडिंग कार्पोरेशन व कोरिया रोनबोंग जनरल कार्पोरेशन या दोन कंपन्या तसेच तानचन कमर्शियल बँकेचा समावेश आहे.
र्निबध समितीचे अध्यक्ष असलेले तुर्की राजदूत इलकिन यांनी सांगितले की, उत्तर कोरियातून कुठल्या वस्तूंची आयात-निर्यात करता येणार नाही याची यादीही आम्ही जाहीर केली आहे. या नवीन यादीत प्रगत अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रातील उपप्रतिनिधी पाक टोक हून यांनी या र्निबधांचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचे उल्लंघन आहे. अंतराळाचा शांततामय कार्यासाठी वापर करण्याचा कुठल्याही देशाला अधिकार आहे, तोच आम्हाला नाकारला जात आहे असे पाक टोक हून यांनी सांगितले. दरम्यान अग्निबाण चाचणीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची जी बैठक झाली होती त्यात उत्तर कोरियावर कठोर कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला रशिया व चीन यांनी विरोध केला होता.