Leading International Marathi News Daily
रविवार , २६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बीडमध्ये पाच मतदानकेंद्रांवर उद्या फेरमतदान
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हे निवडणूक लढवित असलेल्या बीड

 

लोकसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर येत्या सोमवारी फेरमतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
निवडणूक आयोगाने नेमलेल्या निरीक्षकांच्या अहवालावरून पाच मतदान केंद्रांवर फेरमतदान घेतले जाणार आहे. केज विधानसभा मतदारसंघातील डोईफोडवाडी गावातील एक तर नांदूरघाटमधील चार मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार फेरमतदान घेण्यात येत असल्याचे राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्न्ो यांनी सांगितले. गैरप्रकारांमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक वर्षांंनंतर फेरमतदान घ्यावे लागले आहे. शरद पवार हे निवडणूक लढवित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील २२ केंद्रांवर मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान झाल्याने तेथे फेरमतदान घेण्याची मागणी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी केली होती. मात्र ही मागणी मान्य झालेली नाही. या दोन गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा अहवाल निवडणूक केंद्र अधिकाऱ्याने दिला होता. त्या आधारे निवडणूक आयोगाच्या निरीक्षकाने नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची शिफारस केली होती. या दोन्ही गावांमध्ये सकाळपासूनच बोगस मतदान झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्य़ात मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी हाणामाऱ्या झाल्या होत्या.