Leading International Marathi News Daily
रविवार , २६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीचे काम टाळू इच्छिणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध शासकीय व निमशासकीय

 

कार्यालयांतील ४१ हजार कर्मचाऱ्यांपैकी ६०० जणांनी हे काम टाळण्यासाठी बेफिकीरी दाखवली असून येत्या सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत हे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रावर हजर न झाल्यास
त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अन्वये खटला दाखल करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी या वेळी शासकीय तसेच निमशासकीय सेवेतील ४१ हजार कर्मचाऱ्यांना विविध मतदारसंघांत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या २२ एप्रिल रोजी या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या कामासंबंधातील सूचना देण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यापैकी ६०० कर्मचारी त्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती केंद्रावर उपस्थित राहिले नाहीत वा उपस्थितीच्या सह्या न करताच ते निघून गेले. या बेफिकीरीबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामचुकारपणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची यादी तयार असल्याचे सांगितले. सव्वीस उपजिल्हाधिकाऱ्यांकडे या याद्या तयार असून येत्या सोमवारी हे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रावर हजर न झाल्यास कारवाई अटळ आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.