Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

प्रादेशिक

कसाबवरील आरोप सिद्ध करू-अ‍ॅड्. उज्ज्वल निकम
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्यावरील सर्व आरोप पुराव्याच्या आधारे सिद्ध केले जातील असे सांगतानाच त्यातून भारतात कायद्याचे राज्य आहे, असा संदेश जगात सर्वत्र जाईल, असा विश्वास कसाबच्या खटल्यात अभियोग पक्षाची बाजू लढविणारे वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त ‘इंडिया वन फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात अ‍ॅड्. निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अक्षताचा सत्कार; मात्र टपाल तिकीटाबाबत संभ्रम
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी
भारतीय टपाल विभागाने जानेवारी २००९ मध्ये घेतलेल्या विभागीय चित्रकला स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळालेल्या अक्षता चव्हाण या कर्णबधीर मुलीचा आज सत्कार जरी झाला तरी तिने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढण्याबाबत संभ्रमच आहे. टपाल खात्याच्या म्हणण्यानुसार असे तिकीट काढण्याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही, तर या संदर्भात प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या एसएमएसमध्ये तिचे चित्र टपाल तिकिटाच्या स्वरूपात प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट म्हटले होते. अक्षताच्या शिक्षिका मात्र टपाल विभागाने तिकीट काढण्याचे आश्वासन दिले होते या आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.

ढगाळ वातावरणाने काहिली करणारा उन्हाळा सुसह्य
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अंगाची काहिली करणारा उन्हाळा मुंबईकरांसाठी थोडासा सुसह्य झाला. येत्या २४ तासातही मुंबई आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळलेले असेल, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी मुंबईत ग्रॅण्टरोड व अन्य काही भागात तसेच ठाणे, डोंबिवली परिसरात काही क्षण पावसाचा शिडकावा झाला. या बाबत वेधशाळेकडे विचारणा केली असता, पावसाचा शिडकावा झाल्याची कोणतीही नोंद झाली नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दिवसाच्या तापमानाची नोंद ३६ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यत होत होती. मात्र आज अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाळ्याच्या तडाखा थोडासा कमी झाला. आज सकाळी साडेआठवाजेपर्यंत कुलाबा येथे ३४.९ (कमाल) व २४.८ (किमान) तसेच सांताक्रूझ येथे ३७.१ (कमाल) व २४.९ (किमान) तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ३४.५ व २४.८ इतक्या कमाल आणि किमान तापमानाची तर सांताक्रूझ येथे ३७.५ व २४.९ इतक्या कमाल व किमान तापमानाची नोंद झाली.

गिरगावात एकाची हत्या
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी

गिरगाव येथील ठाकुरद्वार परिसरात असलेल्या महाराष्ट्र फरसाण हाऊस या दुकानातील एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्याचीच डोक्यात हातोडा घालून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुरद्वार येथे अशू रुपाजी (३२) यांचे महाराष्ट्र फरसाण हाऊस हे दुकान आहे. या दुकानात यासिन शेख (३०) आणि जगदीश मिश्रा (३५) हे दोघेजण नोकरीला होते. यासिन याने आठ महिन्यांपूर्वीच मिश्रालाही दुकानात नोकरीला लावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भांडण होत असे. या भांडणाला कंटाळून जगदीशने शुक्रवारी रात्री यासिनच्या डोक्यात हातोडा घालून त्याचा खून केला. तसेच तेथून पळ काढला. मात्र पळून जात असताना गस्त पोलिसांनी त्याला अटक केली.