Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

कागदपत्रांची क्लिष्टता निवडणूक कर्मचाऱ्यांना तापदायक
श्रीरामपूर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. परंतु मतदान यंत्रे संकलनाच्या वेळी निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांच्या क्लिष्टतेमुळे निवडणूक केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना नऊ तासांचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले, परंतु कागदपत्रे भरण्याचे प्रशिक्षण मिळालेच नाही, असे सांगण्यात येते.

शनिअमावास्येनिमित्त शिंगणापूरला ३ लाख भाविकांकडून दर्शन
सोनई, २५ एप्रिल/वार्ताहर

शनिअमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येऊन सुमारे तीन लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. शुक्रवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ‘सूर्यपुत्र शनिदेव की जय’चा घोष करीत भाविक दर्शन घेत होते. आज रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ सुरूच होती. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या शनिअमावस्येचा पर्वकाळ आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच होता. तसेच दिवसभरातील रणरणत्या उन्हामुळे या वर्षी भक्तांची संख्या कमी होती. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता डेन्टल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. अनिल कोहली, सदस्य डॉ. राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, उद्योगपती अशोक गोयल यांच्या हस्ते शनिमूर्तीची विधिवत महापूजा करण्यात आली.

वारली चित्र-संस्कृती
नगरमध्ये नुकतेच
आयोजिले होते
वारली चित्रकलेचे शिबिर.
पुढाकार होता
डॉलवीन असोसिएशनचा
या छंद वर्गाला भेट देण्याचा योग आला
अन् मी कॉलेजला असताना
प्रत्यक्ष वारली गावाला भेट देऊन
ती चित्र-संस्कृती
पाहिल्याच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
वारली आदिवासी
शेणा-मातीच्या सहाय्याने घराच्या भिंती सारवतो
आणि त्याचाच
या चित्रांसाठी
‘कॅनव्हास’ म्हणून वापर करतो.
तांदळाच्या पिठाची केलेली खळ
तो पांढरा रंग म्हणून वापरतो
आणि त्याच्या सभोवतालच्या निसर्गातील
बांबूच्या काडीचा वापर करतो

‘अर्बन’च्या आजी-माजी संचालकांकडून वसुलीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती
कर्जप्रकरणात अनियमितता

नगर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

कर्जाच्या व्याजदरात दिलेली अनियमित सवलत, असुरक्षित कर्जवितरण प्रकरणी नगर अर्बन बँकेच्या ३२ आजी-माजी संचालकांकडून २५ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी सहकार खात्याने प्राथमिक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सहकार आयुक्तांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी सहकारी संस्थांचे उपनिबंधक प्रशांत सोनवणे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली. सोनवणे यांना दोन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यास बजावण्यात आले आहे.

बँकेमध्ये भरदुपारी गोंधळ घालणाऱ्या मद्यपीस अटक
नगर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

दारू पिऊन युनियन बँकेच्या शाखेत गोंधळ घालणाऱ्या साहेबराव शंकर काते (बारस्कर कॉलनी, लालटाकी) या मद्यपीस कोतवाली पोलिसांनी अटक केली. आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार बँकेच्या चितळे रस्ता शाखेत घडला. पोलिसांनी कातेविरुद्ध सरकारी कामात अडथळा, तसेच बँकेच्या व्यवस्थापकास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बँकेचे व्यवस्थापक प्रमोद मधुकर सोनकुचरे यांनी फिर्याद दिली. दुपारी बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू असताना दारू पिऊन आलेल्या कातेने आत घुसून आरडाओरड व शिवीगाळ सुरू केली. नंतर विनापरवाना व्यवस्थापक सोनकुचरे यांच्या केबिनमध्ये घुसला. तेथे त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून गोंधळ घातला. बँकेचा ग्राहक नसतानाही काते तेथे आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आले. त्यांनी कातेस अटक केली. काते याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. तो बँकेत कशासाठी आला होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.

रावसाहेब शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार
श्रीरामपूर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांना पुणे येथील भारती विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, उद्या (रविवारी) सकाळी ९ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. भारती विद्यापीठाच्या वतीने शिंदे व त्यांची पत्नी शशिकलाताई यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शिंदे यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९५४पासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू केले. ३० वर्षे त्यांनी संस्थेचे उपकार्याध्यक्ष म्हणून काम केले. आता ते कार्याध्यक्ष आहेत.
शिंदे यांनी ‘शिक्षण आणि समाज’, ‘चरित्र व चारित्र्य’, ‘ध्यासपर्व’, ‘मला भावलेली माणसे’ ही पुस्तके लिहिली. डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवन व शेगाव संस्थानचे शिवशंकर पाटील यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोथंबिर मळा येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ; १ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास
श्रीगोंदे, २५ एप्रिल/वार्ताहर

शहरातील कोंथिबिर मळा येथे आज पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. बाळासाहेब कोथंबिरे यांच्या घरावर दरोडा टाकून १ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. दरम्यान, याच टोळीने परिसरात चार-पाच ठिकाणीही चोऱ्या केल्या. आज पहाटे २ ते ४च्या सुमारास शहराजवळील गांजुरे मळा ते कोथंबिरे मळा या दरम्यान दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. कोथंबिरे यांच्या घराच्या दरवाजाला धक्का देऊन ७ ते ८ दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. कोथंबिरे यांची बहिण संगिता मेहेर यांच्या हातावर लोखंडी गजाने प्रहार करून त्यांना जखमी केले. घरातील शोकेस व कपाटातील ५ हजार रुपये व सोने-चांदीचे दागिने, मोबाईल घेऊन पोबारा केला. त्यानंतर त्याच परिसरातील चार-पाच ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल, कपडे चोरून नेले. या चोरटय़ांनी तोंडाला कुठलाही कपडा बांधला नव्हता, पेहरावही साधा होता. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख विरेश प्रभू, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप जाधव, निरीक्षक एन. आर. पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकही मागविण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

गोरक्षनाथमूर्तीला अभिषेक
नगर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

चैत्रशुद्ध एकादशीला गोरक्षनाथ गडावर (मांजरसुंबे) श्री चैतन्य गोरक्षनाथ मूर्तीला अभिषेक व पूजा वकील शंकर कदम, नवनाथांचे परमभक्त सुनील आहेर, गोपी तागड कुटुंबीय यांच्या हस्ते पार पडली. या प्रसंगी श्रीगोरक्षनाथमहाराज, भास्कर कदम, सवित्राराम कदम, अहिलाजी कदम आदी उपस्थित होते. अभिषेकाचे पौरोहित्य वकील कुलकर्णी व कुलकर्णीकाका यांनी केले. गडावर दि. १ला शिवगंगा स्तुती, होमहवन, पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विलास भुतकर, भूषण कचरे, प्रवीण अकोलकर यांनी केले आहे.

उन्हाळी कामांची लगबग
कोपरगाव, २५ एप्रिल/वार्ताहर

कुरडय़ा, पापड, शेवया, वडे आदी उन्हाळी कामांची सर्वत्र लगबग सुरू आहे. एका तरुणाने नोकरीच्या मागे न लागता मोटरसायकललाच यंत्र बसवून ओले गहू घरोघरी जाऊन दळून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कुरडय़ा करण्यासाठी तीन दिवस आधी गहू भिजत घातले जातात. त्यानंतर ते पाटा-वरवंटय़ावर किंवा मशिनवर दळावे लागतात. मात्र, महिलांना आता पाटा-वरवंटय़ाची सवय राहिली नाही. वीजकपातीमुळे यंत्रावरही ते वेळेत दळून मिळत नाहीत. धारणगाव (ता. कोपरगाव) येथील संजय नामदेव पोपळघट या दहावी शिक्षण झालेल्या तरुणाने ही गरज ओळखून मोटरसायकलला ३ हजार ५०० रुपये खर्चून गहू दळण्याचे मशिन बसवून घेतले. घरोघरी जाऊन हा तरुण १५ रुपये पायलीप्रमाणे गहू दळून देतो. एक लिटर डिझेलमध्ये ८ पायल्या गहू दळले जातात. या व्यतिरिक्त उन्हाळ्याचा मोसम संपल्यानंतर मोटरसायकलच्या सहाय्याने शेतात औषधांची फवारणी करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. १२५ रुपये एकर दराने तो फवारणी करून देतो. त्याचा हा व्यवसाय इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

वाहनाची मोटरसायकलला धडक; १ ठार, २ जखमी
नगर, २५ एप्रिल/प्रतिनिधी

वाहनाची धडक बसून मोटरसायकलस्वार सुभाष एकनाथ शेळके (३०, वडगाव गुप्ता, तालुका नगर) ठार झाला. आज दुपारी शेंडी शिवारात बायपास रस्त्यालगत हा अपघात झाला. अपघातात इतर दोघेजण जखमी झाले. एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष शेळके हे मोटरसायकलवरून (एमएच १६ आर ७२३३) नगरकडे येत होते. त्यांच्यासमवेत भाऊसाहेब धनराज शेळके व शुभम भाऊसाहेब शेळके होते. शेंडी शिवारात समोरून आलेल्या मालमोटारीची मोटरसायकलला धडक बसून सुभाष शेळके ठार झाले, तर भाऊसाहेब व शुभम जखमी झाले.

कोपरगावला ३ कोटी ९३ लाखांची मुद्रांक विक्री
कोपरगाव, २५ एप्रिल/वार्ताहर

कोपरगाव व राहाता उपकोषागारात गेल्या वर्षभरात सर्वसाधारण मुद्रांक, रेव्हेन्यू मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प व कोर्ट फी लेबलची सुमारे ३ कोटी ९३ लाख १९ हजार ६०५ रुपयांची विक्रमी विक्री झाली असून, नगरनंतर मुद्रांक विक्रीत कोपरगावचा दुसरा क्रमांक लागतो. याबाबत येथील उपकोषागार अधिकारी आर. डी. जोशी यांनी सांगितले की, १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २००९ या आर्थिक वर्षांत सर्वसाधारण मुद्रांकांची ३ कोटी ४ लाख २७ हजार ९०० रुपये, रेव्हेन्यू मुद्रांकांची २ लाख २८ हजार ८०० रुपये, कोर्ट फी स्टॅम्प ५६ लाख ६५ हजार ६०० रुपये, कोर्ट फी लेबल २९ लाख ९७ हजार ३०५ रुपयांची विक्री झाली. हा उच्चांक आहे. मार्चमध्ये सर्वसाधारण मुद्रांकाची ३१ लाख २२ हजारांची, कोर्ट फी लेबल १ लाख ९७ हजार, कोर्ट फी स्टॅम्प २ लाख ७२ हजार ८००, रेव्हेन्यू स्टॅम्प ५१ हजार २०० रुपयांची विक्री झाली. पोस्टात रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री बंद झाल्याने रेव्हेन्यू स्टॅम्प विक्रीचाही उच्चांक गाठल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

कर्जतला पारा ४० अंशांवर
कर्जत, २५ एप्रिल/वार्ताहर

वाढत्या उष्म्याने कर्जतकर त्रस्त झाले आहेत. आज तालुक्यात तापमानाने ४० अंशाचा पारा ओलांडला. या प्रचंड उष्णतेने पाण्याची जमिनीतील पातळी झपाटय़ाने घटते आहे. विहिरी कोरडय़ा पडू लागल्या आहेत. कूपनलिकांचे पाणी आटते आहे. त्यामुळे गावोगावी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारी शहरातील मुख्य रस्ता निर्मनुष्य होता. व्यापारी पेठेत लग्नसराईचे दिवस असूनही शुकशुकाट जाणवत होता. त्यातच भर दुपारी वीजकपात होत असल्याने नागरिक अस्वस्थ झाले होते. वीज नसल्याने पंखा, कुलरही निरुपयोगी ठरत आहेत.
शेतमजुरांचे तर या उष्णतेने मोठे हाल होत आहेत. ऊन अंगावर घेत काम करताना अंगाची लाहीलाही होते. शीतपेयांच्या दुकानात मात्र गर्दी आहे. या दुकानदारांनाही महागडे डिझेल व काळ्याबाजारातील रॉकेल घेऊन त्यावर जनरेटर चालवावे लागत आहे.

मजले शहर येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम
शेवगाव, २५ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील मजले शहर येथे सोमवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता सावखेडा आश्रमाचे बाळकृष्णमहाराज यांच्या व पांडुरंगमहाराज अभंग यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात येणार आहे.
सावता आश्रमाचे त्रिंबकमहाराज बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राधेश्याम बोरुडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजता बाळकृष्णमहाराजांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. ३ वाजता काशी येथील शिवकुमार शास्त्री यांचे भावार्थ रामायणावर, ४ वाजता ज्ञानेश्वर बोरुडे यांचे प्रवचन, तर रात्री जयश्री गायकवाड यांचे कीर्तन होईल.