Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

ऐतिहासिक जंजिरा
मधुकर ठाकूर

राजपुरी खाडीच्या उत्तर टोकावर राजपुरी गाव वसले आहे. मराठेशाहीच्या वेळी हे गाव आरमाराचे ठाणे होते. या खाडीच्या मुखावरच ऐतिहासिक जंजिरा किल्ला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला जंजिरा किल्ला समुद्राच्या खाडीत मोठय़ा दिमाखात इतिहासाची साक्ष देत उभा आहे. जंजिरा किल्ला ताब्यात घेऊन मराठेशाहीतील आरमाराची ताकद वाढविण्याच्या ईर्षेने शिवाजी महाराजांनी अनेक स्वाऱ्या केल्या. मात्र फंदफितुरीत अडकलेल्या मराठेशाहीला जंजिरा किल्ला शेवटपर्यंत जिंकता आला नाही. हे शल्य मराठेशाहीला शेवटपर्यंत टोचत राहिले आहे. जंजिरा किल्ला अदमासे दोन हजार वर्षांपूर्वीचा असावा, असे इतिहासकारांचे मत आहे. इ.स. ८१० ते १२५०च्या दरम्यान राजपुरी भाग पुरीच्या शिलाहारांकडे होता. त्यानंतर हा भाग अहमदनगरच्या ताब्यात जाण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारूंपासून संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी प्रथम सुरक्षित बेटावर मेढेकोट बांधला. बहमयी कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ च्या सुमारास जंजिऱ्यास वेढा घातला. मात्र किल्ल्यावर वास्तव्य करून असलेल्या कोळ्यांनी किल्ला बरेच दिवस झुंज देऊन लढविला. अखेर मलिक अहमदला वेढा उठवून निघून जावे लागले. सन १४९० मध्ये मलिक अहमद निजामशाहीचा पहिला राजा झाला. राजा झाल्यावर त्याने जंजिऱ्यावर स्वारी केली. वर्षभर जंजिऱ्याला वेढा घालून कोळ्यांना जिवे मारून समुद्रात फेकून निकराने किल्ला सर केला. त्यावेळी आरमाराचे महत्त्व जाणून या जंजिऱ्याची डागडुजी केली आणि याकुत खान या आरमार प्रमुखाच्या ताब्यात दिला. त्यानंतर पेरिम खान नामक सिद्दीने काही साथीदारांसह व्यापाऱ्यांच्या वेषात जंजिऱ्यात प्रवेश केला. त्यावेळी रामा पाटील या कोळी शूर नायकावर जंजिरा किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरतेचे व्यापारी असल्याचा बहाणा करीत पेरिम खानने किल्ल्यात आश्रय मागितला. रामा पाटीलचा विश्वास संपादन करून दारू व रेशमाच्या पेटाऱ्यासह पेरिम खानने आश्रय घेतला. विश्वासघात करून पेरिम खानने पेटाऱ्यात लपवून आणलेल्या सैनिकांनी जंजिरा हस्तगत केला. १२ वर्षांच्या वास्तव्यानंतर पेरिम खान १५३८ मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर अहमदनगरच्या बुरहान निजामशहाने जंजिरा किल्ल्याचा ताबा पार्शियन शियामंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला. पेरिम खाननंतर आलेल्या बुरहान खानने १५६७ ते १५७१ च्या दरम्यान जंजिराचा बुलंद किल्ला व तटबंदी बांधली. मात्र किल्ल्यातील मुसाफिर मशिदीच्या उत्तर भिंतीत असलेल्या पर्शियन शिलालेखावरून निजामशहाच्या आज्ञेने फाहिम खानची जंजिऱ्याच्या मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली व त्याने हा किल्ला व तटबंदी १५७६-७७ दरम्यान बांधल्याचा उल्लेख आहे. सन १५७८ मध्ये जेव्हा अकबराने गुजरात जिंकला, तेव्हा राजपुरीचा भाग अहमदनगरशी जोडण्याची व्यवस्था केली. हा भाग १६६४ पर्यंत मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर हा अहमदनगरच्या निजामशहाकडून जहागिरदार म्हणून सनद घेऊन आला. त्याने स्वत:ला जंजिरा संस्थानचा पहिला नबाब जाहीर केले. त्यानंतर सिद्दी याकुत खान, सिद्दी अंबर हे नबाब म्हणून आले. १६३६ मध्ये सिद्धी अंबर जंजिराप्रमुख असताना अहमदनगरची निजामशाही मोघलांनी पूर्णत काबीज केली आणि जंजिरासकट कोकणचा भाग विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्द करण्यात आला. त्याबरोबरच सिद्दी अंबर हा विजापूरचा ताबेदार बनला.

रसिका तुजसाठी!
अनिरुद्ध भातखंडे

‘जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन’ हा वाद मराठी सारस्वतांमध्ये फार पूर्वीपासून चालत आला आहे. कलेच्या ध्यासासाठी अथवा साधनेसाठी सारे जीवन समर्पित करणे हा अनेकांना वेडेपणा वाटतोही. परंतु चाकोरीबद्ध आयुष्यातून मनाला विरंगुळा देण्यासाठी जगण्याची नवी ऊर्मी जागविण्यासाठी हीच कला सर्वाच्या उपयोगी पडते, हे विसरून चालणार नाही. जातिवंत कलाकाराला तर त्याच्यातील ऊर्मी, प्रतिभा स्वस्थ बसू देत नाही. आपला कलाविष्कार दर्दी रसिकांसमोर करण्यासाठी तो अस्वस्थ असतो, परंतु त्याला व्यासपीठच मिळाले नाही तर.. पनवेलमध्ये २० वर्षांंपूर्वी हीच परिस्थिती होती. सर्व कलांना आश्रय देणारी एकही संस्था अस्तित्वात नसल्याने कलाकार आणि रसिक यांची सांस्कृतिक उपासमार होत होती. याच निराशाजनक आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ‘काहीतरी रचनात्मक कार्य करायला हवे’ या ईर्षेने झपाटलेले जयंत टिळक, अजय भाटवडेकर, मिलिंद पर्वते, प्रकाश भारद्वाज हे तरुण एकत्र आले आणि त्यांनी ‘पनवेल म्युझिक सर्कल’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. श्रीधर सप्रे, चंद्रकांत मने, माधव पाध्ये, माधव भिडे अशा अन्य तरुणांची त्यांना साथ लाभली आणि २७ एप्रिल १९९०, अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वि. खं. विद्यालयामध्ये डोंबिवलीतील संगीतशिक्षक कृष्णराव दसक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संस्थेचा जन्म झाला. तो कार्यक्रम जेमतेम १५-२० रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज तीच संस्था एकोणिसावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. वर्धापन दिनाच्या आजच्या कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रामध्ये अश्विनी भिडे- देशपांडे या आघाडीच्या शास्त्रीय गायिकेची मैफल आयोजित करण्यात आली आहे. गेल्या १९ वर्षांत या संस्थेची ताकद किती वाढली आहे, यासाठी ही बाब पुरेशी बोलकी आहे. कोणतीही गोष्ट सुरू करणे सोपे असते, मात्र ती टिकविणे कठीण असते. त्यात अनेक आव्हाने असतात. ही संस्था सुरू करणाऱ्यांनाही अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एखादी संस्था चालविण्यासाठी इच्छाशक्तीसह आर्थिक बळही आवश्यक असते, ही गोष्ट लक्षात घेऊन या संस्थेच्या जनकांनी आजीव सभासदत्वाची कल्पना राबविली. वार्षिक शुल्क १०० रुपये आणि आजीव सभासदत्व ५०० रुपये अशी योजना घेऊन ही मंडळी पनवेलकरांसमोर गेली. परंतु अनेक अल्पजीवी आणि आरंभशूर संस्थांची उदाहरणे डोळ्यांसमोर असल्याने सभासदत्व गळी उतरविणे कठीण ठरले. मात्र आमच्यावर विश्वास ठेवून ५०० रुपये द्या, आम्ही किमान पाच वर्षे संस्था उत्तम प्रकारे चालवून दाखवितो, असे आश्वासन (निवडणुकीतील नव्हे) या मंडळींनी रसिकांना दिले, आणि हा हा म्हणता दोन्ही प्रकारचे मिळून ६० सभासद झालेही. त्यानंतर जून १९९० मध्ये शास्त्रीय गायक पंडित सी. आर. व्यास यांची मैफल संस्थेने आयोजित करून रसिकांना अस्वस्थ केले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत- नृत्य ही केवळ उच्चभ्रूंची मक्तेदारी न राहता त्याचा जनसामान्यांपर्यंत प्रसार व्हावा, या प्रमुख उद्दिष्टाने सुरू झालेली ही संस्था आजही तो वसा राखून आहे हे विशेष. सभासदांचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती यामुळे या संस्थेने बाळसे धरले, परंतु स्वतंत्र कार्यालय, सभागृह या गोष्टी आवाक्याबाहेरच्याच होत्या. त्यामुळे जयंत टिळक यांचा ‘इम्प्रेशन्स’ हा छापखाना संस्थेचेही कार्यालय झाला. भगिनी समाज, मारुती मंदिर, कृष्णभारती सभागृह, शरद सोमण यांचे घर, पाटील निवास, आपटे टायपिंग इन्स्टिटय़ूटच्या मागे अशी अनेक स्थलांतरे या संस्थेने पाहिली. दरम्यान १९९१ पासून राज्यस्तरीय ख्यालगायन स्पर्धा आणि १९९२ पासून गायन- वादन- कला- नृत्य आदींचे वर्ग संस्थेने सुरू केले. ख्यालगायन स्पर्धेसाठी पर्वतेंनी आर्थिक आधार दिला. गायन- वादन वर्गासाठी संस्थेकडे वाद्ये नसल्याने अनेक सभासदांनी स्वत:ची वाद्ये संस्थेला दिली. संस्थेचा व्याप वाढत होता. गंगाजळीतही भर पडत होती. संस्थेच्या मालकीची वास्तू असावी, या हेतूने १० वर्षांंपूर्वी केवळ तीन लाख रुपये खात्यात असताना पदाधिकाऱ्यांनी धैर्य दाखवून आणि दूरदृष्टी बाळगून एक हजार चौरस फुटांची स्वत:ची जागा विकत घेतली. केदार एंटरप्रायझेसच्या पियूष भाईंनी बरीच मुदत दिल्याने तेव्हा ११ लाखांची ही जागा संस्थेच्या मालकीची झाली. आज याच वास्तूत वर्धापन दिन आणि दीपोत्सव मैफल वगळता सर्व कार्यक्रम होतात. गायन- वादन वर्गही येथेच होत असून नंदकुमार गोगटे, नंदकुमार कर्वे आणि जगन्नाथ जोशी या वर्गाचे कामकाज पाहतात. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणाऱ्या या विद्यालयात साधारण १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या परीक्षेला बसतात. विशेष म्हणजे दरवर्षी या विद्यालयाचा निकाल किमान ९५ टक्के लागतो. याच कार्यालयात कार्यकारिणी समितीच्या साप्ताहिक बैठका होतात. दरवर्षी वर्षांकालीन मैफल, पं. पलुस्कर पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, कोजागिरी मैफल, दिवाळी पहाट, वाद्यसंगीत, ख्यालगायन स्पर्धा, वर्धापन दिन असे कार्यक्रम सातत्याने होतात. संस्थेच्या सभासदांमध्ये अनेक गायक-वादक असल्याने हिंदी- मराठी भावगीत, चित्रपटगीतांचे अनेक प्रासंगिक कार्यक्रमही होतात. संस्थेचे कार्य केवळ गायनकलेपुरते मर्यादित राहू नये, यासाठी १९९५ मध्ये संस्थेचे ‘पनवेल कल्चरल सेंटर’असे नामकरण करण्यात आले आहे. आजीव सभासद आणि आश्रयदाते मिळून आजमितीला संस्थेचे ४०० सभासद आहेत. संस्थेने आजवर पं. सी. आर. व्यास, वीणा सहस्त्रबुद्धे, पं. अजय पोहनकर, डॉ. छाया अत्रे, श्रुती सडोलीकर, उपेंद्र भट, बकुल पंडित, सतीश व्यास, उल्हास बापट, आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, राहुल देशपांडे आदी अनेक दिग्गज गायक- वादकांच्या मैफलींचा नजराणा पनवेलकरांसमोर सादर केला आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर, प्रभाकर पणशीकर, जयंत साळगावकर, मोहन वाघ, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवरांनी संस्थेच्या वर्धापन दिनाला उपस्थिती लावली आहे. डॉ. म. गौ. जोशी आणि डॉ. सुहास हळदीपूरकर यांचे कार्यकारिणीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. गोखले सभागृहात आज होणाऱ्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यास श्रीधर सप्रे यांच्याकडून जगन्नाथ जोशी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. पनवेल कल्चरल सेंटरचा जिवंत सांस्कृतिक झरा १९ वर्षे सातत्याने वहात असल्याने पनवेल- नवीन पनवेलमधील रसिकांची तृष्णा भागत आहे. भविष्यातही यात खंड पडणार नाही.