Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

राज्य

दगडफेकीने नाशिकरोडमध्ये तणाव
नाशिकरोड २५ एप्रिल / वार्ताहर

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले नाही या कारणावरून रिपाइंच्या नगरसेवकाची गाडी जाळण्याचा प्रयत्न येथील जेलरोड भागात उघडकीस आल्यापाठोपाठ या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या समर्थकांनी बिटको चौक परिसरात दगडफेक करून काही वाहनांचे नुकसान केले. या घटनेने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सायंकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली.

तणावानंतर आता सेना-राष्ट्रवादीचा शांतता संकल्प
नाशिक, २५ एप्रिल / प्रतिनिधी

बोगस मतदानाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या वादविवादाच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील शांतता कायम राखण्यासाठी उभय पक्षांनी पुढाकार घेतला असून यापुढे वातावरण कलुषित होवू नये याकरिता कार्यकर्त्यांना सूचना देण्याचा निर्णय आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

प्राप्तिकर आयुक्तांसमवेत नाशिकमध्ये आज बैठक
नाशिक, २५ एप्रिल / प्रतिनिधी
मुख्य प्राप्तिकर आयुक्त एम. नरसिंहअप्पा हे रविवारी, २६ तारखेला नाशिकमध्ये येत असून त्यानिमित्त शहरातील उद्योजक, व्यापारी, कर सल्लागार संघटनांचे पदाधिकारी तसेच करदात्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरसिंहअप्पा हे यावेळी प्राप्तिकर कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. सारडा संकुल येथील बाबुभाई राठी सभागृहात दुपारी ४ वाजता बैठक होणार असून यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निमा, आयमा, नाईस, लघुउद्योग भारती, करसल्लागार संघटना, सी. ए. असोसिएशन या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शिंदखेडा तालुक्यात मेंढपाळ वस्तीवर दरोडा; ५० हजाराची लूट
धुळे, २५ एप्रिल / वार्ताहर
शिंदखेडा तालुक्यातील मेलाणे येथे शेतात तात्पुरती वस्ती करून राहिलेल्या मेंढपाळांच्या वस्तीवर पाच ते सात जणांनी सशस्त्र दरोडा घातला. यात तीन जण जखमी झाले. दरोडेखोरांनी रोकड, दागिने आदी मिळून सुमारे ५० हजाराचा ऐवज लुटला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.