Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

फॉर्मल.. लॅपटॉप आणि राजकारण!
प्रतिनिधी:

टाय आणि फॉर्मल्स अशा पेहेरावातील मॅनेजमेंटचे विद्यार्थी.. समोर लॅपटॉप.. माईक.. हॉलमधील फ्लॅटस्क्रीन टीव्ही.. आणि जीन्स, टीशर्ट मध्ये बोर्डरुममध्ये चक्क एका जागी उभं राहून न बोलता मोकळेपणाने फिरत तर कधी त्या टेबलवरच मांडी घालून विद्यार्थ्यांशी राजकारणावर संवाद साधणारे अतुल कुलकर्णी.. अशा वेगळ्याच वातावरणात शुक्रवारी माटुंग्यातील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन’चा दुसरा दिवस संवादाने रंगला.

निवडणुका : कशासाठी? कोणासाठी?
रत्नाकर मतकरी

दोन टप्प्यातील मतदान संपून तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येऊन ठेपले आहे, तसतसे वातावरण तापू लागले आहे. म्हणजे काय, तर निवडणुकीतील- राजकारणातील म्हणू- त्याच त्या खेळाडूंचे तेच ते तमाशे पाहायला मिळू लागले आहेत. आचारसंहितेच्या नावाखाली वाईटांचे सोडा पण खरोखरीच्या मदतीसारख्या बऱ्या गोष्टींवरही बंदी घातली गेली आहेच; पण तरीही एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे, पक्षा-पक्षांमधला हिणकसपणा चव्हाटय़ावर आणणे, उमेदवारी न मिळाल्यामुळे अश्रू ढाळणे, स्वार्थासाठी, कट्टर विरोधातल्या पक्षाला जाऊन मिळणे अशी एकंदरीत माणुसकीला लाज आणणारी अनेक कृत्य सुरू झाली आहेत.

१९५२ - पहिल्या निवडणुकीची गोष्ट!
प्रसाद रावकर
स्वतंत्र भारतात १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी मतदान केलेली तसेच या सर्व उत्साही वातावरणाची साक्षीदार असणारी पिढी आता वयाच्या पंचाहत्तरीत आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडलेली पहिल्या निवडणुकीची ही गोष्ट.. सन १९५२. देशाला अलीकडेच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतवासी आनंदात होते. तशात १९५२ मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुकांची घोषणा झालेली. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पसरलेले. ठिकठिकाणी मोठमोठय़ा नेत्यांची भाषणे होत होती आणि ती ऐकण्यासाठी मतदारांची गर्दी फुलत होती.

‘शिक्षकांनी स्वतचा शोध घ्यायला हवा!’
आजकाल सर्वत्र वेगवेगळी शिबिरे झालेली आपण पाहतो, वाचतो. या शिबिरांचा आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कळत-नकळत उपयोग होत असतो. अशाच प्रबोधनपर शिबिरांची गरज ग्रामीण भागातही असते. म्हणूनच अलिबागजवळील चौल गावी झालेले शिक्षकांसाठीचे शिबीर असेच आगळेवेगळे ठरले. कारण जसे स्वत:च्या विकासातून दुसऱ्याचा विकास साधता येतो तसेच विद्यार्थ्यांना खुलवत त्यांचा विकास, प्रगती साधताना शिक्षकही नवीन काही शिकत असतो, स्वयंविकसित होत असतो. शिक्षकाला तर जाणीवपूर्वक तसे होता आले पाहिजे. या सरळ साध्या तत्त्वावर रेणूताई दांडेकरांनी शिक्षकांचे प्रबोधन केले.

बिच्चारा प्रेक्षक आणि गरीब मराठी सिनेमा
‘‘जय भवानी, जय शिवाजी!!!’’ ‘‘मराठी माणसाचा विजय असो!!!’’ ‘‘जय महाराष्ट्र!!!’’ या घोषणा मराठी माणसाचा पुळका असणाऱ्या राजकीय सभांमधल्या नाहीत, तर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांच्या आहेत. मराठी माणूस असा का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून हा सिनेमा पहायला जावं तर जुनाच प्रश्न नव्याने पुन्हा तुमच्यासमोर उभा राहतो.

फक्त घरच सुंदर आहे..
सुनील डिंगणकर

‘सुंदर माझं घर’ या शीर्षकाचा शब्दश: अर्थ घेतला तर हे शीर्षक अगदी चपखल बसते. कारण या चित्रपटात दाखविण्यात आलेले कोकणातील घर खूप सुंदर आहे. ठाण्यातील फ्लॅटही खरंच छान आहे. पण हे शीर्षक एका चित्रपटाचे आहे. या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर..ती रडते, तिचे आई-वडील रडतात, मग तिचा नवरा रडतो, नवऱ्याची आई रडते, आईची मुलगी रडते, मुलीची वहिनी रडते, वहिनीचा नवरा रडतो आणि शेवटी सर्व हसतात. हे आहे ‘सुंदर माझं घर’. पालवी (मधुराणी गोखले-प्रभुलकर ) ही गुहागरमधील एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी.

‘रामागडी’ संस्थेची मनोवेदना
‘घास रे रामा’

मुंबईच्या चाळ-संस्कृतीत ६०-७० वर्षांमागे त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या घरांमध्ये, विशेषत: चांगले पगारदार, व्यापारी तसंच धंदेवाल्यांच्या घरी बाणकोटचे रामागडी घरकामाला असत. घरात धुण्याभांडय़ासह पडेल ती सगळी कामं करणारे हे पुरुषगडी साधारणत: कोकणातील चिपळूण पट्टय़ातून आलेले असत. चाळीतल्या दोन-चार घरांत धुणीभांडी करून, तिथेच मिळेल ती मीठ-भाकर खाऊन चाळीच्या जिन्याखाली ते राहत. अडल्या-नडलेल्या कुणालाही मदत करण्यास ते मागेपुढे पाहत नसत.

वसंतातील फुलोत्सव भाग-२
निसर्गाचे ऋतुचक्र अखंड चालू असते. वातावरणात होणाऱ्या विविध बदलांमुळेच ही निसर्गाची विविध रूपे पाहावयास मिळतात. बदलणारे तापमान, दिवसाचा कालावधी, वाऱ्याची दिशा, वातावरणातील आद्र्रता या साऱ्यांचा परिणाम म्हणूनच एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेल्या भौगोलिक वातावरणामुळेच जगाच्या पाठीवर विविध प्रकारच्या परिसंस्था पाहावयास मिळतात. या आधीच्या भागात अशोक, पारिंगा, पळस, पांगारा, काटेसावर आदी वृक्ष व त्याच्या सौंदर्यची माहिती करून घेतली. या लेखात शिरीष, वड, पिंपळ, उंबर, पिचकारी, गुलमोहर आदींची किमया पाहू.

पथनाटय़ स्पर्धेत ‘कलम ३०२’ प्रथम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्यशोधक युवा मंचतर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकजागर-२००९' या पथनाटय़ स्पर्धेत एसएनडीटी विद्यापीठाने सादर केलेल्या ‘कलम-३०२' या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकाविले. सायन-प्रतिक्षानगर येथील सावित्रीबाई फुलेनगरमध्ये गेल्यावर्षीपासून ही स्पर्धा घेण्यात येते. पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती करणे हा या उपक्रमाचा हेतू होता. मैत्री कला मंचने सादर केलेल्या ‘एचआयव्ही-एड्स' या पथनाटय़ास द्वितीय तर एक हजार रूपयांचे तृतीय पारितोषिक अष्टविनायक कलाविष्कार या संस्थेला देण्यात आले. या स्पर्धेत समता युवामंच, गौमित क्रिएशन्स या संस्थांनीही पथनाटय़े सादर केली. दिग्दर्शक नितीन नरेश, हरिश सदानी आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
प्रतिनिधी

साहित्य अकादमीतर्फे बहुभाषिक काव्यसंमेलन
साहित्य अकादमीतर्फे येत्या २९ एप्रिल रोजी बहुभाषिक काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रभातकुमार मुखोपाध्याय (बंगाली), नूतना जानी (गुजराथी), राजथ पवार (कोकणी), बृजमोहन (सिंधी) आणि भीमसेन देठे (मराठी) हे कवी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावस्कर सभागृह, दादर (पूर्व) येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून तो सर्वासाठी खुला आहे. तसेच येत्या २६ एप्रिल रोजीही काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये हितेन आनंदपरा, शकुंतला भरणे, प्रशांत मोरे व दयालखी जशनानी हे कवी सहभागी होणार आहेत. ते अनुक्रमे गुजराथी, कोकणी, मराठी व सिंधी कविता सादर करणार आहेत. हा कार्यक्रमही सायंकाळी सहा वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे होणार आहे.
प्रतिनिधी