Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

क्रीडा

युकीची विजेतेपदाला गवसणी
नवी दिल्ली, २५ एप्रिल/पीटीआय

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील कुमार विजेता युकी भांब्री याने आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेतील पहिल्या विजेतेपदाला आज येथे गवसणी घातली. त्याने आपलाच सहकारी विष्णू वर्धन याला पराभूत केले.
स्थानिक खेळाडू भांब्री याने दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या ग्रास कोर्टवर झालेला हा अंतिम सामना ७-६, ६-४ असा जिंकला. कारकीर्दीतील त्याचे हे पहिलेच आयटीएफ विजेतेपद आहे. त्याने जानेवारीत ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याचे हे पहिलेच अजिंक्यपद आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात सायमंडस् चमकला
दुबई, २५ एप्रिल/ पीटीआय

बेशिस्त वर्तनामुळे संघाबाहेर राहिलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस् ने निवड समितीने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या दोन विकेट्स घेत सायमंडस् फलंदाजीमध्येही नाबाद ५८ धावांची खेळी केल्याने ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानला सहा विकेट्सने जिंकणे शक्य झाले. या विजयाने ऑस्ट्रलियाने पाकिस्तानविरूद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

मुंबई इंडियन्स १२ धावांनी पराभूत
दरबान, २५ एप्रिल/वृत्तसंस्था

डेक्कन चार्जर्सने त्या आधी २० षटकांत ९ बाद १६८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली ती सलामीवीर हर्षेल गिब्ज ( ४४ चेंडूत ५८), कर्णधार अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट(२० चेंडूत ३५) व ड्वेन स्मिथ (२२ चेंडूत ३५) या फलंदाजांनी केलेल्या टोलेबाजीमुळे. गिलख्रिस्ट व गिब्ज या आघाडीच्या जोडीने डेक्कन चार्जर्स संघाला ६.५ षटकांत ६३ धावांची दणकेबाज सलामी करुन दिली. ३५ धावांच्या खेळीत गिलख्रिस्टने तीन षटकार व तीन चौकार लगाविले. ड्वेन ब्राव्हो याने गिलख्रिस्टला बाद करीत ही जोडी फोडण्यात यश मिळविले. गिलख्रिस्टच्या जागी मैदानात उतरलेल्या ड्वेन स्मिथ यानेही फटकेबाजीचा ओघ चालूच ठेवला.

विजयाचा ध्वज उंचाविण्यासाठी दिल्ली सज्ज
बेंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्सशी आज मुकाबला
पोर्ट एलिझाबेथ, २५ एप्रिल/ पीटीआय
आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील दोन्हीही सामने जिंकल्यामुळे विरेंद्र सेहवागचा दिल्ली डेअर डेविल्स संघ उद्या बेंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्स यांच्या विरूद्ध मैदानात उतरेल तो विजयाचा ध्वज उंचाविण्यासाठीच. दोन्हीही विजयामुळे दिल्लीच्या संघाचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. तर विजयी सलामीनंतर एकही विजय साकारता न आल्याने रॉयल्स चॅलेंजर्सला स्पर्धेत पुढे जायचे असल्यास त्यांना दिल्लीला पराभूत करण्यावाचून गत्यंतर नसेल.

पंजाब इलेव्हनसमोर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान
केप टाऊन, २५ एप्रिल / पीटीआय

धूर्त कर्णधार शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघ आणि विजयासाठी आसुसलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील उद्या होणारी आयपीएल स्पर्धेतील लढत ही सनसनाटीपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. सलग दोन पराभवांचा सामना केल्यानंतर शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सला ५५सुपर ओव्हर७७मध्ये नमविणारा गतविजेता राजस्थान रॉयल्स संघ पुन्हा एकदा फॉर्मात येऊ लागला आहे.

उत्तम खेळणारा खेळाडूच जिंकतो -भीष्मराज बाम
मुंबई, २५ एप्रिल / क्री. प्र.

जो खेळाडू आपल्या मर्यादा लक्षात घेतो आणि मला कसं जमत नाही? या प्रश्नाच्या उत्तराला सकारात्मक उत्तर देतो तो चांगला खेळाडू मानला जातो. उत्तम खेळाडू तो नाही जो नेहमी जिंकतो तर जो खेळाडू उत्तम खेळतो तो जिंकतो, असे सहज सोपे मानसशास्त्रीय विचार भीष्मराज बाम यांनी मांडले. ते अमरहिंद मंडळाच्या ६२ व्या वसंत व्याख्यानमालेत क्रीडा मानसशास्त्र या विषयावर बोलत होते. आपल्याकडे स्वत:ला खूप कमी लेखलं जातं. भारतीय खेळाडूंकडे जिद्द आहे, ध्यास आहे; पण भीतीमुळे आपण मागे पडतो, असेही भीष्मराज बाम या वेळेस म्हणाले. भारतीय मानसशास्त्राबद्दल विस्ताराने सांगताना ते म्हणाले, की योगशास्त्र हेच भारतीयांचं मानसशास्त्र आहे. या योगशास्त्राप्रमाणे आपल्याकडे ज्या गुणांची कमतरता आहे. त्या गुणांचा समावेश ज्या व्यक्तींमध्ये आहे, अशा व्यक्तीला आदर्श मानून जर आपण लक्ष एकाग्र केले तर आपण त्या व्यक्तीसमान बनण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. भारतीय योगशास्त्रातील सिद्धी, तप यांचे विस्तारित रूप स्पष्ट करताना प्रतिस्पध्र्याचे निरीक्षण, त्यांच्या खेळाचे आकलन आणि स्वत:चे अंदाज बांधण्याच्या तंत्राला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.

यजमानपद काढण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती -लॉर्गट
दुबई, २५ एप्रिल / पी. टी. आय.

पाकिस्तान २०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईगडबडीने घेण्यात आल्याच्या वृत्ताचे आयसीसीने खंडन केले आहे. पाकिस्तानातील क्रिकेटरसिक, क्रिकेट प्रशासक आणि क्रिकेटपटू यांचा निराशा आम्ही समजू शकतो, पण आम्ही निर्णय घाईने अथवा सहजगत्या घेतलेला नाही, तर हा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतलेला आहे, असे आयसीसीचे सीईओ हरून लॉर्गट यांनी पाकिस्तानच्या क्रीडामंत्री अल्ताब शहा जिलानी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले. जिलानी यांनी लॉर्गट यांची भेट घेऊन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा कसे सुरू करता येईल. याचा क्रिकेटश्रेष्ठी विचार करीत असल्याचे लॉर्गट यांनी सांगितले. सर्व संघांनी पुन्हा पाकिस्तानात येऊन क्रिकेट खेळावे, असे आम्हाला वाटते, असे ते पुढे म्हणाले.

के. एम. मुन्शी ट्वेण्टी-२० स्पर्धेत रायझिंग स्टारच्या नऊ फलंदाजांचा भोपळा
मुंबई, २५ एप्रिल / क्री. प्र.

शब्बीर शेख (१७ धावांत ४ बळी) आणि रोनित जाधव (२ धावांत २ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर रायझिंग स्टार क्रिकेट क्लब ‘ब’ संघ २४ धावांतच गारद झाला. डॉ. के. एम. मुन्शी स्मृती १४ वर्षांखालील खेळाडूंच्या ट्वेण्टी-२० स्पर्धेतील या लढतीत आर. डी. सी. सी. संघाने नंतर विजयाचे लक्ष्य केवळ २.२ धावांत पार केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या रायझिंग स्टारचे नऊ फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत व दोन फलंदाजांनी केवळ एक-एक धाव केली. मात्र आर. डी. सी. सी.च्या गोलंदाजांनी केलेली २१ वाइड चेंडूंची खैरात व एक बाय यामुळे त्यांच्या २४ धावा झाल्या. हे लक्ष्य गाठताना आर. डी. सी. सी.ने दोन बळी गमावले आणि देवंश व्यासने तीन धावांत हे दोन्ही बळी मिळविले. दुसऱ्या लढतीत अ‍ॅग्रेसिव्ह स्पोर्ट्स क्लबविरुद्ध खेळणारा सरदार वल्लभभाई पटेल ‘ब’ संघ न आल्याने त्यांना पुढे चाल देण्यात आली.