Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

ठाणे अग्निशमन दलाची स्थिती दयनीय!
संजय बापट
महानगरांचा विस्तार आणि विकास नियोजनाशिवाय होत असला, तरी त्या शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्राथमिक सेवांचे पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक असते. मात्र विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या ठाणे महापालिकेस मूलभूत सुविधांच्या नियोजनाकडे लक्ष द्यायलाच वेळ नसल्याचे दोन नमुने उघडकीस आले आहेत. घनकचऱ्याबरोबरच कोणत्याही आपत्तीच्या समयी नागरिकांसाठी देवदूत ठरणारी अग्निशमन यंत्रणाही सक्षम करण्यास पालिका प्रशासनास वेळ मिळालेला नाही. परिणामी २० लाख ठाणेकरांच्या बचावाची जबाबदारी केवळ २५९ जवानांवर सोपविण्यात आल्यामुळे अग्निशमन दलाची अवस्था आगीतून फुफाटय़ात अशीच आहे. ठाण्याचा विस्तार झपाटय़ाने होत आहे. त्या तुलनेत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत पालिका प्रशासन मोठमोठे दावे करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ठाण्याचे अनेक प्रश्न आजही आ वासून उभे आहेत. शहरातील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेला असतानाच, ठाणेकरांच्या सुरक्षिततेबाबतही पालिका प्रशासनास सोयरसुतक नसल्याचे आढळून आले आहे. आजमितीस २० लाख ठाणेकरांच्या आपत्कालीन मदतीसाठी पालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ २५९ जवानांची फौज आहे. त्यातही कोणी आजारी, कोणी रजेवर असे १० टक्के कर्मचारी अनुपस्थित असतात. साधारणत: एक लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र व ६० अधिकारी-कर्मचारी असा सुरक्षिततेबाबतचा निकष असून, शहराची सध्याची लोकसंख्या विचारात घेता २० अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे.

डिजिटल तंत्रज्ञान का?
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठविताना मूळ संदेश जशाच्या तसा मिळावा अशी ग्राहकाची अपेक्षा असते, मात्र हा संदेश रेडिओ लहरींच्या किंवा इतर माध्यमातून पाठविताना त्या माध्यमाच्या मर्यादेमुळे काही अडचणी येतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत्या प्रमाणावर गेल्या दोन दशकांमध्ये केला गेला आहे. मोबाइल फोन सेवेच्या १९८० च्या दशकामध्ये सुरू झालेल्या पहिल्या पिढीत अ‍ॅनलॉग तंत्राचा वापर केला गेला, परंतु १९९० च्या दशकापासून वापरात आलेल्या दुसऱ्या पिढीत डिजिटल तंत्रज्ञान वापरले गेले. यामध्ये युरोपमध्ये विकसित झालेले आणि भारतात मोठय़ा प्रमाणावर प्रचलित असलेले जीएसएम तंत्रज्ञान, तसेच अमेरिकेत विकसित झालेले सीडीएमएचे तंत्रज्ञान या दोन्हींचा समावेश आहे.
ध्वनिलहरींचे संदेश ध्वनिलहरींनीच प्रक्षेपित होत असतानासुद्धा काही अडचणी येतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा नाटकाच्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा पडदा वर गेल्यावर रंगमंचावरील पात्रांचे संवाद सुरू होतात आणि प्रेक्षकांमधील कुजबुज वगैरे थांबल्यावर ध्वनिलहरी प्रेक्षकांपर्यंत साऊंड सिस्टीममार्फत पोचतात. अशा वेळी लाऊडस्पीकरमधून येणाऱ्या आवाजाची शक्ती पुरेशी असावी लागते. ती तशी नसल्यास प्रेक्षक आवाजाची तक्रार करून ती शक्ती वाढवून घेतात. ही किमान शक्ती कशी ठरते? एकतर लाऊडस्पीकरपासून निघालेल्या लहरी श्रोत्यांपर्यंत पोचेपर्यंत क्षीण होतात आणि दुसरे म्हणजे प्रेक्षकांचा श्वासोच्छ्वास, थोडय़ाफार शारीरिक हालचाली, तसेच पंखे किंवा एअरकंडिशनिंग यंत्राचा होणारा थोडाफार आवाज इत्यादी सर्वांचा मिळून एक प्रकारचा गोंगाट नाटय़गृहात होत असतो. या गोंगाटाच्या पाश्र्वभूमीवर ध्वनींचा संदेश स्पष्टपणे ऐकू येण्यासाठी त्याची शक्ती अधिक असावी लागते. थोडक्यात संदेशाची शक्ती भागिले गोंगाटाची शक्ती हे प्रमाण योग्य राखावे लागते. गोंगाटाला इंग्रजीत नॉईज म्हणतात, तर संदेशाला सिग्नल म्हणतात. म्हणजेच सिग्नल टू नॉईज रेशो (एस/एन) हे फार महत्त्वाचे परिमाण आहे.
आता ध्वनीचे संदेश रेडिओ लहरींच्या माध्यमातून पाठविताना काय अडचणी येतात ते पाहू. रेडिओ प्रक्षेपकातून उत्सर्जित केलेल्या लहरींची शक्ती ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत अंतरानुसार क्षीण होते. ग्राहकाच्या उपकरणामध्ये या लहरींना त्या उपकरणातील अंतर्गत, तसेच बाहेरून आलेल्या रेडिओ नॉईजशी सामना करावा लागतो. या सर्व प्रकारात आवश्यक तेवढा (एस/एन) ठेवला, तर संदेश समाधानकारक मिळतो. जेव्हा ग्राहक रेडिओ प्रक्षेपकाच्या कक्षेच्या पलीकडे असतो तेव्हा ग्राहकापर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम रिले किंवा रिपिटर पद्धतीने टप्प्याटप्प्याने करावे लागते. उदाहरणार्थ- मुंबईतील एका व्यक्तीचा संदेश पुण्याच्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा आहे. अशा वेळी मुंबई ते १) पनवेल ते २) खोपोली ते ३) लोणावळा ते ४) चिंचवड ते ५) पुणे असे पाच टप्पे वापरले जातात असे मानू. पहिल्या टप्प्यात मुंबईच्या प्रक्षेपकाच्या रेडिओलहरी पनवेलला पोचल्यानंतर पनवेल ते खोपोलीच्या टप्प्यासाठी दुसरा रिपिटर प्रक्षेपक वापरावा लागतो. त्यासाठी पहिल्या टप्प्यातून प्राप्त झालेला संदेश प्रथम मूळ ध्वनीच्या संदेशामध्ये प्राप्त करून तो दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्षेपकावर चढवितात. अशा वेळी पहिल्या टप्प्यात ध्वनीच्या संदेशामध्ये मिसळलेल्या गोंगाटाचे निराकरण होत नाही. दुसऱ्या टप्प्यातील गोंगाटाची त्यात भर पडते आणि अशा रीतीने पाचव्या टप्प्यामध्ये सर्व पाचही टप्प्यांमधील गोंगाटाची बेरीज होऊन जो गोंगाट होतो त्याच्याशी संदेशाशी तुलना केली जाते. डिजिटल पद्धतीत पहिल्या टप्प्यात आलेल्या गोंगाटाची सफाई करून पुढल्या टप्प्यावर संदेश पाठविला जातो. म्हणजेच या पाच टप्प्यांतील गोंगाटाचा एकत्रित परिणाम होत नाही. अर्थात प्रत्येक रिपिटरमधून मूळचा संदेश पुन: निर्माण केला जातो. याला रिजनरेटिव्ह रिपिटर म्हणतात. हे कसे साधले जाते ते आकृती एकमधील आलेखांमधून स्पष्ट होईल. आलेख (अ) मध्ये ध्वनीच्या मूळ संदेशाचे डिजिटल स्वरूप दाखविले आहे. एक्स अ‍ॅक्सिसवर वेळ मिलिसेकंदात दाखविली आहे, तर वाय अ‍ॅक्सिसवर डिजिटल बिटची शक्ती व्होल्टमध्ये दाखविली आहे. या आलेखात प्रत्येक बिटचा कालावधी दोन मिली सेकंदाचा असून, दोन बिटांमध्ये आलेखाच्या सोयीसाठी एक मिली सेकंदाचे अंतर दाखविले आहे. अशा रीतीने हा चार बिटचा संदेश १ ते ३, ४ ते ६, ७ ते ९ आणि १० ते १२ मिली सेकंदाच्या वेळात साकारला आहे. बिट १ असले तर व्होल्ट ३ आहेत, तर ० बिटचे व्होल्टेज शून्य आहे. आलेखावरून हा संदेश १ १ ० १ असा आहे, हे सहज लक्षात येईल. आलेख (बी) मध्ये रिपिटरला प्राप्त झालेला गोंगाटयुक्त संदेश दाखविला आहे. त्यामध्ये बिटच्या मूळच्या व्होल्टेजवर गोंगाट आल्यामुळे बिट १ असताना प्रत्यक्ष प्राप्त संदेश ३ व्होल्टच्या वर-खाली होतो, तर बिट ० असताना शून्य व्होल्टच्या वर खाली येणारे व्होल्टेज हे गोंगाटामुळे आहे. प्राप्त झालेल्या संदेशावरून पाठविलेले बिट १ होते का ० होते हे ठरविण्याचे काम रिपिटर करतो. त्यासाठी त्यामध्ये १.५ व्होल्टची सीमारेषा किंवा उंबरठा (थ्रेशोल्ड) वापरली जाते. रिपिटरला प्राप्त झालेला संदेश १.५ व्होल्टहून जास्त असला, तर पाठविलेले बिट १ होते, असे रिपिटर ठरवितो आणि त्याप्रमाणे नवीन ३ व्होल्टचे बिट तयार करतो आणि पुढे पाठवितो. प्राप्त झालेला संदेश १.५ व्होल्टहून कमी असला, तर पाठविलेले बिट ० होते असे ठरवून रिपिटर ० व्होल्टचे बिट तयार करतो आणि पुढे पाठवितो. आलेख (क) पाहा. अशा तऱ्हेने पुनरुज्जीवित संदेश १ १ ० १ पाठविताना पहिल्या टप्प्यात आलेल्या गोंगाटाची सफाई केली जाते. अर्थातच दुसऱ्या टप्प्यात पाठविल्या गेलेल्या संदेशामध्ये फक्त दुसऱ्या टप्प्यातील गोंगाट मिसळला जातो आणि त्याच्या सफाईचे काम दुसरा रिपिटर करतो. अशा तऱ्हेने कितीही टप्पे वापरून संदेशवहन केले असले, तरी गोंगाटाची शक्ती केवळ एका टप्प्यातील गोंगाटाइतकीच असते. ती टप्प्यागणिक वाढत नाही. अशा प्रकारे डिजिटल संदेशवहनात गोंगाटात प्रतिकारशक्ती असते, हा डिजिटल पद्धतीचा फार मोठा फायदा आहे. क्वचितप्रसंगी गोंगाटाने सीमारेषा ओलांडली तर चूक होऊ शकते. ती चूक शोधून काढण्याची, तसेच दुरुस्त करण्याची व्यवस्था असते. त्यांना एरर डिटेक्टिंग कोड आणि एरर करेक्टिंग कोड म्हणतात, त्यामुळे कितीही दूर अंतरावरून पाठविलेला संदेश अचूकपणे मिळू शकतो. अशी पद्धत चांद्रयानामध्ये वापरली होती, तसेच अमेरिकेच्या शनी ग्रहावर पाठविलेल्या यानामध्येही वापरली होती. याविषयीची विस्तृत चर्चा माझ्या पूर्वीच्या लेखात केली होती. (पाहा-लोकसत्ता, ठाणे वृत्तात, १६ नोव्हेंबर २००८; अंतरिक्ष दूरसंचारातील अचूक संदेशाचे रहस्य). दूरसंचारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना दोन महत्त्वाच्या सिद्धांताचा उपयोग होतो. पहिला सिद्धांत सॅम्प्लिंग थिअरम म्हणून प्रसिद्ध आहे. आपण जो संदेश पाठविणार असतो. त्यातील जास्तीत जास्त कंपन संख्या प्रतिसेकंद जितकी असेल त्याच्या दुप्पट सॅम्पल्स प्रति सेकंदास पाठविली, तर मूळ संदेश जशाच्या तसा प्राप्त होऊ शकतो. टेलिफोन संभाषणासाठी त्यानुसार प्रति सेकंदास आठ हजार सॅम्पल्स पुरतात. आता प्रत्येक सॅम्पल डिजिटल पद्धतीने पाठविताना आपण किती बिटचे कोड वापरायला हवे, असा प्रश्न उपस्थित होतो. जास्त बिटस् वापरल्यास जास्त बॅण्डविड्थ लागते. टेलिफोन संभाषणासाठी आठ बिटचे कोड वापरल्यास प्राप्त झालेल्या संदेशाची गुणवत्ता समाधानकारक असते, असे मानले जाते. त्यामुळे आठ हजार सॅम्पल्ससाठी प्रत्येकी आठ बिट्स या हिशेबाने ६४ हजार बिट्स प्रतिसेकंद पाठविली पाहिजेत. यालाच ६४ केबीपीएस म्हणतात. एवढी बिट्स प्रतिसेकंदास पाठवायची म्हटले तर प्रचंड बॅण्डविड्थ लागते. ज्याकाळी हे तंत्रज्ञान विकसित झाले त्याकाळी बॅण्डविड्थचा प्रॉब्लेमच नव्हता, त्यामुळे एस/एन रेशो चांगला मिळविण्यासाठी बॅण्डविड्थची किंमत मोजायला टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्सची तयारी होती. या कल्पनेतूनच रेडिओ प्रसारणांसाठी मध्यम लहरींवरील अ‍ॅम्प्लिटय़ूड मॉडय़ुलेशनऐवजी फ्रिक्वेन्सी मॉडय़ुलेशन (एफएम) वापरण्याचे ठरले आणि त्यासाठी ८८-१०८ मेगाहर्ट्झचा पट्टा उपलब्ध करून दिला गेला, परंतु एफएममध्ये आपल्याला जास्त बॅण्डविड्थ वापरून जो फायदा मिळतो त्यापेक्षा अधिक फायदा डिजिटल तंत्रज्ञान वापरून पीसीएम (पल्स्) कोड मॉडय़ुलेशनने मिळतो असे सिद्ध झाले. जास्त बॅण्डविड्थ वापरा आणि चांगला एस/एन रेशो मिळवा असे सूत्र त्याकाळी प्रचलित होते. एफएमपेक्षा पीसीएममध्ये बॅण्डविड्थचा फायदा कसा अधिक होतो, यावर टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या पाठय़पुस्तकात एक सबंध प्रकरण खर्ची घातले जाऊ लागले (आणि अजूनही तीच परिस्थिती आहे) त्याकाळी म्हणजे १९६५ ते १९६८ च्या काळात मी आयआयटी दिल्लीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत होतो आणि त्यावेळी आमचे एचओडी होते लंडनच्या इंपीरिअल कॉलेजचे प्रो. जॉन ब्राऊन, त्यांनी या विषयावर एक पुस्तकही लिहिले होते. त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठीच्या लेक्चर्सना मी बसत असे आणि वर्गानंतर मी त्यांच्याशी चर्चा करीत असे. त्यावेळी मी त्यांना असा प्रश्न विचारला होता, ‘समजा मला बॅण्डविड्थ कमी वापरायची आहे तर मी एस/एन रेशो कमी वापरू शकेन का?’ त्यावेळी त्यांनी मला ‘बॅण्डविड्थचा प्रॉब्लेम नसतोच’ असे उत्तर दिले होते. आता ४० वर्षांंनंतर परिस्थिती बदलली आहे आणि स्पेक्ट्रमच्या प्रॉब्लेममुळे कमी बॅण्डविड्थ वापरून जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा द्यायची आहे. त्यामुळे मी त्यावेळी विचारलेला प्रश्न आता ज्वलंत झाला आहे. अशा वेळी मूळ सिद्धांतामध्ये फरक पडू शकत नाही, परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांचे वेगळ्या स्वरूपात विवेचन करून नवीन तंत्र विकसित करता येते. ते करणेही इलेक्ट्रॉनिक्समधील नॅनो टेक्नॉलॉजीने शक्य झाले आहे.प्रथमत: दर सेकंदाला आठ हजार सॅम्पल्स वापरायची काय जरुरी आहे, असा प्रश्न विचारू. त्याचे उत्तर मिळते त्याक्षणी संदेशामधील कमाल कंपन संख्या असेल त्याच्या दुप्पट इतकी सॅम्पल्स पुरेत. सर्व वेळ आठ हजार सॅम्पल्सची जरुरी नाही. म्हणजेच अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर या दोघांसाठी सॅम्पल्सची संख्या कमी-जास्त वापरता येईल. त्यासाठी अर्थातच इलेक्ट्रॉनिक्सची सर्किट्स अधिक गुंतागुंतीची होतील, पण आता ते आयसी चीप्सच्या प्रगतीमुळे सहज शक्य आहे. तसेच प्रत्येक सॅम्पलसाठी आठ बिटचे कोड कशासाठी वापरायचे? पीसीएमऐवजी इतर काही पद्धती उपलब्ध आहेत का? या प्रश्नालाही नवीन उत्तरे सापडतात. ध्वनीची लेव्हल एकदम बदलत नसल्यामुळे फक्त बदल किती आहे, हे सांगण्यासाठी केवळ एक बिट पुरते. त्याला डेल्टा मॉडय़ुलेशन म्हणतात. या सर्व तंत्राची माहिती पूर्वीही होती, पण आता आयसी चिप्सच्या प्रगतीने हे शक्य झाले आहे. सामान्य ग्राहकाला जरी या गोष्टीशी काही देणे-घेणे नसले, तरी ज्या विद्यार्थ्यांना टेलिकॉम क्षेत्रात करिअर करायची आहे त्यांना निश्चितच विचार करावा लागेल.