Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

विविध

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील काक्रोव्हमध्ये संस्कृत, हिंदीपाठोपाठ आता आयुर्वेदही पोलंडच्या ऐतिहासिक यागिलोनियन विद्यापीठाच्या उंबरठय़ावर
सुनील चावके
क्राकोव्ह (पोलंड), २५ एप्रिल

पोलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या भलेही हजारात असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या पाशातून सुटून भारतात आश्रयाला आलेल्या पोलिश नागरिकांचा अपवाद वगळता उभय देशांच्या नागरिकांचा तसा फारसा थेट संबंधही आलेला नाही. तरीही पोलंडची सांस्कृतिक राजधानी ठरलेल्या क्राकोव्हमध्ये संस्कृत आणि हिंदी भाषांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथील विश्वप्रसिद्ध व ऐतिहासिक यागिलोनियन विद्यापीठात तर एका शतकापासून संस्कृतचे पाठ गिरविले जात आहेत. संस्कृतच्या जोडीला हिंदी भाषेचे अध्ययन येथे लोकप्रिय झाले असून पाठोपाठ आयुर्वेदही या विद्यापीठाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. वॉर्साची दोन दिवसांची भेट आटोपून आज दुपारी क्राकोव्हमध्ये दाखल झाल्या झाल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यागिलोनियन विद्यापीठाच्या मायुस संग्रहालयात पोहोचल्या आणि त्यांनी या विद्यापीठात आयुर्वेदाचा अभ्यासही सुरु करण्याची औपचारिक सूचना केली. या सूचनेवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन विद्यापीठाने त्यांना लगेच दिले.

डॉ. अनिल गजभिये यांना ‘चिंतनसूर्य पुरस्कार’ प्रदान
(डॉ. गणेश मतकर)

इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल गजभिये यांना २००८-०९ सालासाठीचा ‘चिंतनसूर्य पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. कै. महादेवरा व रमतकार स्मृती प्रतिष्ठान, अमरावतीतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार लोककवी नाना रमतकार, व अमरावतीचे प्रो. टी. टी. लोणारे यांच्या उपस्थितीत, अ. भा. बौद्ध भिक्षू संघाचे अध्यक्ष भदन्त सदानंद महायेरो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साहित्यिकांच्या सत्काराने नवचैतन्य निर्माण होते, असे विचार महायेरो यांनी या वेळी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री महेंद्र बौद्ध होते. आपल्या भाषणात त्यांनी, सामाजिक प्रणाली ही साहित्यिक, सांस्कृतिक लेखकांच्या क्रियाशील कार्यामुळे होते आणि ते कार्य डॉ. गजभिये यांनी निष्ठेने केले आहे,’’ असे स्पष्ट केले. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, डॉ. गजभिये यांनी ‘आपल्या लिखाणाचे प्रेरणापुरुष’ प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर होते, असे सांगितले.

सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला स्पष्ट बहुमत
प्रिटोरिया २५ एप्रिल/पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत बुधवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भावी अध्यक्ष असलेल्या जॅकब झुमा यांच्यापुढे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान आहे. बुधवारच्या निवडणुकीतील ९९ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली असून अनधिकृत आकडेवारीनुसार आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला देशातील २ कोटी ३० लाख मतदारांपैकी १ कोटी १६ लाख मते पडली आहेत. दोन तृतीयांश बहुमताला थोडीच मते कमी पडली असून सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला ६६.०३ टक्के मते पडली आहेत. आता मे महिन्याच्या सुरूवातीला लोकप्रिय पण वादग्रस्त असलेले झुमा यांची अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग या विजयामुळे मोकळा झाला आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर होत असताना आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या समर्थकांनी जल्लोष केला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे. देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे मोठे आव्हान सत्ताधारी पक्षापुढे आहे. जोहान्सबर्गचा समावेश असलेल्या ग्वाटेंगचे प्रमुख पॉल मशातिले यांनी निकालानंतर सांगितले की, मतमोजणी संपली आता आमचे खरे काम सुरू होईल. आता आम्हाला बाह्य़ा सावरून काम करावे लागेल. ज्या लोकांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. दरम्यान व्होट फॉर झुमा असे लिहिलेले टी शर्ट घातलेल्या लोकांनी आम्ही झुमा यांना प्रिटोरियात नेत आहोत, अशा आशयाची झुलू भाषेतील गाणी गायिली.

उत्तर कोरियाच्या आस्थापनांवर संयुक्त राष्ट्रांचे र्निबध जारी
संयुक्त राष्ट्रे २५ एप्रिल/पीटीआय
उत्तर कोरियाने पाच एप्रिलला अग्निबाणाची चाचणी केल्यानंतरच्या पहिल्याच कडक कारवाईत संयुक्त राष्ट्रांनी क्षेपणास्त्र विकासात मदत करणाऱ्या तीन आस्थापनांवर र्निबध जारी केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियाने केलेल्या अग्निबाण चाचणीचा निषेध केला होता. त्यानंतर एका समितीने आज र्निबध जारी करण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांना आता संबंधित कंपन्यांशी व्यवहार करता येणार नाहीत. र्निबध घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये कोरिया मायनिंग डेव्हलपमेंट ट्रेडिंग कार्पोरेशन व कोरिया रोनबोंग जनरल कार्पोरेशन या दोन कंपन्या तसेच तानचन कमर्शियल बँकेचा समावेश आहे. र्निबध समितीचे अध्यक्ष असलेले तुर्की राजदूत इलकिन यांनी सांगितले की, उत्तर कोरियातून कुठल्या वस्तूंची आयात-निर्यात करता येणार नाही याची यादीही आम्ही जाहीर केली आहे. या नवीन यादीत प्रगत अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रातील उपप्रतिनिधी पाक टोक हून यांनी या र्निबधांचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचे उल्लंघन आहे. अंतराळाचा शांततामय कार्यासाठी वापर करण्याचा कुठल्याही देशाला अधिकार आहे, तोच आम्हाला नाकारला जात आहे असे पाक टोक हून यांनी सांगितले. दरम्यान अग्निबाण चाचणीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची जी बैठक झाली होती त्यात उत्तर कोरियावर कठोर कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला रशिया व चीन यांनी विरोध केला होता.