Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

अग्रलेख

दाऊदचे भाईजान?

निवडणूक प्रचाराच्या काळात आचारसंहिता उधळून देऊन काहीही बोलायची, चपला-बूट फेकायची आणि बेफाम-बेछूट बदनामीकारक आरोप करण्याची एक प्रथा सध्या प्रचलित झाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एक मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित हा निवडणुकीला उभा नाही. तरीही त्याने काही बेफाम वक्तव्ये केली आहेत. कर्नल पुरोहित स्वत:ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संस्थेतील लढाऊ कार्यकर्ता मानतो. या कर्नल पुरोहितने हिंदू दहशतवाद्यांचे जाळे निर्माण करायचा कट आखला आणि मालेगाव येथील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, असा आरोप ठेवून दहशतवादविरोधी पथकाने त्याच्यावर खटला भरला आहे. पुरोहित याच्या मार्गदर्शनानुसार, असे अनेक ‘हिंदू दहशतवादी स्वयंसेवक’ हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी तयार केले गेले आहेत. त्याच्यावरील हे आरोप हे धादांत खोटे असून हिंदू समाजाची बदनामी करणारे आहेत, येथपासून ‘खरोखरच हिंदूंनीही आता समांतर दहशतवाद प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हणत शिवसेना व संघ परिवाराने या भगव्या दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ देशभर एक मोहीम हाती घेतली होती. परंतु आता या कर्नल पुरोहितने शिवसेनेच्या नेतृत्वावरच, ते दाऊदचे सहकारी आणि हस्तक असल्याचा आरोप केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुनावणी चालू असणाऱ्या ‘मोक्का’ न्यायालयासमोर दहशतवाद प्रतिबंधक विभागाने जो पुरावा नव्याने सादर केला आहे, त्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, दयानंद पांडे आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेच्या तपशिलाचा समावेश आहे. या चर्चेत कर्नल पुरोहित आणि इतरांनी ठाकरे यांच्या ‘हिंदुत्वा’वर विश्वास ठेवता येणे अवघड आहे, असे म्हटले आहे. ‘दिवसा हिंदुत्वाची प्रखर भाषा करणारे रात्री दाऊद आणि दाऊदच्या निवडक साथीदारांसमवेत, गुंडाबरोबर बैठका घेऊन खंडणी आणि बेकायदेशीर गोष्टींविषयी चर्चा करतात,’ असा आरोपही कर्नल पुरोहितने केला आहे. कर्नल पुरोहित आणि इतरांमध्ये ही चर्चा कुठे आणि केव्हा झाली, याबद्दल त्यात उल्लेख नाही. कर्नल पुरोहित याने हा आरोप नेमक्या कोणत्या संदर्भात केला आहे, त्याच्याकडे जी काही माहिती असेल तिला पुरावा काय, तो खरेच तसे म्हणाला किंवा नाही, की पोलिसांनीच रचलेली ती गोष्ट आहे, याविषयी आम्हाला काहीही माहिती नाही. तशी ती आमच्याकडे असायचे कारणही नाही. तिच्यावर आमचा विश्वासही नाही आणि पुरोहितवर विश्वास ठेवण्याची परिस्थितीही नाही. एवढे मात्र नक्की, की पोलिसांकडे असणाऱ्या या नोंदी न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत, पण तो कबुलीजबाब नव्हे. आधीच्या आरोपपत्राला दिलेली ती जोड आहे. कबुलीजबाब असता तर त्याविषयी ‘मारहाण करून पोलिसांनी आपल्याकडून हे सारे वदवून घेतले,’ असे सांगून पुरोहितला कानावर हात ठेवता आले असते. इथे तसे करता येण्यासारखे नाही. फार तर पुरोहितला आणि त्याच्या साथीदारांना या ध्वनिफितीतला आवाज आपला नाही, असे वरुण गांधींप्रमाणे सांगता येणे शक्य होते, पण तरीही त्याच्या संभाषणातून जी काही हानी व्हायची, ती झाली आहे. हिंदुत्वाचा अवसानघात करणारी शिवसेना ही संघटना आहे, असे म्हणण्यापर्यंत कर्नल पुरोहितची मजल जाऊनही त्याविषयी शिवसेना नेते काही बोलायला तयार नाहीत, याचे मात्र सर्वानाच आश्चर्य वाटते आहे. किंबहुना यासंदर्भात दुसरी बाजू प्रसिद्ध व्हायला हवी, अन्यथा बातमी एकांगी बनायचा धोका आहे, हे ओळखून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेने शिवसेनेचे प्रवक्ते आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर काहीही सांगायला नकार दिला, असे त्या बातमीतच म्हटले आहे. ही बातमी दखल घ्यायच्या लायकीची नाही, असे शिवसेनेला वाटत असेल तर भाग निराळा, परंतु हा आरोप गंभीर आहे आणि त्यात शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे, असे म्हटले आहे. पुरोहितच्या त्या आरोपाविषयी निदान ‘रोखठोक’ काही तरी आपल्याला वाचायला मिळेल असे वाटले होते, तेही नाही. आरोप मान्य आहेत, असे म्हणावे, तर ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी,’ असे काही वर्षांपूर्वी सांगणारे एकदम जीभ अडकून पडल्यासारखे का, याचे आकलन होत नाही. लोकसत्ता’ने प्रवीण महाजनच्या आत्मवृत्तातली काही पाने प्रसिद्ध करताच आम्हाला संस्कृतीची आठवण करून देणारे संस्कृतिरक्षक आपली वृत्तपत्रीय नीती विसरले की काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही कायदेशीर मदत द्यायला बांधील आहोत, असे सांगणारे शिवसेनेचे नेते आणि ‘सामना’चे संपादक एकदम मौनीबाबा का बनले, तेही कळत नाही. दाऊद इब्राहिमच्या भावाचा बचाव जर माजिद मेमन यांच्यासारखा वकील करू शकतो, तर प्रसाद पुरोहित आदींचा बचाव आम्ही का करू नये, असा सवाल करणारे आता पुरोहितच्या या आरोपावर कोणती भूमिका बजावतात, हे पाहणे उचित ठरले असते. कर्नल प्रसाद पुरोहितवर कारवाई सुरू केली, तेव्हा त्या विभागाचे प्रमुख हेमंत करकरे यांची धिंड काढायची भाषा करून, त्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक बदनामी करण्यात आली होती. करकरे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत सातत्याने टीका केल्यावरही शिवसेनेचा आत्मा थंड झालेला नव्हता. मात्र शिवसेनेत पुरोहितच्या आरोपानंतर काय प्रतिक्रिया उमटली, तेही कळले नाही. मुंबईवर हल्ला करण्यात सहभागी असलेला आणि एकमेव वाचलेला आरोपी कसाब याचे वकीलपत्र घेणाऱ्या मराठी वकील अंजली वाघमारे यांच्या घरावर हल्ला करणारे, प्रत्यक्षात कर्नल पुरोहितकडून शिवसेनेवर आणि शिवसेनाप्रमुखांवर आरोप होऊनही काही बोलत नाहीत, हे कसे, असा आमच्याप्रमाणेच अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ‘कसाब आणि त्याचे वकील’ या विषयावर लेख लिहिला जाऊ शकतो, तर प्रसाद पुरोहितच्या या बेछूट वाटणाऱ्या आरोपावर लिहिले का जात नाही? प्रमोद महाजन हे कसे होते, त्याविषयी त्यांच्या भावाने लिहिले आणि त्यामध्ये असणारा काही भाग आम्ही प्रसिद्ध केला. प्रमोद महाजनांची प्रतिमा उजळून काढण्यासाठी संघाचे वा भाजपचे कोणीही ज्येष्ठ नेते पुढे आले नाहीत. लालकृष्ण अडवाणींपासून ते सरसंघचालक मोहन भागवतांपर्यंत आणि अरुण जेटलींपासून सुषमा स्वराज यांच्यापर्यंत सर्वचजण प्रमोद महाजनांबद्दलच्या त्या निवेदनाबाबत मूग गिळून गप्प बसले. खरे तर प्रमोद महाजन हे एकेकाळी पंतप्रधान वाजपेयींचे मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्रीही होते. मात्र प्रमोद महाजनांबद्दलचा तो मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर ही ज्येष्ठ मंडळी त्यांच्या बचावासाठी पुढे आली नाहीत. याउलट ‘सामना’, ‘तरुण भारत’, ‘विवेक’ या सर्व स्वयंभू नीतिमान वृत्तपत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांस्कृतिकतेचे आणि साधनशुचितेचे धडे शिकवले. प्रसाद पुरोहित याच्या आत्मनिवेदनाबाबत मात्र ते चकार शब्दही काढत नाहीत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? ‘प्रमोद महाजन म्हणजे देशाच्या राजकारणातले आचार्य दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, शंकरराव देव किंवा आचार्य कृपलानी नव्हेतच व तसा दावा कुणी केला नव्हता,’ असे सांगणाऱ्यांनी प्रसाद पुरोहितच्या आरोपावर आपण कोण आहोत, ते का नाही स्पष्ट केले? प्रवीण महाजनने ओकले ते गरळ असेल, तर प्रसाद पुरोहितने केले ते नेमके काय? संजय राऊत यांच्या त्या लेखात (सामना, १९ एप्रिल २००९) म्हटले होते, की ‘भाजपचे एक सरचिटणीस संजय जोशी यांची एक सीडी अशीच तयार झाली व खळबळ उडाली. ती सीडी शेवटी खोटी ठरली. कुणाची जिवंतपणी बदनामी, तर कुणाची मरणानंतर निंदानालस्ती..’ येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की संजय जोशी यांच्या बदनामीचे कुभांड संघातच रचले गेले होते आणि महाजनांची बदनामी ही त्यांच्या परिवारातील व्यक्तीनेच केली होती. कुणा काँग्रेसवाल्याने वा एखाद्या लालभाईने नव्हे. एखाद्या काँग्रेसच्या वा कम्युनिस्टांच्या पुढाऱ्याचे दाऊदशी संबंध आहेत, असे कर्नल पुरोहित वा अन्य कोणीही म्हटले असत ेतर सर्व चॅनेलवाले आणि ‘सामना’, ‘तरुण भारत’ सारखी वर्तमानपत्रे ती बातमी रंगवत व चघळत बसले असते. परंतु आता एका कट्टर हिंदुत्ववाद्यानेच त्याचा हॅण्डग्रेनेड शिवसेनेच्या दिशेने फेकला आहे. ही बातमी या मंडळींनी कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी ती दडपली जाण्याची शक्यता नाही. कर्नल पुरोहितने फक्त मालेगावच्या मशिदीतच नव्हे तर थेट शिवसेना भवनातच आणि अप्रत्यक्षपणे नागपूरच्या संघ कार्यालयात आता बॉम्ब उडवून दिला आहे.