Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीचा ‘मराठा तितुका मेळवावा’!
ईशान्य मुंबई
संतोष प्रधान

निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. पूनम महाजन यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे

 

राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. आठवडाभर या मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. भाजप नेतृत्वाने मात्र मुंडे यांची इच्छा डावलून माजी खासदार किरीट सोमय्या यांनाच उमेदवारी दिली. भाजपमध्ये उमेदवारीवरून घोळ झाला असतानाच राज्यातील एकमेव असा मतदारसंघ आहे की, काँग्रेसने स्वत:हून माघार घेत हा मतदारसंघ मित्र पक्षाच्या गळ्यात मारला. काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना ईशान्य मुंबईवरून काहीच घासाघीस झाली नाही. १९७७ व ८० चा अपवाद वगळता लागोपाठ दुसऱ्यांदा कोणालाही निवडून न देण्याची परंपरा असलेल्या या मतदारसंघात यंदा भाजपचे किरीट सोमय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय पाटील आणि मनसेचे शिशिर शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे. मराठी, दलित, गुजराती, मुस्लिम असे संमिश्र मतदारांचे प्रमाण असलेल्या मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात विजय मिळूनही माघार घेत काँग्रेसने सुरुवातीपासून हा मतदारसंघ अवघड असल्याचे सूचित केले होते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून किरीट सोमय्या यांनी मतदारसंघ बांधण्यास सुरुवात केला. यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीत काहीच आडकाठी येणार नाही, असे चित्र असताना अचानक मुंडे यांनी पुनम महाजन यांचे नाव पुढे केल्याने भाजपमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळात मतदारसंघातील भाजपमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली. सोमय्या यांचा पत्ता कापण्याकरिता स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी पुढे सरसावली होती. आता मात्र हा मुद्दा राहिलेला नसल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. सोमय्या यांचा कामापेक्षा प्रसिद्धीवर जास्त भर असतो, असा त्यांच्याबद्दल आक्षेप घेतला जातो. युती असताना शिवसेनेचे कार्यकर्ते फारसे सक्रिय झालेले दिसत नाहीत. सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये फारशी आत्मियता नाही. गेल्या आठवडय़ात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेतील गर्दी व उत्साह सोसोच होता. मतदारसंघातील सुमारे अडीच लाख गुजराती भाषिक मतदारांवर सोमय्या यांची भिस्त आहे. राष्ट्रवादीचे संजय पाटील आणि मनसेचे शिशिर शिंदे यांच्यात होणारे मराठी मतांचे विभाजन सोमय्या यांना फायदेशीरच ठरणार आहे.!
शिशिर िशदे यांचा भर मराठी मतदारांवर आहे. राज ठाकरे यांचा करिश्मा कामी येईल, असा त्यांना विश्वास आहे. सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये फारसे चांगले मत नाही. त्याचाही लाभ उठविण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. भांडूपचे आमदार असलेल्या संजय पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने सारी शक्ती पणाला लावली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फारसे यश मिळाले नव्हते. यामुळे मुंबईत राष्ट्रवादीची ताकद आहे हे दाखवून देण्याकरिता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही जागाजिंकायची, असा निर्धार राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांनी केला आहे. सोमय्या यांच्याबद्दल जसा शिवसैनिकांमध्ये फारसा उत्साह नाही तशीच परिस्थिती राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांची. ईशान्य मुंबईतील काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी गुरुदास कामत यांच्या प्रचारार्थ उत्तर-पश्चिम मतदारसंघात कार्यरत आहेत. मुळात ईशान्य मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादीची स्वत:ची अशी ताकद नाही. एक आमदार व तीन नगरसेवक एवढीच मर्यादित ताकद. याउलट मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस व भाजपचे नगरसेवक जास्त आहेत.
मतदारसंघाची नवी रचना भाजपचे किरीट सोमय्या यांना तशी फायदेशीर ठरली आहे. गुरुदास कामत हे या मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले होते. ट्रॉम्बे, चेंबूर आणि कुर्ला या तीन विधानसभा मतदारसंघांनी त्यांना प्रत्येक वेळी हात दिला होता. आता चेंबूर आणि कुर्ला हे विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबईत राहिलेले नाहीत. ट्रॉम्बे मतदारसंघातील ४० टक्के भाग नव्या शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला आहे. युतीला त्रासदायक ठरणारे तीन विधानसभा मतदारसंघ आता राहिलेले नसल्यामुळे सोमय्या यांचे पारडे जड झाले आहे. त्यातच गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सोमय्या हे गप्प बसले नव्हते. मुंबई रेल्वेमधील बॉम्बस्फोटातील जखमींच्या मदतीचा प्रश्न असो की, लाल सडका गहू, मिठी नदीचे रुंदीकरण, वन जमिनीचा प्रश्न त्यांनी लावून धरले होते.
सोमय्या यांचा भर गुजराती मतांवर असताना संजय पाटील यांची भिस्त मराठी मतदारांबरोबरच मोठय़ा प्रमाणावरील दलित व मुस्लिम मतांवर आहे. दलित व मुस्लिम एकगठ्ठा मतदान राष्ट्रवादीला होईल, असा विश्वास कामगारमंत्री नवाब मलिक यांना आहे. शिवसैनिकांचा निरुत्साह, मराठी, दलित आणि मुस्लिम मतांच्या आधारे ही जागाजिंकू, असे गणित राष्ट्रवादीने मांडले आहे. बसपा व भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार रिंगणात असले तरी ते जास्त मते खाणार नाहीत, असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. शिशिर शिंदे हे जेवढी मते घेतील तेवढा सोमय्या यांना फायदा होणार आहे. मतदारसंघाची रचना सोमय्या यांच्यासाठी अनुकूल असली तरी सुरुवातीला अगदीच एकतर्फी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली आहे. त्यातून मराठी विरुद्ध गुजराती अशा वळणावर ती सरकली आहे.

२००४ चे चित्र
काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांचा
९९ हजार मतांनी पराभव केला होता. कामत यांना ४,९३,४२०
मते मिळाली होती तर सोमय्या यांना ३,९४,०२० मते मिळाली होती.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या
ठाणे ते कुर्ला पाचवा आणि सहावा मार्ग बांधण्याचे काम गेले १० वर्षे
अनधिकृत बांधकामांमुळे रखडले आहे. अपुरा पाणीपुरवठा,
झोपडपट्टय़ा, मुलुंड व कांजूरमार्ग येथील डंम्पिग ग्राऊंड या काही प्रमुख
समस्या.

एकूण काय? - राष्ट्रवादीने सारी शक्ती पणाला लावली तरी ‘अ‍ॅडव्हाण्टेज’ भाजपचे सोमय्या यांना आहे.