Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ठाण्यात पवारांच्या ‘रोड शो’ला संमिश्र प्रतिसाद
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव

 

नाईक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ठाण्यात ‘रोड शो’ केला, त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र नौपाडा या सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांनी जाणे टाळले.
आनंदनगर जकात नाका येथून सकाळी सव्वादहा वाजता पवारांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. त्यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, अरुण गुजराथी, रामदास आठवले, शहराध्यक्ष जितेंद्र आव्हाड, पालिका विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, कॉंग्रेसचे रवींद्र फाटक, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. कोपरी-चेंदणी कोळीवाडा, राबोडी, वृंदावन, बाळकूम, कोलशेत, घोडबंदर रोड, मानपाडा, शिवाईनगर, शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, रघुनाथनगर, किसननगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट या भागातून हा रोड शो झाला. मोटरसायकल व गाडय़ांच्या ताफ्यात निघालेल्या या रोड शो दरम्यान अनेक ठिकाणी पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. आघाडीचे नगरसेवक असलेल्या कोपरी, बाळकूम, ढोकाळी, शिवाईनगर, किसननगर भागात पवारांचे जंगी स्वागत करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेक ठिकाणी पवारांचे औक्षण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रोड शो दरम्यान काही ठिकाणी पवारांनी लोकांशी संवाद साधला, तर काही ठिकाणी गाडीतूनच लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. सेना-भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात मात्र पवारांचे स्वागत थंडच झाले. यावेळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत होता.
कोपरी, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, शिवाईनगर भाग पिंजून काढणाऱ्या पवारांनी युतीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच चरई, नौपाडा भागात जाण्याचे टाळले. वेळेअभावी पवारांनी आपला रोड शो आटोपता घेतला, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. संपूर्ण ‘रोड शो’ दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा ताफा पवारांसोबत होता, तर राबोडीत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. पातलीपाडा येथे बाईक घसरल्याने पवारांच्या ताफ्यातील दोन पोलीस जखमी झाले, तर वर्तकनगर रस्त्यावर पाणी सांडल्याने बाईकवरून जाणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.