Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘लाल’ किल्ला अभेद्यच?
मिलिन्द ठेंगडी

गेल्या तीन दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या आणि लोकशाही पद्धतीने निवडून येत सर्वाधिक काळ सत्तेत असलेले जगातील एकमेव कम्युनिस्ट

 

सरकार, असा लौकिक मिरवणाऱ्या डाव्या आघाडीला पंधराव्या लोकसभेतही पुन्हा निर्णायक स्थितीत निवडून येण्याची संधी आहे. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस युती व भाजप करीत असले तरी डावी आघाडी मात्र केंद्रात सरकार स्थापन करण्याचे स्वप्न रंगवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पंधराव्या लोकसभेसाठी एकूण ४२ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. यातील पहिल्या टप्प्यात १४ जागांसाठी येत्या ३० एप्रिलला मतदान होऊ घातले आहे. दुसरा टप्पा ७ मे आणि तिसरा टप्पा १३ मे रोजी होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी जांगीपूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून माकपने त्यांच्या विरोधात मृगांक भट्टाचार्य हा नवा चेहरा रिंगणात उतरवला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे काँग्रेसच्या मतांचे बाहुल्य असलेले दोन विधानसभा मतदारसंघ अन्य मतदारसंघात गेल्यामुळे येथे काँग्रेसला फटका बसून त्याचा लाभ जांगीपूर नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले मृगांक भट्टाचार्य यांना मिळू शकतो, असे मानले जाते. प्रणव मुखर्जी यांनी ही त्यांची कदाचित शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांच्या भावनांना हात घातला आहे. गेल्या ३७-३८ वर्षांपासून खासदार असलेले प्रणव मुखर्जी प्रदीर्घ काळ राज्यसभेचेच सदस्य होते. २००४ मध्ये प्रथमच प्रत्यक्ष निवडणूक लढवून ते जांगीपूर मतदारसंघातून लोकसभेत गेले. ‘आता मी म्हातारा झालो आहे. कदाचित ही माझी शेवटची निवडणूक असू शकते. तुमच्याच आशीर्वादाने मी पहिल्याच विजयानंतर लोकसभेचा नेता बनलो आहे. असा बहुमान माझ्यापूर्वी केवळ पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनाच मिळाला आहे. मी पुन्हा तुमच्या दाराशी आलो आहे. मला पुन्हा तुमचे आशीर्वाद लाभू द्या,’ असे भावनिक आवाहन ते प्रचारादरम्यान मतदारांना करीत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात माकपचे जिल्हाध्यक्ष राबीन देब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याही लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर वेगळी चूल मांडणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत पुन्हा काँग्रेसने युती केली आहे. या युतीमुळे काँग्रेसची स्थिती काहीशी बळकट होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. मात्र, राज्यात सिंगूर येथील टाटांच्या प्रस्तावित ‘नॅनो कार’ प्रकल्पाला विरोध करताना शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेससोबतची युती तृणमूलच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. त्यामुळे या नाराजीचा फटका काँग्रेसला बसू शकतो, असे चित्र आहे. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे सहा आणि तृणमूलचा एक खासदार पश्चिम बंगालमधून निवडून गेलेला होता. ४२ जागांच्या तुलनेत ही आकडेवारी फारच नगण्य असून मोठा चमत्कार झाला तरच त्यात लक्षणीय बदल घडून येईल.
डाव्या आघाडीवर माकपचे वर्चस्व असून भाकप, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी तिचे घटक पक्ष आहेत. दुसरीकडे काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत युती केली आहे आणि आतापर्यंत कधीच राज्यात फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या भाजपने यावेळी पश्चिम बंगालमध्ये खाते उघडण्याचा चंग बांधला आहे. या सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण ३७१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पुरुलिया आणि हावडा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ आणि त्याखालोखाल उत्तर कोलकाता मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. पक्षाच्या कामगिरीबद्दल आश्वस्त असलेल्या डाव्या आघाडीने यावेळी उमेदवार निवडताना १८ नवीन चेहरे रिंगणात उतरवले आहेत. यापैकी सर्वाधिक १३ नवे उमेदवार माकपचे असून आरएसपीचे तीन आणि फारवर्ड ब्लॉकचे दोन नवे उमेदवार आहेत. उर्वरित जागांवर डाव्या आघाडीने त्यांचे परंपरागत उमेदवार उभे केले आहेत. त्यात माकपचे लोकसभेतील नेते वासुदेव आचार्य (बानकुरा), उपनेते मोहम्मद सलीम (उत्तर कोलकाता), लक्ष्मण सेठ (तामलुक), सृजन चक्रवर्ती (जाधवपूर), अमित्व नंदी (डमडम), सामिक लाहिरी (डायमंड हार्बर), ज्योतिर्मयी सिकदर (कृष्णागर), हनन मुल्ला (उलुबेरिया) आणि रूपचंद पाल (हुगळी) या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.
खरे म्हणजे, गेल्या सरकारातील काँग्रेस आणि डावे या दोन विरोधी तत्त्वांचे एकत्र येणे हेच आश्चर्य होते. मात्र, त्यानिमित्ताने परस्परांच्या संगतीचा बरावाईट अनुभव मिळालेले हे दोन्ही पक्ष यावेळी एकमेकांविरुद्ध अधिक कडवेपणाने लढत आहेत. नव्या लोकसभेतही प्रसंगी सरकार बनवताना डाव्यांची मदत घ्यावी लागू शकते, हे काँग्रेसला आणि भाजपादी पक्षांना सरकार बनवू द्यायचे नसेल तर त्यांच्या कथित ‘धर्मनिरपेक्ष’ भूमिकेला जपण्यासाठी काँग्रेसला मदत करावी लागू शकते, हे डाव्यांना माहीत असूनही दोघेही परस्परांना या निवडणुकीत पाण्यात पाहात आहेत. त्यामुळेच माकपचे प्रकाश करात यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, निवडणुकीनंतर या आघाडीला सत्तेवर येण्यासारखी स्थिती निर्माण झाली तर स्वत: पंतप्रधानपदी विराजमान होण्याची मनीषाही त्यांनी व्यक्त केली आहे. तथापि, या सरकार स्थापनेसाठी ज्या पक्षांची मदत मिळू शकते, असे करात यांना वाटत आहे त्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलायम-लालू-पासवान आघाडीत आणि खुद्द तिसऱ्या आघाडीतही पंतप्रधान बनू इच्छिणाऱ्यांची संख्या कमी नाही, हा भाग अलाहिदा परंतु, असे असले तरी डाव्या आघाडीच्या या निवडणुकीतील कामगिरीला राज्यात फारसा धोका नाही, अशीच स्थिती आहे.
माओवादी नक्षलवाद्यांचा उपद्रव असलेल्या भागात केंद्रीय सुरक्षा दलांनी शुक्रवारपासून फ्लॅगमार्च सुरू केले. प्रचार व मतदान काळात सुरक्षा व्यवस्था कायम राहावी व मतदारांना निर्भयतेने घराबाहेर पडता यावे, याकरिता नक्षलवादग्रस्त भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. विशेषत: पश्चिम मिदनापूर जिल्ह्य़ातील लालगढ भागात नक्षलवाद्यांचा जोर आहे. तेथे सुरक्षा दलाच्या २७ कंपन्या येऊन पोहोचलेल्या आहेत. या भागातील ४९ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असून तेथील ४० हजारावर मतदारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला एक विस्तृत अहवाल पाठवला. त्यात नजिकच्या बस स्थानकावरून मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मंजुरीही दिली आहे. मागील चित्र
२००४ च्या निवडणुकीत लोकसभेच्या पश्चिम बंगालमधील ४२ पैकी सर्वाधिक ३५ जागा डाव्या आघाडीकडे होत्या. त्यातही २६ जागा माकपकडे तर, प्रत्येकी तीन-तीन जागांवर विजय मिळवत भाकप, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने आघाडीला बळ दिले आहे. त्यावेळी काँग्रेसला केवळ ६, तृणमूल काँग्रेसला केवळ १ जागा तर, या ‘लाल’ किल्ल्यात भाजपला एकाही जागेवर भगवा फडकवता आलेला नव्हता.
एकूण काय? ‘लाल’ किल्ला डाव्यांकडेच शाबूत राहण्याची शक्यता.