Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांची सुपारी घेणाऱ्यांनी मराठी मतांच्या सुपारीवर बोलू नये -राज ठाकरे
संदीप आचार्य
मुंबई, २६ एप्रिल

‘वरून मराठीचे किर्तन आणि आतून उत्तर प्रदेश दिनाला पाठिंबा’ देणाऱ्यांनी मराठी मते फोडण्याचे काम मनसे करते असले बालीश आरोप करू नयेत, असा सज्जड इशारा

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जाहीरपणे भाजपशी युती आणि आतून राष्ट्रवादीशी चुंबाचुंबी करत शरद पवार यांची सुपारी घेणाऱ्यांनी मराठी मते फोडण्याचे काम मनसे करते असा आरोप करणे हास्यास्पद असून महाराष्ट्रातील लाखो मराठी तरुण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे का वळत आहेत, हे एकदा डोळे उघडून पाहा म्हणजे मराठी मते फुटत नाहीत तर मनसेकडे धबधब्यासारखी कोसळत असल्याचे दिसून येईल, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची स्थापना केली त्यावेळीही काँग्रेसने मराठी मते फोडण्यासाठी शिवसेनेला सुपारी दिल्याचा आरोप काही महाभाग करत होते. ‘शिवसेना नव्हे ही तर ‘वसंतसेनां’ अशी हेटाळणी त्यावेळी केली जात होती. तोच आरोप आज शिवसेनेतील काही महाभाग माझ्यावर करत असल्याचे राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. रायगडमध्ये शेकापला माराठी मते मिळतात. मुंबई व ठाण्यात मराठी मते काँग्रेसला देणारे अनेक मराठीजन आहत. तेथे हा आरोप केला जात नाही मात्र मनसेला जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ केले जाते असे सांगून राज म्हणाले की, मराठी मतांचा यांचा ‘ठेका’ आहे तर उत्तर भारतीयांना का कुरवाळत बसता. मुंबईतील मराठी माणसांच्या नोकऱ्यांचे प्रश्न, शाळांमध्ये मराठी शिकविण्याचा मुद्दा असो की परप्रांतून येथे येणाऱ्या लोंढय़ांकडून मुंबई व राज्यातील जमिनी बळकाविण्याचा प्रश्न असो या साऱ्या प्रकरणी शिवसेनेने काय ठोस कामगिरी बजावली तेही त्यांनी आता सांगावे असे आव्हान राज यांनी दिले. खरे तर सेनेकडे सांगण्यासारखे आता काहीच उरलेले नाही, मराठी माणसासाठी मी उभारलेल्या आंदोलनामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मराठी माणूस आज माझ्यामागे मोठय़ा प्रमाणात उभा राहिलेला आहे. बोगस शिधापत्रिकांच्या माध्यमातून लखो परप्रांतीय येथे येऊन आपले मतदारसंघ उभे करत आहेत. मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसडविण्यात येत आहेत हे उघडय़ा डोळ्यांनी दिसत असताना ‘मराठीचा मुद्दा आमचाच’ असा कंठशोष करणाऱ्यांनी पालिकेत सत्ता असूनही कोणती ठोस भूमिका घेतली असा प्रश्न उपस्थित करून निवडणुकीनंतर याच मुद्दय़ावर आपण न्यायालयात लढाई लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय बाकीच्या सेना नेत्यांचे मराठी प्रेम हे सोयीनुसार असल्याचे सांगून ज्यांनी बाळासाहेबांना टी. बाळू म्हणून हिणवले त्या छगन भुजबळ यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावणे हे कोणत्या सच्चा शिवसैनिकाला रुचणारे आहे, असा सवालही राज यांनी केला. वरून भाजपशी आणि आतून राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी युती करणाऱ्यांवर कोणता मराठी माणूस विश्वास ठेवणार असा मुद्दा राज यांनी उपस्थित केला. आतून शरद पवार यांची सुपारी घेणाऱ्यांनी मराठीच्या मते फोडण्याच्या मुद्दय़ावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. मराठीचा मुद्दा आमचाच असे गेली ४२ वर्षे सांगणाऱ्यांना महापालिकेत व राज्यात सत्ता असताना मुंबईतील दुकानांवरील साध्या पाटय़ाही मराठीत का करता आल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित करत वेळ आली की मराठीचा मुद्दा उपस्थित करायचा आणि सोयीनुसार उत्तर प्रदेश दिन साजरा करायचा, असल्या ढोंगी कारभारामुळेच आता मराठी लोक यांना विटले आहेत.