Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रामाला वनवास दाखविणाऱ्यांना अद्दल घडवा -शरद पवार
डोंबिवली, २६ एप्रिल/प्रतिनिधी

निवडणुका आल्या की ज्यांना फक्त राम आठवतो आणि सत्ता मिळाल्यानंतर रामाला जे

 

वनवास घडविण्याचे काम करतात. अशा रामावर निष्ठा नसलेल्यांना मतदानाच्या माध्यमातून अद्दल घडवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारसभेत केले.
नगरसेवक नितीन पाटील यांनी डीएनसी मैदानावर प्रचारसभेचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील, अरूण गुजराथी, किसन कथोरे, प्रमोद हिंदुराव, मंदा म्हात्रे, ज्योती कलानी, गुलाब वझे, संतोष केणे, रवी पाटील, राजश्री पादनकर, सुरेश पादनकर, प्राची शुक्ल आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, राममंदिर बांधण्याला आमचा विरोध नाही पण ज्यावेळी भाजपची सत्ता केंद्रात होती त्यावेळी त्यांचे हात कोणी मंदिर बांधण्यासाठी बांधून ठेवले होते. त्यावेळी गप्प बसले. फक्त निवडणुका आल्या की रामाचे नाव पुढे करायचे, समाजात तेढ निर्माण करायची, समस्या वाढवायच्या आणि त्या माध्यमातून मतांचा जोगवा मागायचा असे काम जी मंडळी आतापर्यंत करीत आली
आहेत. त्यांच्याकडे विकासाची कोणतीही दूरदृष्टी नाही. गांधीजींचा शांतीचा संदेश देणाऱ्या गुजरातमध्ये रक्तपात घडवून हजारो संसार कोणी उघडयावर आणले ते आता न्यायालयाच्या माध्यमातून जनता पाहत आहे, असे पवार म्हणाले.
गेले पाच वर्षांत काँग्रेस आघाडी सरकारने विकासाचे अनेक प्रकल्प राबविले. जगाने त्याची दखल घेतली. यापुढे हिंदुस्थान
बलवान करण्यासाठी आघाडीच्या उमेदवाऱ्यांना मोठय़ा संख्येने निवडून द्या, महाराष्ट्राला ताकद द्या आणि देशाला आदर्शवत ठरेल असा इतिहास आपण घडवू या, असे आवाहन पवार यांनी केले. भुजबळ म्हणाले, ज्यांना स्वत:चा भाऊ सांभाळता येत नाही ते देश, राज्य काय सांभाळणार. ज्यांनी आतापर्यंत खोटेच केले ते डावखरे यांना आता ते कसे खोटे आहे हे कळले असेल असा चिमटा भुजबळ यांनी डावखरेंच्या मातोश्रीवर जाण्यावर काढला. ज्यांनी आतापर्यंत पेटवा पेटवी, जाऊ तेथे खाऊ असा कारभार केला. टेन्डरमध्ये गैरकारभार करतात ते देशाचे संरक्षण काय करणार असा प्रश्न करून शिवसेना-भाजपचा त्यांनी समाचार घेतला. डावखरेंनी ज्याच्या हदयात बाण जातो त्यालाच त्याचे दु:ख कळते असे सांगून निवडणुकीनंतर त्या दु:खाचा निकाल लावणार असल्याचे सांगितले.