Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या पंजातून देशाची मुक्ती हाच विकासाचा मंत्र -मोदी
मुंबई, २६ एप्रिल/प्रतिनिधी

गुजरात काँग्रेसच्या पंजातून मुक्त झाला आणि गुजरातचा विकास झाला. त्याप्रमाणे देशाला

 

काँग्रेसच्या पंजातून मुक्त करा हाच विकासाचा मंत्र आहे, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा समारोप घाटकोपर येथील सभेने झाला. त्यामध्ये मोदी बोलत होते. देशावर ५० वर्षे एकाच कुटुंबाची सत्ता आहे. अमेरिकेत ज्याप्रमाणे बुश, क्लिंटन यांना गाडून ओबामा आले त्याप्रमाणे गांधी-नेहरू घराण्याला पाडून देशात भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. दहशतवादी संकटाच्या भोवऱ्यात सापडलेल्या देशाला बाहेर काढण्याचे साहस, धोरण व व्यक्तिमत्त्व काँग्रेसकडे नाही, असेही ते म्हणाले. देशातील साधन संपत्तीवर या देशातील गोरगरीबांचा पहिला हक्क आहे. मग ते कोणत्याही जाती, धर्माचे अथवा भाषेचे असोत, असे सांगत मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे या संदर्भातील उद्गार हे मतांचे राजकारण असल्याचा आरोप केला. सैन्यातील सैनिकांची धर्माच्या आधारे शिरगणती करणारी काँग्रेस धर्मनिरपेक्ष कशी, असा सवाल मोदी यांनी केला. दहशतवादाला व पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस विनोद तावडे, मधू चव्हाण, मनोहर जोशी यांची यावेळी भाषणे झाली.