Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उद्धव यांच्या अनुपस्थितीने भाजपात घबराट
मुंबई, २६ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाण्यातील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील शिवसेना-

 

भाजप युतीच्या प्रचार समारोप सभेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. यामुळे भाजपच्या तंबूत घबराट उडाली आहे. मोदी प्रचाराला आले आणि मी पडलो, असे विधान करणाऱ्या मनोहर जोशी यांनी या सभेत शिवसेनेच्या वतीने हजेरी लावली हे विशेष!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ लालकृष्ण अडवाणी व उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. त्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रफितीत त्यांनी भाजपचा व लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान करण्याचा उल्लेखही केला नाही. युतीच्या प्रचाराच्या समारोपाची सभा घाटकोपर येथे आज आयोजित केली होती. त्याकरिता छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचेही नाव छापले होते. विशेष निमंत्रितांमध्ये मनोहर जोशी यांच्याबरोबर विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम, सेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांची नावे होती. उद्धव ठाकरे यांनी सभेकडे पाठ फिरवल्यावर सुभाष देसाई, रामदास कदम व संजय राऊत हेही सभेकडे फिरकले नाहीत. मुंबईतील शिवसेनेचा एकही उमेदवार या सभेला हजर राहिला नाही.
उद्धव ठाकरे यांनी या सभेला हजर राहावे याकरिता नितीन गडकरी, किरीट सोमय्या आदींनी त्यांच्याशी वरचेवर संपर्क साधल्याचे समजते. मनोहर जोशी, सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचा निर्णय बदलण्याकरिता बराच प्रयत्न केला. परंतु उद्धव ठाकरे हे मोहन रावले यांच्या गिरगावातील स्वतंत्र सभेला हजर राहिले. शिवसेनेचे सचिव दिवाकर बोरकर यांनी भाजपच्या रमेश मेढेकर यांना दूरध्वनी करून उद्धव ठाकरे येणार नसल्याचे कळवले.
राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू होती तेव्हा मुंबई भेटीवर आलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना शिवसेनाप्रमुखांनी भेट दिली नव्हती. त्यानंतर मात्र ठाकरे-अडवाणी भेट झाली. बाळासाहेब ठाकरे इस्पितळात दाखल असताना मुंबईत आलेल्या नरेंद्र मोदी यांना ठाकरे यांची भेट घडली नव्हती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बाळासाहेबांना भेटले होते. राष्ट्रपती पदाकरिता प्रतिभाताई पाटील यांना सेनेने पाठिंबा दिला तेव्हाही मोदी यांचा फोन घेतला गेला नव्हता.