Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘धर्माच्या नावावर देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना झिडकारा’
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

देशाला सुरक्षेची हमी आणि अखंडता व एकता टिकविण्याची क्षमता केवळ काँग्रेस

 

पक्षात आहे. धर्माच्या नावावर देशाच्या एकतेला सुरुंग लावणाऱ्या भाजप-शिवसेनेसारख्या जातीय पक्षांना मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वसई येथील प्रचारसभेत केले.
पालघर व भिवंडी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अनुक्रमे दामोदर शिंगडा व सुरेश टावरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी गांधी वसईत आल्या होत्या. यावेळी त्यांची सेंट ऑगस्तीन हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा झाली. नियोजित वेळेपेक्षा त्या एक तास उशिरा येऊनही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रणरणत्या उन्हात सभेला मोठी गर्दी होती. सुमारे २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.
५०० बसेसचा ताफा!
सोनिया गांधी यांच्या सभेला गर्दी जमावी म्हणून काँग्रेसने एसटी महामंडळाच्या ५०० बसेसचा वापर केला. त्यामुळे रविवारी दिवसभर सामान्य प्रवाशांचे हाल झाले. हा सत्तेचा गैरवापर व दुरुपयोग असल्याचा आरोप करून भाजप आमदार संजय केळकर यांनी या प्रकाराविरुद्ध आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणारे असल्याचे सांगितले.