Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

राज्य

राष्ट्रवादीचा ‘मराठा तितुका मेळवावा’!
ईशान्य मुंबई

संतोष प्रधान

निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. पूनम महाजन यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. आठवडाभर या मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. भाजप नेतृत्वाने मात्र मुंडे यांची इच्छा डावलून माजी खासदार किरीट सोमय्या यांनाच उमेदवारी दिली. भाजपमध्ये उमेदवारीवरून घोळ झाला असतानाच राज्यातील एकमेव असा मतदारसंघ आहे की, काँग्रेसने स्वत:हून माघार घेत हा मतदारसंघ मित्र पक्षाच्या गळ्यात मारला. काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना ईशान्य मुंबईवरून काहीच घासाघीस झाली नाही. १९७७ व ८० चा अपवाद वगळता लागोपाठ दुसऱ्यांदा कोणालाही निवडून न देण्याची परंपरा असलेल्या या मतदारसंघात यंदा भाजपचे किरीट सोमय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय पाटील आणि मनसेचे शिशिर शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे.

ठाण्यात पवारांच्या ‘रोड शो’ला संमिश्र प्रतिसाद
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ठाण्यात ‘रोड शो’ केला, त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र नौपाडा या सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांनी जाणे टाळले. आनंदनगर जकात नाका येथून सकाळी सव्वादहा वाजता पवारांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला.

‘लाल’ किल्ला अभेद्यच?
मिलिन्द ठेंगडी

गेल्या तीन दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या आणि लोकशाही पद्धतीने निवडून येत सर्वाधिक काळ सत्तेत असलेले जगातील एकमेव कम्युनिस्ट सरकार, असा लौकिक मिरवणाऱ्या डाव्या आघाडीला पंधराव्या लोकसभेतही पुन्हा निर्णायक स्थितीत निवडून येण्याची संधी आहे. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस युती व भाजप करीत असले तरी डावी आघाडी मात्र केंद्रात सरकार स्थापन करण्याचे स्वप्न रंगवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पवारांची सुपारी घेणाऱ्यांनी मराठी मतांच्या सुपारीवर बोलू नये -राज ठाकरे
संदीप आचार्य, मुंबई, २६ एप्रिल

‘वरून मराठीचे किर्तन आणि आतून उत्तर प्रदेश दिनाला पाठिंबा’ देणाऱ्यांनी मराठी मते फोडण्याचे काम मनसे करते असले बालीश आरोप करू नयेत, असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जाहीरपणे भाजपशी युती आणि आतून राष्ट्रवादीशी चुंबाचुंबी करत शरद पवार यांची सुपारी घेणाऱ्यांनी मराठी मते फोडण्याचे काम मनसे करते असा आरोप करणे हास्यास्पद असून महाराष्ट्रातील लाखो मराठी तरुण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे का वळत आहेत, हे एकदा डोळे उघडून पाहा म्हणजे मराठी मते फुटत नाहीत तर मनसेकडे धबधब्यासारखी कोसळत असल्याचे दिसून येईल, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

रामाला वनवास दाखविणाऱ्यांना अद्दल घडवा -शरद पवार
डोंबिवली, २६ एप्रिल/प्रतिनिधी

निवडणुका आल्या की ज्यांना फक्त राम आठवतो आणि सत्ता मिळाल्यानंतर रामाला जे वनवास घडविण्याचे काम करतात. अशा रामावर निष्ठा नसलेल्यांना मतदानाच्या माध्यमातून अद्दल घडवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारसभेत केले.

काँग्रेसच्या पंजातून देशाची मुक्ती हाच विकासाचा मंत्र -मोदी
मुंबई, २६ एप्रिल/प्रतिनिधी

गुजरात काँग्रेसच्या पंजातून मुक्त झाला आणि गुजरातचा विकास झाला. त्याप्रमाणे देशाला काँग्रेसच्या पंजातून मुक्त करा हाच विकासाचा मंत्र आहे, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा समारोप घाटकोपर येथील सभेने झाला. त्यामध्ये मोदी बोलत होते. देशावर ५० वर्षे एकाच कुटुंबाची सत्ता आहे. अमेरिकेत ज्याप्रमाणे बुश, क्लिंटन यांना गाडून ओबामा आले त्याप्रमाणे गांधी-नेहरू घराण्याला पाडून देशात भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.

उद्धव यांच्या अनुपस्थितीने भाजपात घबराट
मुंबई, २६ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाण्यातील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचार समारोप सभेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. यामुळे भाजपच्या तंबूत घबराट उडाली आहे. मोदी प्रचाराला आले आणि मी पडलो, असे विधान करणाऱ्या मनोहर जोशी यांनी या सभेत शिवसेनेच्या वतीने हजेरी लावली हे विशेष!

‘धर्माच्या नावावर देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना झिडकारा’
ठाणे, २६ एप्रिल/प्रतिनिधी

देशाला सुरक्षेची हमी आणि अखंडता व एकता टिकविण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. धर्माच्या नावावर देशाच्या एकतेला सुरुंग लावणाऱ्या भाजप-शिवसेनेसारख्या जातीय पक्षांना मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वसई येथील प्रचारसभेत केले.

वसंत डावखरेंची तीन मतदार याद्यांमध्ये नावे
युतीची तक्रार
कल्याण, २६ एप्रिल/प्रतिनिधी
कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे नाव मतदार यादीत तीन ठिकाणी आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १७ नुसार हे कृत्य बेकायदेशीर असल्याने डावखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी मागणी युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

प्रियांका गांधी यांच्या दिशेने येणाऱ्या जवानाला रोखले
हरचंदपूर, २६ एप्रिल/वृत्तसंस्था

रायबरेलीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या एका निवडणूक सभेमध्ये आज एका ‘होम गार्ड’ जवानाने खळबळ उडवून दिली. या सभेच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियांका गांधी यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न या जवानाने केला. या ‘होम गार्ड’ जवानाचा रोख लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या जवानास रोखून धरले. मात्र या घटनेमुळे या भागात मोठी खळबळ उडाली. प्रियांका गांधी सध्या सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रचारासाठी राय बरेलीमधील हरचंदपूर भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या प्रचारासाठी दाखल झाल्या असता, एक होमगार्डचा जवान त्यांच्या दिशेने वेगाने जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. हा जवान प्रियांका गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कडे मोडण्याचा प्रयत्न करीत होता. सुरक्षा रक्षक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या जवानाला ताब्यात घेतले. या जवानाची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.