Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
वैद्यकीय, पशुवैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र इ. अनेक शाखांमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ‘बायॉलॉजी’ हा विषय म्हणजे प्रवेशाची ‘मास्टर की’ आहे. एकतर २०० मार्काच्या ‘मेडिकल सीईटी’मध्ये १०० मार्क बायोसाठी आहेत. त्यामुळेच हा विषय अतिशय महत्त्वाचा असून, तुमच्या प्रवेशाची ५० टक्के निश्चिती हा विषय करतो. दुसरे म्हणजे सीईटीमध्ये समान मार्क मिळविणारे अनेक विद्यार्थी असतात. उदा. २०० पैकी १८५ गुण असलेले शंभर-दीडशे विद्यार्थी असू शकतात. मग यांची मेरिट लिस्ट तयार करताना, ज्याला बायोमध्ये सर्वात जास्त गुण आहेत, त्या विद्यार्थ्यांला सर्वात वरचा नंबर दिला जातो. मित्रांनो, सीईटीचा बायो पेपर हा खरंच सोपा असतो. मग साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की, बहुसंख्य जणांना पैकीच्या पैकी किंवा किमान ९० चे वर मार्क का मिळत नाहीत?याची प्रमुख कारणे, जी निदर्शनास येतात ती अशी- १) अभ्यासाची चुकीची पद्धत, २) अकरावी-बारावीच्या मूलभूत संकल्पना माहीत नसणे, ३) पोर्शनच्या बाहेरील अवघड प्रश्न सोडविण्यात निष्कारण वेळ वाया घालविणे. (अवघड आणि स्वत:ला न सुटणारे प्रश्न म्हणजे ‘स्टँडर्ड’ असा काही विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो. ते किंवा तसलेच प्रश्न सीईटीला येणार, अशा समजुतीने त्यांची तयारी चालू असते. वास्तव मात्र अगदी वेगळे असते.) ४) भरपूर वाचन व त्यासाठी अविरत कष्ट करण्याची तयारी नसणे. ५) विषय समजून घेण्याची क्षमता व एकाग्रता कमी पडणे.

तंत्रज्ञानाधारित शिक्षण कसे असावे, असे विचारता संगणकसम्राट बिल गेट्स म्हणाला होता.. तुमच्या घरातील नादुरुस्त झालेले संगणक, तंत्रज्ञानाधारित उपकरणे मला द्या. मग मी तुम्हाला प्रात्यक्षिकासह उत्तर देतो! गेट्स केवळ एवढय़ावरच थांबले नाहीत, तर खरोखरीच बंद पडलेले काही संगणक शाळांमध्ये देण्यात आले आणि काय चमत्कार; काही दिवसांमध्ये संगणक, तंत्रज्ञानाविषयीच्या अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या. केवळ त्या बिघडलेल्या संगणकांनी चमत्कार केला होता! शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे खरं तर अधिकारी-शिक्षकवर्गापुढेच आव्हान आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थिवर्ग हा कधीपासून आतुर झाला आहे. वर्गातील तंत्रज्ञानाविष्कार घडविण्याचे ‘धाडस’ करण्यासाठी आपण कोणत्या मुहूर्ताची वाट पाहात आहोत?
शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी गल्ली ते दिल्लीपासून अनेक योजना जाहीर केल्या जातात. कोणत्या संस्थेमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू केली जाते, तर कुठे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करून लॅपटॉप देण्याची स्वप्ने रंगविली जातात. पुस्तकांऐवजी अभ्यासक्रमाच्या ‘सीडी’ तयार करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला जातो, तर कुणी इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानसाठा डाऊनलोड करतो. व्हच्र्युअल क्लासरूम हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बहुमाध्यम स्वरूपाचे शिक्षण खेडोपाडी पोचविण्यासाठी पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी ‘ट्रिपल कनेक्टिव्हिटी’च्या योजनाही जाहीर केल्या जातात. समज-गैरसमजांमुळे त्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्येही त्या अडकतात!