Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

लाल किल्ला

लोकसभा निवडणुकांच्या २६५ जागांसाठी मतदानाचे दोन टप्पे पूर्ण होऊनही कुठलाही पक्ष वा आघाडीचे पारडे जड झाल्याचे दिसणे तर दूरच, तशी शक्यताही वाटत नाही. त्यामुळे उर्वरित तीन टप्प्यांतील २७८ जागांसाठी मतदान शिल्लक असताना सर्वच राजकीय आघाडय़ांची रणनीती बदललेली दिसते. कालपर्यंत जे चेहरे होते, ते मुखवटे होताना दिसत आहेत आणि त्यांची जागा नवे चेहरे घेतील, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
अडवाणींचे नेतृत्व रालोआला बहुमतापाशी पोहोचविण्यात सक्षम वाटत नसल्यामुळे भाजपने आता नरेंद्र मोदींचे नाव पुढे करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मनमोहन

 

सिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर करून जास्तीत जास्त जागाजिंकायच्या आणि निकाल लागल्यानंतर नेतृत्वाच्या मुद्यावर नव्याने विचार करायचा, असे काँग्रेसचे डावपेच आहेत. स्वबळावर बहुमतासाठी आवश्यक २७२ पैकी ५० टक्के जागाजिंकण्याचीही शक्यता नसताना तिसऱ्या आघाडीत नेतृत्वाच्या मुद्यावर संभ्रम कायम आहे तर मायावती आणि जयललिता यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागाजिंकण्यासाठी काँग्रेसशी युती करण्याचा उद्देश साध्य झाल्यामुळे आता ३० एप्रिलनंतर शरद पवार काहीही बोलायला व करायला मोकळे होणार आहेत. महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा उरकताच ते काँग्रेसच्या विरोधात टीकेचा सूर आणखी तीव्र करू शकतात. तिसऱ्या आघाडीत सध्या ते ‘पाहुणे कलावंत’ आहेत. पण ३० एप्रिलनंतर प्रमुख भूमिका बजावण्यासाठी आपले डावपेच बदलतील. महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर त्यांचे खरे रंग दिसू लागतील. शेवटच्या दोन टप्प्यांतील १७१ जागांवरील मतदान उरले असताना पवार काँग्रेसच्या विरोधात तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये प्रचार वा टीका करून प्रकाश करात, जयललिता आणि मायावती यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू शकतात. अर्थात तिसऱ्या आघाडीवर जाहीर निष्ठा व्यक्त करूनही त्यांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचता येईल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांची गाठ मायावती आणि जयललिता या महत्त्वाकांक्षी नेत्यांशी पडलेली आहे. त्यांच्या पक्षांच्या तुलनेत पवारांच्या पक्षाचे संख्याबळ तोकडे पडण्याची चिन्हे आहेत.
मायावती आणि जयललिता यांच्यापेक्षा आपली राजकीय विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता अधिक असल्याचा मुद्दा त्यांच्या वतीने चर्चेत आणला जात आहे. तिसऱ्या आघाडीचे ‘संचालक’ प्रकाश करात यांना हा यु्क्तिवाद मान्य असला तरी तो मायावती, जयललिता किंवा चंद्राबाबू नायडू यांना मान्य होईलच याची खात्री नाही. शिवाय पहिल्या तीन टप्प्यांत नाइलाजाने किंवा मतलब साध्य करून घेण्यासाठी काँग्रेसची साथ देणाऱ्या पवार यांच्यापेक्षा मुलायमसिंह यादव यांची पाश्र्वभूमी तिसऱ्या आघाडीमध्ये अधिक विश्वासार्ह ठरू शकते.
चौदाव्या लोकसभेत काँग्रेसने आपल्या मतलबासाठी प्रकाश करात आणि मुलायमसिंह यादव यांचा वापर करून त्यांना रस्त्यावर आणून सोडले. एका अर्थाने ते दोघेही समदुखी आहेत. काँग्रेसच्या बाबतीत पवारांच्या वाटय़ाला अशी कोणतीही प्रतारणा वा दुख आलेले नाही. केवळ मायावतींनी तिसऱ्या आघाडीतील जागा अडवून ठेवल्यामुळे मुलायमसिंहांची पंचाईत झाली आहे. नाही तर त्यांच्याकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कधीचेच आले असते. निवडणूक निकालानंतर मतभेद उद्भवून मायावतींनी तिसरी आघाडी सोडली तर मुलायमसिंह यादव, रामविलास पासवान आणि लालूप्रसाद यादव यांच्यानिशी तिसऱ्या आघाडीत दाखल होऊन पवारांचे डावपेच उधळू शकतात. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत त्यांना नेतृत्व प्रस्थापित करणे वाटते तितके सोपे नाही.
नेतृत्वाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाचाही कोंडी झाली आहे. नेतृत्वाच्या आघाडीवर राहुल गांधींना गेल्या पाच वर्षांत फारसे काही करता आले नाही. त्यामुळे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची पाच वर्षांची कामगिरी मतदारांपुढे ठेवून पुन्हा त्यांच्याच नावावर मते मागण्यावाचून काँग्रेसला पर्याय नव्हता. पण मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान होण्यात अनेक अडथळे आहेत. त्यासाठी काँग्रेसला डाव्या आघाडीच्या समर्थनाशिवाय बहुमताचा आकडा गाठावा लागेल आणि तसे घडणे सहज शक्य नाही. त्यामुळेच काँग्रेस तसेच तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीचे डावपेच बदलत चालले आहेत. डाव्या आघाडीच्या समर्थनाशिवाय केंद्रात धर्मनिरपेक्ष पक्षांचे सरकार स्थापन होणार नसेल तर आज मांडली जाणारी समीकरणे निकालानंतर निर्थक ठरतील. बहुमतासाठी जागा कमी पडल्यास काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी डाव्या पक्षांच्या म्हणजे प्रकाश करात यांच्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.
आधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार नको आणि कुठल्याही परिस्थितीत मनमोहन सिंग नकोतच नकोत, अशी करात यांची भूमिका असेल. करात यांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी शरद पवार, मायावती किंवा मुलायमसिंह यादव यांची नावे पुढे केली जाण्याची शक्यता आहे. पण हे तिन्ही प्रस्ताव काँग्रेसला मान्य नसतील. पाच वर्षांचे स्थिर सरकार आणि वर्ष-दीड वर्षांचे अस्थिर सरकार यातून आपल्याला कोणता राजकीय लाभ होणार, याचाही विचार डाव्या आघाडीला करावा लागणार आहे. राजकारणात काहीही होऊ शकत असले तरी काँग्रेसच्या समर्थनाने पवार पंतप्रधान झाले तर तो भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठा चमत्कार ठरेल.
सर्वात मोठा पक्षच सत्तेत नेतृत्व करेल, असा युक्तिवाद करून काँग्रेस सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या नावावर तडजोड करण्याची शक्यता आहे. डाव्यांना प्रिय असलेल्या प्रणव मुखर्जीचे नाव पंतप्रधानपदासाठी येऊ शकते. पण त्यांच्या नावाला खुद्द सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांचाच विरोध असेल. डाव्यांच्या नादाला लागून उतारवयात आपले नुकसान करून घ्यायचे की सर्वोच्च पदाची महत्त्वाकांक्षा न बाळगता काँग्रेसमध्ये मिळत असलेला मानसन्मान कायम राखायचा याचा प्रणवदांना विचार करावा लागेल. डाव्यांशी तडजोड करून काँग्रेसचा पंतप्रधान होणार असेल तर मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त नवे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री म्हणून गेल्या पाच महिन्यांतील पी. चिदंबरम यांच्या कामगिरीवर डावी आघाडी निश्चितपणे समाधानी असेल. पण डाव्यांच्या मनात चिदंबरम यांची प्रतिमा अजूनही त्यांना दुखावणाऱ्या अर्थमंत्र्यांचीच आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी चिदंबरम यांचेही नाव डाव्यांना मान्य होणे शक्य नाही. राहुल गांधी यांच्या नावाला कोणताही ज्येष्ठ नेता संमती देईल, असे वाटत नाही. अशा स्थितीत धर्मनिरपेक्ष पक्षांचे समर्थन मिळाल्यास काँग्रेसमधून पंतप्रधानपदासाठी कोणता नवा चेहरा पुढे येतो याची सर्वाना उत्सुकता लागलेली असेल.
अडवाणींनंतर मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे जाहीर करण्यामागे अडवाणींचे ‘जड’ झालेले नेतृत्व स्वतच्या करिश्म्यावर भाजप आघाडीला बहुमतापर्यंत पोहोचवूशकत नसल्याची अप्रत्यक्ष कबुलीच देण्यासारखे आहे. पंतप्रधान झालो नाही तर राजकारण सोडून देऊ, असे विधान करीत अडवाणींनीही आपण हातघाईवर आलो असल्याचे दाखवून दिले आहे. यापुढचे राजकारण केवळ पंतप्रधानपद मिळविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे अडवाणींचे नेतृत्व टिकणार की राहणार याचा निकाल महिन्याभरातच लागणार आहे. अडवाणींचे आव्हान दुबळे होत चालल्यामुळे मोदींचे नाव पुढे करून ही निवडणूकजिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदींचे नाव पुढे केल्याने प्रथमच मतदानासाठी सज्ज झालेल्या सुमारे १० कोटी तरुणांच्या वर्गाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत अडवाणींचे नेतृत्व फिके पडण्याची शक्यता असल्यामुळे ते अंतर भरून काढण्याचाही हा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये मनमोहन सिंग यांच्यानंतर राहुल गांधी यांचेच नेतृत्व पुढे येणार हे स्पष्ट आहे. राहुल गांधींच्या खात्यावर केवळ पाच वर्षांचा राजकीय अनुभव जमा आहे, तर गुजरातमध्ये सलग आठ वर्षे ‘सुशासन’ दिल्यानंतर मोदी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज व परिपक्व झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार केंद्रात आले तर पंतप्रधान होण्याचे अडवाणींचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मोदींकडे नेतृत्व सोपविले जाऊ शकते. मोदींच्या नेतृत्वावर यथावकाश संघाच्या मंजुरीचे शिक्कामोर्तब होईल. अर्थात, मोदींचे संभाव्य नेतृत्व भाजप आघाडीतील किती पक्षांना मान्य असेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. निवडणुका सुरू असल्यामुळे या मुद्यावर भाजप आघाडीतील पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नाही.
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर रालोआतून बिजू जनता दल बाहेर पडला आणि याच मुद्यावर मतभेद असल्याचा आभास निर्माण करून जनता दल युनायटेडचे नीतीशकुमारही रालोआतून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोदींचे नेतृत्व रालोआतील घटक पक्षांना कितपत पचनी पडते हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
निवडणुकांचे तीन टप्पे शिल्लक असताना राजकीय गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, मायावती हे आज पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील चेहरे मुखवटे ठरण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यानंतर पुढे येणारे खरे चेहरे वेगळेच असू शकतात..!
सुनील चावके