Leading International Marathi News Daily

सोमवार , २७ एप्रिल २००९

शिवजयंती! जुन्या तिथीनुसार पश्चिम महाराष्ट्रात रविवारी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कोल्हापूर शहरात संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. तर कराड शहरात शिवप्रतिमेच्या मिरवणुकींना चौको-चौकोत तोफांची सलामी देण्यात आली. तसेच या आकर्षक रांगोळ्याच्या पायघडय़ाही घालण्यात आल्या होत्या.

मिरवणुका, पोवाडे, घोषणांच्या निनादात शिवजयंती साजरी
कोल्हापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

पारंपरिक तिथीप्रमाणे आज शहरात आणि आसपासच्या परिसरात शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही आणि जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्य़ातील विविध ऐतिहासिक गडांवरून आज सकाळी शिवाजी चौकात येणाऱ्या शिवज्योती, जय भवानी-जय शिवाजीचा जयघोष, शहरात ठिकठिकाणी लावलेले भगवे ध्वज, भगव्या पताका आणि ध्वनिवर्धकावरून ऐकवली जाणारी वीररसाची गाणी, पोवाडे यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते.

अकलूजचा सयाजी वॉटर पार्क पर्यटकांनी फुलला!
भारत मगर, माळशिरस, २६ एप्रिल

कृत्रिमच पण निव्वळ नैसर्गिक वाटणारे रम्य वातावरण, अथांग जलशयातील कृत्रिम लाटा, नौकानयन, धबधबे, देशी- विदेशी वृक्षांबरोबरच विविध पक्षांचे थवे...रखरखत्या उन्हात दिलासा देणाऱ्या या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अकलूजच्या सयाजीराजे वॉटर पार्कवर राज्यभरातील पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्षपदाचा प्रशांत चिपळूणकर यांचा राजीनामा
गणेश जोशी, सांगली, २६ एप्रिल

सांगली शहर भारतीय जनता पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून लोकसभा निवडणूक निकालाआधीच पक्षात राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून, युवक कार्यकर्ते प्रशांत चिपळूणकर यांनी आपल्या युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष आमदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. भाजपने ऐनवेळी सांगली लोकसभा मतदारसंघातील दीपक शिंदे-म्हैसाळकर यांची अधिकृत उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आमदार अजित घोरपडे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.

अर्बन बँकेचे संचालक, उद्योगपती रणजित जाधव यांचे निधन
कोल्हापूर, २६ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

थोर समाजसुधारक भास्करराव जाधव यांचे नातू येथील अर्बन बँकेचे संचालक उद्योगपती रणजित जाधव यांचे शनिवारी रात्री निधन झाले. मृत्युसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगा व मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक मितभाषी, उपेक्षितांसाठी झटणारे लोकसंग्रही व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. रणजित जाधव हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे साडू होते.

निवडणूक अधिकाऱ्याविरुध्द आयोगाकडे तक्रार करणार - राजू शेट्टी
इचलकरंजी, २६ एप्रिल / वार्ताहर

इचलकरंजीचे प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी निवडणूक काळात अनेक प्रकारचा गोंधळ घातला आहे. प्रत्येकवेळी त्यांनी तिसरी आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला. विरोधकांनी सुपारी घेऊन काम करणाऱ्या या अधिकाऱ्याविरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे अशी माहिती लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आमदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. गृहमंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या दडपशाहीबद्दल त्यांनी टीका केली.

ना. मा. कांबळे यांचे सोलापुरात निधन
सोलापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यप्रेमी तथा मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीचे जाणकार नारायण मारुतीराव तथा ना. मा. कांबळे (वय ७७) यांचे शनिवारी सकाळी निमोनियाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. निशिकांत ठकार यांचे ते व्याही होत.
‘ना. मा.’ या नावानेच ओळखले जाणारे कांबळे हे लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीत कामगार होते. सामान्य कामगार असूनही त्यांनी मराठी सारस्वतावर विलक्षण प्रेम केले होते. ते एक उत्तम पत्रलेखक होते आणि कार्यकर्ते सुध्दा. साहित्यासह मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या साहित्यावर विशेष प्रेम करणारे कांबळे यांनी स्वत दोन पुस्तके लिहिली होती. ४०-५० वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनेचा प्रसंग ते खुलवून सांगत. त्यांनी ५० पेक्षा अधिक अ. भा. मराठी साहित्य संमेलनांना हजेरी लावली होती. जुन्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भाचे त्यांच्याकडे जणू भांडारच होते.

‘भ्रष्ट पैसा वसुलीसाठी प्राधिकरण स्थापन करावे’
सातारा, २६ एप्रिल/प्रतिनिधी

भ्रष्ट मार्गाने गोळा केलेला पैसा वसूल करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्राधिकरण स्थापावे, अशी मागणी जनहित कायदा मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. पी. एन. गोडगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कसाबवर खटला सुरू झाला, मात्र या अतिरेक्यांना आत येऊ देण्यास जबाबदार सीमा तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांवरही खटला दाखल करून त्यांच्याकडील अतिरिक्त संपत्ती सरकारने जप्त करावी. क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम २९७ प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यावर खटला दाखल करण्यास उच्चस्तरीय सरकारी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. हा अडथळा दूर करून कलम १९७ च्या परवानगीचा अधिकार सरकारी अधिकाऱ्याऐवजी सत्र न्यायालयास देण्यासंबंधी कायद्यात बदल करण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड. गोडगे-पाटील यांनी केली. सर्वसामान्य माणसाला माहितीच्या अधिकाराखाली सरकारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांची स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळाली पाहिजे. अतिरिक्त संपत्ती मिळवणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्धची चौकशी करण्याचे व अतिरिक्त मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार भ्रष्ट पैसा वसुली प्राधिकरणाला देण्याची तरतूद कायद्यान्वये करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. गोडगे-पाटील यांनी केली.

कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी
कोल्हापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

दिवसभर उष्म्याने हैराण केल्यानंतर सायंकाळी पंधरा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. त्यामुळे हवेतील उष्म्याची तीव्रता आणखी वाढली. गेल्या दोन महिन्यांपासून हवामानात जाणवण्याइतके बदल होऊ लागले आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्म्यापासून थोडासा दिलासा देणारा वळिवाचा जोरदार पाऊस पडावा ही अपेक्षा फोल ठरली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून उष्मा जाणवायला लागला. आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली आणि उष्माही वाढू लागला. वाढलेल्या उष्म्यामुळे रस्त्यावरील रहदारीही कमी झाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतरही उष्मा कमी होत नव्हता. आकाशातील ढगही विरळ होत चालले होते. त्यामुळे पाऊस हुलकावणी देणार असे वातावरण तयार झाले होते. साडेपाचनंतर पावसाचे बारीक थेंब पडू लागले. त्यानंतर टपोरे थेंब पडू लागले आणि नंतर हलक्या सरी पडू लागल्या. पाऊस दणक्यात पडणार असे वातावरण तयार होत असताना पाऊस थांबला. पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे हवेतील उष्मा कमी होण्याऐवजी आणखी वाढला.

प्रवासी असल्याचे भासवून मोटार पळविली
सोलापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

प्रवासी असल्याचे भासवून इंडिका कारमध्ये बसलेल्या तिघा भामटय़ांनी कारचालकावर चाकूहल्ला करून त्याच्या ताब्यातील कार पळवून नेल्याची घटना पुणे रस्त्यावर मोहोळजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. शाम जयसिंगराव माने (वय २६, रा.कोल्हापूर) हे एमएच १२ ई ५३३५ ही इंडिका कार घेऊन सोलापूरहून पुण्याकडे निघाले होते. मोहोळजवळ वडाची वाडी येथे तिघाजणांनी हात दाखवून ही कार अडविली. आपणास पुण्याला जायचे असल्याचे सांगून तिघेजण गाडीत बसले आणि थोडय़ाच वेळात कारचालक माने यांच्यावर चाकू व सळईने हल्ला केला. त्यांनी गाडी सोलापूरच्या दिशेने वळविण्यास भाग पाडले. नंतर तिघाजणांनी माने यांना गाडीबाहेर काढून गाडी ताब्यात घेऊन तिघे भामटे पळून गेले. मोहोळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी दिवाणजी
सोलापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अभय दिवाणजी (पुढारी) यांची, तर सरचिटणीसपदी संजय पवार (झी न्यूज) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाचे मावळते अध्यक्ष दशरथ वडतिले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या वेळी २००९-१० या वर्षांसाठी पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली. उपाध्यक्ष- राजकुमार सारोळे (लोकमत), भरतकुमार मोरे (पुण्यनगरी), सहचिटणीस- विनोद कामतकर (सकाळ), अप्पासाहेब हताळे (संचार), खजिनदार- श्रीनिवास गाजूल (सुराज्य), कार्यकारिणी सदस्य- अजित बिराजदार (सकाळ), धनंजय मोरे (सुराज्य), गुरुराज कुलकर्णी (विश्वसमाचार), तात्यासाहेब पवार (इन सोलापूर), अमोल व्यवहारे (केसरी), दीपक होमकर (साम मराठी), प्रभू पुजारी (तरुण भारत), सुमित वाघमोडे (इन सोलापूर), संजय येऊलकर (एकमत), विलास जळकोटकर (लोकमत), चंद्रकांत फुंदे (ई मराठी). सल्लागार मंडळावर रमेश महामुनी, जयप्रकाश अभंगे, संजीव पिंपरकर, शांतकुमार मोरे, अविनाश व्यं. कुलकर्णी, शेखर जाधव, इजाजहुसेन मुजावर व दशरथ वडतिले यांची निवड करण्यात आली.

अकरावी प्रवेशप्रक्रियेवर कोल्हापुरात १ मे रोजी संवादाचे आयोजन
कोल्हापूर, २६ एप्रिल/प्रतिनिधी

यंदा इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रभूत पद्धतीने होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया काय आहे, त्याची पद्धत कशी आहे यासंदर्भात पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिनांक १ मे रोजी माहितिपूर्ण संवादाचे आयोजन केले आहे. या संवादामध्ये प्रा.जगदीश चिंचोरे, प्रा.क्रांतिकुमार पाटील, सर्जेराव जाधव हे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमास पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.अरविंद कदम आणि वीणा सातोसकर यांनी केले आहे.